Breaking News

खारभूमी कामाच्या यंत्रसामुग्रीमुळे पेण भाल येथील घराला तडे

नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील खारेपाट विभागाच्या नारवेल, खारभुमी योजने अंतर्गत भाल-विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारणाचे काम सुरू आहे. त्यासाठी येणार्‍या मोठमोठ्या यंत्र सामुग्रीमुळे राजेंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या भाल येथील घराला जागोजागी तडे गेले असून घराचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची प्रशासनाने तातडीने पाहणी करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र म्हात्रे यांनी पेण प्रांताधिकार्‍यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पेण तालुक्यातील भाल-विठ्ठलवाडी येथे खारभुमी योजनेचे काम सुरू असून त्याकरीता पोकलेन, डंपर, जेसीबी, हायड्रा, टॅक्टर आदी अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे लगत असणार्‍या राजेंद्र म्हात्रे यांच्या घराला तडे गेले असून राहते घर कधीही पडू शकते, अशी अवस्था झाली आहे.

त्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली असता सरपंच व सदस्यांनी पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा केला आहे तसेच खारभुमी अधिकारी व ठेकेदार यांनीही पाहणी केली आहे.

मात्र बरेच महिने उलटले तरीही याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने राजेंद्र म्हात्रे यांनी या संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

येत्या आठ दिवसांत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर आमचे कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचे राजेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

येथून इतरही वाहने सुरू आहेत. खारभुमी योजनेच्या कामाकरीता जी वाहने ये-जा करीत आहेत त्यांच्यामुळेच राजेंद्र म्हात्रे यांच्या घराला तडे गेले असे म्हणता येणार नाही कारण इतरही घरांना तडे जायला पाहिजे होते. परंतु तरीही आपण त्यांच्या घराची डागडुजी करून देणार आहोत, असे ठेकेदार सुनील पाटील यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply