Breaking News

शिमगा सुरू आहे

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो शिमगा सुरू झाला आहे, तो इतक्यात तरी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. खर्‍याखुर्‍या शिमग्याला अजुन थोडा अवकाश असला तरी राजकारणात मात्र शिमग्याला लाजवेल अशा भाषेत खेळ सुरू झाला आहे. राजकारणाची ही हीन पातळी महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिलेली नाही आणि यापेक्षा खाली ती जाऊ नये याचे भान आता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ठेवायला हवे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सर्वशक्तीनिशी चिखलफेक केली, परंतु कशातच काही तथ्य नसल्यामुळे त्यांचा हा तथाकथित बॉम्ब सुरसुरीसारखा केविलवाणा आवाज करत निपचित पडला. अर्थात ते अपेक्षितच होते. राऊत यांनी जाहीर केल्यानुसार भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे त्यांना स्वत:लाच सांगता आली नाहीत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करीत आहेत. सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांवर त्यांनीही आजवर अनेक आरोप केले. तथापि सोमय्या यांचे आरोप आणि राऊत यांची सरबत्ती यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. सोमय्या जेव्हा आरोप करतात, तेव्हा ते कागदपत्रांसहित करतात. हातात पुरावे ठेवूनच योग्य त्या तपासयंत्रणेकडे रीतसर तक्रार करतात. राऊत यांनी असे कुठलेही पथ्य पाळल्याचे दिसत नाही. कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करण्याला राजकारणात काहीही किंमत नसते. बेलगाम भाषेच्या जोरावर आपण एकटेच पत्रकार परिषद रेटून नेऊ असा त्यांचा समज असावा, परंतु तो भ्रम असल्याचे आता त्यांना कळले असेल अशी आशा आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्या यांनी बुधवारी सकाळी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेले आरोप खोडून काढले. कोर्लई येथील भूखंड व तेथील आता अस्तित्वात नसलेल्या अठरा-एकोणीस बंगल्यांबद्दल सोमय्या यांनी वर्षभरापूर्वीच आरोप केले होते. त्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणला तो राऊत यांनीच. स्वत:च्याच नेत्याचे हे प्रकरण राऊत यांनी पुन्हा एकदा उकरून काढण्यामागे शिवसेनेतील अंतर्गत राजकारण तर कारणीभूत नाही ना, असा सवाल केला जात आहे. किरीट सोमय्या किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याविरुद्ध राऊत आणि अन्य कोणाहीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी संबंधित तपास यंत्रणांकडे द्यायला हवेत. त्याचा रीतसर तपास होऊ द्यावा. शेवटी सत्तेच्या खुर्चीत तेच बसले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा किंवा खंडणीविरोधी पथक यांच्याकडे तक्रारी दिल्या तरी सोक्षमोक्ष लागू शकेल. कुठल्याही तपासाला आमची तयारी आहे असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. सोमय्या यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही बुधवारी झणझणीत पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत यांना शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. पाठोपाठ शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेऊन राणे यांच्या विरुद्ध चिखलफेकीचा खेळ करून दाखवला. हे सारे कधी थांबणार आहे, असा सवाल कुठल्याही सुजाण मराठी माणसाच्या मनात असेल. हा यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे. तेथे ही हीन पातळी गाठली जाऊ नये, अशी अपेक्षा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राऊत आणि त्यांच्या सहकार्‍यांना हा घरचा आहेर मिळाला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply