अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धा नव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी ज्या खेळाडूंचा लिलावात समावेश झाला नाही अशा सर्व खेळाडूंसाठी बाद पद्धतीची क्रिकेट स्पर्धा सोमवार (दि. 19) पासून सुरू झाली आहे. एकूण 400 खेळाडूंनी या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून 128 खेळाडूंना आठ संघांच्या मालकांनी आभासी पॉईंट्सद्वारे लिलाव करून आपापल्या संघात दाखल करून घेतले. उर्वरित सर्व अनसोल्ड खेळाडूंना स्पर्धेत खेळता यावे म्हणून बाद पद्धतीच्या स्वरूपाची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण 16 संघांचा यामध्ये समावेश आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या 16 खेळाडूंना थेट आरपीएल स्पर्धेत वाइल्ड कार्ड एण्ट्री मिळणार आहे. या स्पर्धेची सुरुवात खारघर येथील घरत क्रिकेट मैदानावर करण्यात आली. या वेळी आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, खजिनदार कौस्तुभ पुनकर, प्रदीप खलाटे, सहसचिव संदीप जोशी, सुरेंद्र भाटिकरे, महेंद्र भाटिकरे, सागर कांबळे, कुणाल पाटील, भरत सोळंकी, अॅड. कौस्तुभ पुनकर उपस्थित होते. बाद फेरीची स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुख्य आरपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.