पनवेल : बातमीदार
पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर 9 जुलैपर्यंत महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार 455ने वाढली असून मृतांची संख्या 96 वरुन 278 झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा 3.13 वरून 3.26 पर्यंत वाढला आहे.
9 जूनला नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 3063 होती तर कोरोनामुळे 96 मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने 8 जूननंतर मिशन बिगीन अगेन सुरू केल्यानंतर नागरिक सामाजिक अंतराच्या नियमांत बेफिकिरी दाखवू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महिनाभरात रुग्णसंख्या दिवसाला सरासरी 200च्या जवळपास नवे रुग्ण वाढले. याच वेळी मृत्यूचे प्रमाणही वाढले. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण 96 मृत्यू होते. दिवसाला सरासरी दोन ते तीन असे मृत्यूचे प्रमाण होते. मात्र, महिनाभरात मृतांची संख्या 96 वरून 278 झाली आहे. त्याच वेळी 5083 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात कोरोनामुक्त होणार्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 60 टक्के आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा दर हा महापालिकांच्या तुलनेत कमीच आहे. तो अधिक कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
दक्षता घेण्याचे आवाहन
शहरात आढळणार्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण दिसून येत आहेत. कोविड रुग्णालयात प्राणवायू पुरविण्याची सुविधा असलेल्या खाटा आणि अतिदक्षता विभागांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पालिका अधिकारी आणि आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे कार्यरत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन पालिका करीत आहे.
9 जूनपर्यंतचा मृत्यूदर : 3. 13 टक्के
9 जुलै रोजी मृत्यूदर : 3.26 टक्के
कोरोनामुक्तीचा दर : 60 टक्के