रेवदंडा ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री शिवसेनेचे असताना यांना जेएसडब्ल्यू कंपनीवर मोर्चा काढावा लागतोय याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत माजी आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. बोर्ली येथील शेकापच्या मुरूड तालुका मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी असंगाशी संग केल्याने व नियोजनअभावी मागील विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागल्याचा पुनरूच्चार करीत राष्ट्रवादीवरदेखील टीका केली. पेण तालुक्यातील डोलवीजवळील जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात शिवसेनेने 18 ऑक्टोबर रोजी जनआंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी प्रशासनाच्या अधिकार्यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार मंत्रीमहोदयांच्या दालनात उभयतांमध्ये बैठक झाली. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत कंपनी प्रशासनाने स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आमदार दळवी यांनी पेण येथील पत्रकार परिषदेत सांगितले. हाच धागा पकडून शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमधील असमन्वय अनेकदा समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातही महाविकास आघाडीत आलबेल नसून अलीकडे शेकापही महाआघाडीतील सहकारी पक्षांना लक्ष्य करू लागला आहे. बोर्ली येथील भाषणात पंडित पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. विभागातील अनेक रस्ते राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने रखडल्याचे ते म्हणाले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …