Breaking News

अतिवृष्टीबाधित पाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

महाडमधील 72 नळ पाणीपुरवठा योजना, 14 विहिरी आणि तलावांचे नुकसान

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरात  शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील बाधित झाल्या होत्या. अनेक गावातील पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे, मात्र अद्याप या योजनांना दमडीदेखील मिळालेली नसल्याने ऐन टंचाई काळात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाड तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी होवून महापूर आला होता. यामध्ये रस्ते, शासकीय इमारती, पूल आदी शासकीय मालमत्तेसह गावागावातील नळ पाणीपुरवठा योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश पाणीपुरवठा योजना नदीकिनारी असल्याने पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात जलवाहिन्या उखडून गेल्या तर काही ठिकाणी पडझड होवून नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील सुमारे 72 नळ पाणीपुरवठा योजना, 14 विहिरी आणि दोन तलावांचे नुकसान झाल्याचा अहवाल महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. यामध्ये पारमाची, बारसगाव, वरंध, गोठे बुद्रुक, मोहोत, राजेवाडी, भावे, कांबळे तर्फे बिरवाडी, कुंभे शिवथर, कोथूर्डे, नागाव, वाळसुरे, चापगाव, पडवी पठार, आकले, मोहोप्रे, किंजलोळी, काळीज, बिरवाडी, कोंडीवते यांसह अन्य गावातील नळ पाणीपुरवठा योजना, रानवडी, वाळण येथील पंपगृह, कोल आणि नागावमधील विहीरींचा समावेश आहे.

पावसाळ्यात या योजना बाधित झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्त्रोतांचा वापर नागरिक करत आहेत. शिवाय पूरपरिस्थितीमधील मदतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा साठा आल्याने ग्रामीण भागात  पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवली नाही. मात्र आता पिण्याच्या पाण्यासाची समस्या जाणवणार आहे. टंचाई काळाच्या आतच या योजना दुरुस्त होणे गरजेचे होते. महाड पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव सादर केला असून या बाधित योजनांना आता निधीची प्रतीक्षा आहे.

तालुक्यातील नादुरुस्त पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी   ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला तब्बल पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची गरज असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र महापुरानंतर जवळपास आठ महिने झाले तरी अतिवृष्टीत बाधित झालेल्या पाणी योजनांना अद्याप एक दमडीदेखील मिळालेली नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या पाणीटंचाई काळात नागरिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात सद्यस्थितीत ग्रामीण आणि डोंगराळ भागात 17 ग्रामपंचायती आणि 30 वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे.

महापुरात महाड शहरालगत असलेल्या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि तलावांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी कांही गावात पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरु आहे. पाणी योजना दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवले असून लागणार्‍या निधीची पूर्तता झाल्यानंतर कामे केली जातील.

-जे. यु. फुलपगारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महाड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply