रसायनी : बी. एस. कुलकर्णी
वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीमधील गैर व्यवहाराबाबत सरपंच ताई पवार यांना आपल्या सरपंचपदाच्या खुर्चीवरून जून महिन्यात पायउतार व्हावे लागले, परंतु वासांबे ग्रामपंचायतीमध्ये अन्य सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारात संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमध्ये थेट सहभाग असेल तर त्या बाबतचा प्रत्येक सदस्याचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. 17 नोव्हेंबर रोजी 17 सदस्यांची चौकशी होणार होती, परंतु या चौकशीला स्थगिती देवून पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच या सदस्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे सरपंचासारखेच हे सदस्यही अपात्र ठरतात का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या विरुध्द महाराष्ट्र अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3 कलम 39 (1) नुसार कारवाई करण्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार नियम 22 (1), 24 (2) (क) व 24 (26) चा अवलंब न करणे, ग्रामपंचायतीचे कॅशबुक व पासबुक यांचा ताळमेळ न घेणे, अनधिकृत अतिक्रमित बांधकामावर कारवाई न करणे, ग्रामपंचायतीची नियमानुसार परवानगी न घेता केलेल्या बांधकामाची खात्री न करता कर आकारणी करणे, ग्रामपंचायतीमधील 15 टक्के, 10 टक्के, 5 टक्के खर्च करणे अनिर्वाय असताना अनुशेष शिल्लक ठेवणे. विकासकामे करताना नियमांचा अवलंब न करणे असे दोषारोप निश्चित केलेले आहेत.
सविस्तर अहवाल पाहता वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य ग्रामपंचायत कारभारात संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमध्ये थेट सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कोकण आयुक्तांना कळवले आहे. त्यामुळे सतरा सदस्यांची 17 नोव्हेंबर रोजी चौकशी होणार होती, परंतु काही कारणास्तर ती चौकशी पुढे गेली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या चौकशीच्या अहवालामुळे वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगली तलवार असल्याचे दिसून येत आहे.
Check Also
पेठालीच्या मैदानात आमदार चषक 2025 स्पर्धा; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील …