महसूल विभागाने विकासकाला ठोठावला दोन कोटी 36 लाख रुपयांचा दंड; पाटबंधारे विभागाचीही नोटीस
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकसकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. त्याचबरोबर धरणामध्ये भरावदेखील केला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने विकासकाला दोन कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पाटबंधारे विभागाने धरणात केलेला भराव काढण्यासाठी विकासकाला नोटीस बजावली आहे.
ढोकशेत धरण क्षेत्रातील अनधिकृत उत्खनन, भराव व बांधकामाविषयी सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी सुधागड महसूल विभाग व पाटबंधारे विभाग कोलाड येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. सागर मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, ढोकशेत गट सर्व्हे नंबर 432 मध्ये शेतघर बांधण्याचे काम सुरू असून सपाटीकरणाच्या नावाखाली अनधिकृत उत्खनन करण्यात आले आहे. ही जागा ढोकशेत धरणाला लागून असून धरणामध्ये अनधिकृतरित्या भराव करण्यात आला आहे. तसेच मातीचा भराव करून धरणामधून बाहेर जाणार पाण्याचा प्रवाहदेखील बुजवण्यात आला आहे. व कच्चा मार्ग करण्यात आला आहे. ही जागा पाटबंधारे विभाग यांच्या अधिकाराखाली असतांना तेथे अशा प्रकारे अनधिकृत भराव होत असूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असे मिसाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
ढोकशेत येथे एका विकासकाने महसूल विभागाची कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतरित्या उत्खनन व भरावाचे काम केले आहे. या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. याबाबत विकासकाला दोन कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपये दंड ठोठावला आहे.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड
धरण क्षेत्रात अवैधरित्या केलेला भराव काढून टाकावा, अशी नोटीस विकासकाला बजावली आहे. महसूल विभागाने येथे कोणतेही काम न करण्याची नोटीस बजावल्याने विकासकाला भराव काढण्यासाठी यंत्रसामग्री नेता येत नाही आहे. त्यामुळे भराव काढण्याचे काम थांबले आहे.
-रामदास सुपे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोलाड