Breaking News

गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी -प्रवीण दरेकर

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाष्य दुदैर्वी आहे. गीते यांचे वय काढणे व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांबद्दल टिका टिप्पणी करणे म्हणजे तटकरे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. केवळ सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आली असावी. त्यामुळे शिवसेना तसेच शिवसेना नेतृत्वाने तटकरे यांनी केलेल्या भाष्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि. 21) केली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेची युती ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. शरद पवार आमचे गुरू होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य केले. गीते यांच्या त्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांनी गीते यांच्यावर जोरदार टीका केली. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच भाजपच्या सचिव दिव्या ढोले उपस्थित होते.

दरेकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी शिवसेनेवर दबाव टाकून स्वतःचा विस्तार करत आहे. यामुळे शिवसेनेचे नुकसान होत असून या सगळ्या गोष्टीची घुसमट व त्या संदर्भातील संवेदना अनंत गीते यांच्या वक्तव्यातून आल्या असाव्यात. शिवसैनिकांचे तालुकास्तरावर जे खच्चीकरण होत आहे, शिवसेनेचे आमदार काम करत असून त्यांना निधी देण्याबाबत जो दुजाभाव होतोय, कमिटीच्या नेमणुका असो, राज्यस्तरीय नेमणुका असो, शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेनचे आमदार, पदाधिकारी यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणून ते यांनी हे वक्तव्य केले असावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत यांनी अनंत गीते यांचे वक्तव्य खोडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट करावे की, गीते यांचे वक्तव्य बरोबर आहे की संजय राऊत यांचे वक्तव्य. तसेच या सर्व प्रकरणात शिवसेनेची अधिकृत भूमिका काय आहे. शिवसैनिक आज संभ्रमावस्थेत असून त्याला पक्षाची भूमिका काय आहे हे समजले पाहिजे. गीते यांनी पाठीत खंजीर खुपसल्याबाबतही वक्तव्य केले. गीते यांच्या वक्तव्यानंतर तटकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांमध्ये काय चालले आहे हे सांगण्याची कोणा ज्योतिषाची गरज नाही.सरकारमध्ये विसंवाद असल्यामुळे असे प्रकार होत असतात.

गीते यांचे वक्तव्य आल्यावर थोडेदेखील थांबण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाही. त्यामुळे शिवसेनेबरोबर नांदायचे की नाही ही भूमिका स्पष्ट झाली तर बरे होईल, असा टोलाही दरेकर यांनी लगावला. गीते यांचे समर्थन करण्याचे काही कारण नाही, परंतु तटकरे यांनी गीते यांच्यासारख्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेली टीका योग्य नाही. ज्या नेत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्याबरोबर पक्षाच्या उभारणीत हातभार लावला. कोकणातील कुणबी समाज गीते यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला. गेल्या अनेक वर्षात गीते यांच्याविरोधात कुठलाही निषेध कधी झाला नाही वा भ्रष्टाचाराचे आरोपही झाले नाहीत. गीते यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सहा-सात वेळा खासदार, केंद्रात मंत्री, या महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात कोणीही टिकात्मक भाष्य केले नाही. एवढे गीते हे चारित्र्यसंपन्न नेते आहेत.राज्याचे मूठभर चारित्र्यसंपन्न नेते आहेत त्यापैकी गीते एक आहेत, हे सांगायला अभिमान वाटतो, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

तटकरे हे अडगळीत होते पण, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या लाटेमध्ये शिवसेनेमध्ये काही फंदफितुरी झाली आणि त्यांना निसटता विजय मिळाला. तटकरे खासदार असले आणि गीते पराभूत झाले असले तरीही कोकणातील जनतेमध्ये त्यांची पत निश्चितच जास्त आहे हे मी सांगू शकतो. कारण कधी काळी मीही त्यांच्या हाताखाली काम केल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, गीते म्हणजे सूर्याच्या प्रकाशात तयार झालेले नेतृत्व आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा तेजस्वी सूर्य या महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा झालेला नाही असेही दरेकर यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत सर्व ठीक आहे हे तटकरे यांचे सांगणे हास्यास्पद आहे. गीते यांच्या वयाबद्दलही टीका टिप्पणी केली गेली, पण तटकरे काही चिरतरुण नाहीत. कोणाच्या वयावरून टीका टिप्पणी करणे योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात वय किती झाली तरीही त्यांच्या नेत्यांची सत्तेची हाव जात नसल्याचे टोलाही दरेकर यांनी लगाविला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply