Breaking News

पोलादपूर नगरपंचायत : भाजप आगामी काळात निर्णायक

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पोलादपूरकरांना हवे असलेले परिवर्तन देण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अपयशी ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले तरीही शिवसेनेचे यश हे केवळ विभागलेल्या मतांमुळे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आघाडीतील एक मैत्रीपूर्ण लढत शिवसेनेला बढत देणारी ठरल्याने अंतिम निकालात शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून आले.

पहिल्या 13मध्ये शिवसेनेला सात आणि काँग्रेसला सहा जागा मिळाल्याने ही चुरस पुढे त्रिशंकू अवस्थेकडे वाटचाल करेल आणि निकाल दुसर्‍या टप्प्यातच निश्चित असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीचे भाकित सर्वांत जास्त गांभिर्याने शिवसेनेने घेतले. भाजपने या टप्प्यामध्ये काँग्रेसलाच काटशह दिल्याने शिवसेनेचा उधळलेला वारू रोखण्यात काँग्रेस अपयशी ठरली आणि पोलादपूरकर एकंदरित सत्तापरिवर्तनापासून अलिप्त राहिले. एकूण निकालाच्या आकडेवारीनुसार पोलादपूर शहरात शिवसेनेविरोधात तीव्र जनभावना असतानाही शिवसेनेविरोधातील विविध राजकीय पक्षांमध्ये समन्वय नसल्यानेच शिवसेनेची पुन्हा सत्ता स्थापन झाली. काँग्रेसने नगरसेवक वाढविले असले तरी जेमतेम मागीलपेक्षा केवळ एकच नगरसेवक जास्त निवडून आणत काँग्रेसने अनेक स्वत:चे उमेदवार पाडले अथवा पाडण्यासाठी उभे केल्याचे दिसून आले. या सर्व राजकीय खेळामध्ये भारतीय जनता पक्षाने 1993 शिवसेनाविरोधी मतांमध्ये 423 मते मिळविली. भाजपचा चंचूप्रवेश आणि निसटत्या मतांनी झालेले तीन पराभव आगामी काळासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसून येते.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये 16 प्रभागांत उमेदवारी लढणार्‍या शिवसेनेला 10 नगरसेवक व 1556 मते, 14 प्रभागांमध्ये लढणार्‍या काँग्रेस पक्षाला सहा नगरसेवक व 1333 मते, 12 प्रभागांमध्ये लढणार्‍या भाजपला एक नगरसेवक व 423 मते, चार प्रभागांत लढणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला 172 मते, तीन प्रभागांमध्ये लढणार्‍या मनसेला 50 मते, तर दोन अपक्षांना 15 अशा एकूण 1993 विरोधी मतांचे विभाजन शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असले तरी सत्तांतराची मानसिकता ध्वनित करणार्‍या जनमताचा अनादर विरोधी उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक प्रक्रिया स्वीकृत सदस्यांच्या निवडीसोबत पूर्णत्वास गेली असून आता आगामी पाच वर्षांसाठी शिवसेनेची सत्ता आणि विरोधी पक्षामध्ये काँग्रेस असे चित्र दिसणार असले तरी एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ग्रामपंचायतीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नसणे आणि काँग्रेससोबत आघाडी करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पक्षाने एकही उमेदवार निवडून आणण्यास सहकार्य करण्याचे गेल्या पहिल्या निवडणुकीप्रमाणे आताही टाळल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे मागितलेले स्वीकृत सदस्यपदही काँग्रेसने न देऊन फक्त घेण्याचे सत्र चालविल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसने प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्याकडे टाकलेले शब्द उभय नेत्यांनी प्रचारादरम्यान भाषणे करून, दौरे आखून पूर्ण केले. एकीकडे रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद माजी आमदार स्व.माणिकराव जगताप यांच्या निधनामुळे खुंटली असताना काँग्रेसकडून समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चक्क यूज ऍण्ड थ्रो अशीच भूमिका घेतल्याने महाड नगर परिषद आणि महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी कोणासोबत आणि कोणाविरोधात असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसने पोलादपूर नगरपंचायतीमध्ये स्वपक्षीयांचा पराभव करून विरोधात लढणार्‍या शिवसेनेचे काही उमेदवार निवडून येण्यासाठी हातभार लावल्याचे दिसून येत असताना राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येईल, अशी परिस्थिती सलग दुसर्‍या वर्षी कायम राहिली आहे.

पोलादपूर नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षेपेक्षा एक वर्ष उशिराने झाली. कोरोना आणि नंतर प्रशासनाचे कारण सांगून विकासकामांना विलंब झाला. याचदरम्यान शिवसेनेचे पाच नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष झाले होते. नगराध्यक्ष होण्याच्या लालसेतून शिवसेनेतील उमेदवार विजयासाठी ताकद लावणारे ठरतील, हा अंदाज काही अंशी खरा ठरणारा आहे. याच कारणातून काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये पक्षांतर करणारेदेखील तयार होतील हे सूत्र मागील पाच वर्षांप्रमाणेच कायम राहणार आहे. मागील वेळी काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले असताना विरोधी पक्षनेतेपदावरील नागेश पवार यांनी शिवसेनेत जाऊन नगराध्यक्षपदासह विकासकामे करीत काँग्रेससमोर आव्हान उभे करून तिसर्‍यांदा निवडून उपनगराध्यक्षपद मिळविले. मागील वेळी पंचायत समितीमध्ये सभापती असणार्‍या काँग्रेसचे दिलीप भागवत यांनी विरोधी पक्षनेतेपद प्राप्त केले आहे. या सर्व प्रकारात भारतीय जनता पक्षाने एकला चलो रे भूमिका घेऊन मिळवलेली मते आणि केलेला चंचूप्रवेश पाहता निसटत्या मतांनी झालेले तीन पराभव ही भविष्यात भाजपची जमेची बाजू ठरणार आहे.

प्रभाग 1मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 96 मते मिळाली असताना या निवडणुकीत 0 मतदान करताना शिवसेनेने एकूण मतदानाच्या केवळ 18 टक्के म्हणजे 82 मतदान करून घेण्याचा प्रकार 471 मतदारांना मतदानापासून परावृत्त आणि उमेदवारांना प्रचारापासून प्रतिबंधित करण्याचा प्रकार लोकशाहीमध्ये गंभीर असूनही त्याकडे सहजतेने पाहिले गेल्याने शहरीकरणातील गावखाते या ठिकाणी चालविले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग 2मध्ये काँग्रेसचा केवळ सात मतांनी हुकलेला विजय आणि भाजप उमेदवाराला 17 मते मिळणे, प्रभाग चारमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 23 मतांनी पराभव होणे आणि अपक्ष उमेदवारास 13 आणि भाजप उमेदवारास 39 मते मिळण्याने, प्रभाग पाचमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या विजयी उमेदवाराची मते कमी असणे, प्रभाग सहामध्ये भाजप उमेदवाराचा 19 मतांनी पराभव होणे आणि काँग्रेस उमेदवाराला 18 मते मिळणे, प्रभाग 10मध्ये काँग्रेस उमेदवाराचा 13 मतांनी पराभव होणे आणि भाजप उमेदवाराला 13 मते मिळणे, प्रभाग 13मध्ये  आघाडीच्या उमेदवाराला 17 मते मिळणे आणि भाजप उमेदवार केवळ आठ मतांनी पराभूत होणे, प्रभाग 15मध्ये काँग्रेसची मते अनाकलनीयरित्या ट्रान्सफर होणे, प्रभाग 16मध्ये शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यासाठी सहकार्याची मानसिकता करणार्‍या कुटूंबातील तरुण मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेसोबत जाणे, शिवसेनाविरोधी मतांची विभागणी झाल्यानेच या ठिकाणी शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.

उर्वरित ठिकाणी प्रभाग तीन आणि नऊमध्ये काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत काँग्रेसची सरशी होणे, तर प्रभाग तीनमध्ये शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर जाणे यातच प्रभाग 11मध्ये थेट लढतीत काँग्रेसला 52 मतांची आघाडी मिळणे, प्रभाग 17मध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुखांच्या नऊ मतांनी झालेल्या पराभवासोबतच काँग्रेस आणि मनसे यांना मिळालेल्या मतांची बेरीज 55 असणे हा मतदारांचा कौल शिवसेनेच्या विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप तसेच मनसे अशा सर्वपक्षीयांनी विचारात घेण्याची गरज आहे. सर्वच लढती एकाच टप्प्यात झाल्या असता या निवडणुकीचा निकाल पुष्कळसा जनमताचा आदर करणारा लागला असता, परंतु दुसर्‍या टप्प्यामधील निवडणूक ही जनमताला मारक ठरल्याचे एकूणच दिसून येत आहे.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आली असली तरी राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे मात्र शिवसेनेला धारेवर धरतील. त्याचवेळी भाजपही विकासाच्या मुद्द्यावर भिडेल.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply