महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी (दि. 16) संवाद साधला. या वेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली तसेच राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हेही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आधी तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची सुरुवात झाली आहे तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल, मात्र महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करून कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसजशी रुग्णवाढ होते तसतसा हा विषाणू आपली रूपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सूचित केले.

टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, वॅक्सिनचा अवलंब करा!

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण आधी जी रणनीती अवलंबली तेच आपल्याला करायचे आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस याच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचे आहे तसेच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे, मायक्रो कटेंन्मेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. याशिवाय केंद्र सरकारने लागू केलेल्या कोरोना पॅकेजचा वापर वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी करायला हवा, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply