Breaking News

नवी मुंबईतील डॉ. बाबासाहेबांचे स्मारक बघताना भारावून गेलो -नागराज मंजुळे

नवी मुंबई : बातमीदार

इतक्या आस्थेने, सौंदर्यदृष्टीने, प्रेमाने स्मारक उभे केले जाऊ शकते याचा अतिशय वेगळा प्रत्यक्ष व जिवंत अनुभव देणारे डॉ. बाबासाहेबांचे हे स्मारक आहे. हे बघताना अत्यंत भारी वाटले अशा सहज शब्दात भावना व्यक्त करीत सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हे पुतळा विरहित स्मारक आहे हे विशेष, असे प्रतिपादन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून 30 मार्चपासून ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ’जागर 2022’ हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मान्यवरांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करून आगळ्यावेगळ्या वैचारिक स्वरूपात जयंती साजरी करण्यात येत आहे. ’जागर 2022’ या उपक्रमाची सांगता पिस्तुल्या, फँड्री, सैराट, झुंड या लोकप्रिय  चित्रपटांचे दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांच्या सुसंवादाने झाली.

ग्रंथालये ही काळाची गरज असून इथले संपन्न ग्रंथालय पाहिले आणि मलासुध्दा कमी झालेले वाचन वाढवायला पाहिजे याची जाणीव झाली असे सांगत  नागराज मंजुळे यांनी वाचनामुळे माणूस विचार करायला लागतो. जसे सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी आपण जीममध्ये जाऊन शारीरिक तंदुरुस्तीला महत्व देतो तसेच महत्व मनाची सुटलेली ढेरी लक्षात घेऊन विचारांच्या मशागतीला दिले पाहिजे, त्यासाठी वाचले पाहिजे असे मत व्यक्त केले.

बाबासाहेब माझा बाप आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आजोबा, ही  धारणा असल्याचे सांगत  नागराज मंजुळे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित व्याख्याने आयोजित करणे ही नवी मुंबई महानगरपालिकेची संकल्पना एकदम बेस्ट असून असे काहीतरी समाजाच्या हिताचे महापुरुषांच्या जयंत्यांनिमित्त सगळीकडेच व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले. महापुरुषांचा ईश्वर करून त्याच्या प्रतिमेला नमस्कार केला की आपले काम झाले असे न मानता त्याचे माणूसपण, विचार समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत असेही ते म्हणाले. छायाचित्र संग्रहालय बघताना एके ठिकाणी पुस्तक रमाईंना अर्पण करताना त्यात बाबासाहेबांनी फ्रेंडलेस जग हा शब्द वापरला आहे. बाबासाहेबांसारख्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे हित जपणार्‍या माणसाला हे जग मित्रविरहित वाटते या जाणीवेनेच मी कातर झालो अशी संवेदना त्यांनी व्यक्त केली.

दहावी नापास झालो आणि मग वाचायला लागलो. पोलीस टाईम्स पासून सुरुवात झाली. पुस्तकांचे जग खुले झाले. वाचनामुळे आपण समजतो त्यापेक्षा जग खूप वेगळे असते हे कळायला लागले. कुठेतरी वाचनात आले म्हणून रोजनिशी लिहायला लागलो आणि त्यातूनच लेखन गोळीबंद होत कविता लिहायला लागलो असे सांगत त्यांनी आपल्या कवितेच्या वाटेवरील अनुभवांना उजाळा दिला.

आपल्या शिक्षणात विशिष्ट शाखेच्या अभ्यासक्रमाच्या पलिकडे तुम्हांला जे काही येते त्याचा फारसा विचार केला जात नाही, त्याची परीक्षाच नसते अशी खंत व्यक्त करीत जगण्याचे बळ आणि समज देणार्‍या साहित्याचा अभ्यास सर्व शाखांना असायला हवा असे मत  नागराज मंजुळे यांनी मांडले. शाळेबाहेरच्या शिक्षणाने मला तारले, आज जे काही मिळालेय त्यामध्ये साहित्य वाचनाचे महत्वाचे योगदान असल्याने त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या विद्येविना मती गेली या अखंडातून फुललेली पिस्तुल्याची संकल्पना, फँड्रीचा निर्मिती प्रवास, सैराट व झुंड तयार होतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

आपले चित्रपट लोकांना विचार करायला लावणारे

लहानपणापासून चित्रपटाच्या असलेल्या प्रचंड आकर्षणाविषयीच्या आठवणी सांगत माझ्या मनातल्या आटपाट नगरीतील गोष्टींचा चित्रपट बनविणे हे आपले प्राधान्य असून त्यातून पैसा मिळाला हा बोनस असल्याचे  नागराज मंजुळे यांनी सांगितले. सिर्वसाधारण चित्रपटांपेक्षा आपल्या चित्रपटांचा शेवट एकदम वेगळा का असतो या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लोकांनी शेवटी विचार करीत घरी जावे असे उत्तर दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply