Breaking News

कोरोना निर्बंधात शिथिलता; राज्यातील उपाहारगृहे, दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात सोमवारी (दि. 18) टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला, तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबत मात्र नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. खुसराव्ह, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभू आदी उपस्थित होते. राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृह 22 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहांची वेळदेखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपनेही हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानुसार ही वेळ वाढवली जाणार असून या संदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत अम्युझमेंट पार्कबाबतही चर्चा झाली. अम्युझमेंट पार्कदेखील 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत इतर राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र पाण्यातल्या राईड्सबाबत नंतर निर्णय घेण्याचे ठरले.  दरम्यान, मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे, तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागास करण्यात आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसर्‍या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, तसेच याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply