देशाच्या निर्यात वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान
उरण : वार्ताहर
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण हे देशातील प्रमुख कंटेनर बंदर आहे. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकानुसार भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे हे बंदर ठरले आहे. लॉजिस्टिक कामगिरीवर आधारित निर्देशांक सूची नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये जेएनपीएला सर्वाधिक 84.61 अंक प्राप्त झाले व जेएनपीए भारतातील प्रमुख बंदरांच्या यादीत शिर्षस्थानी विराजमान झाले. या सूचीमध्ये मुंद्रा (84.16), पिपावाव (81.52), दिल्ली विमानतळ (81.27) आणि काकीनाडा (77.22) अनुक्रमे दुसर्या, तिसर्या, चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले. देशातील सर्व प्रमुख बंदरांसाठी समान असलेल्या 11 पॅरामीटर्सच्या आधारे कामगिरीची क्रमवारी ठरवली जाते. हे पॅरामीटर्स याप्रमाणे-लॉजिस्टिक वेळ (तासांमध्ये), लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के विलंब खर्च, सीमाशुल्क आणि कागदपत्रांची सुलभता एक-दहाच्या स्केलवर मोजमाप, एकूण लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के कस्टम क्लिअरिंगची शुल्क, लॉजिस्टिक खर्चाच्या किती टक्के स्पीड मनी, व्यवसायात अडथळा किंवा विलंब म्हणून एक-दहाच्या स्केलवर भ्रष्टाचाराचे मोजमाप, त्यात भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय विचारात घेतले गेले, विविध टोळ्यांकडून होणारा त्रास, चोरी/गळती इत्यादिचे एक-दहाच्या स्केलवर मोजमाप, माल उतरवण्यापासून स्टोरेज यार्डमधील सीमा शुल्क तपासणीपर्यंत लागणारा वेळ, स्टोरेज यार्डमधील सीमाशुल्क तपासणीपासून आयातदारांसाठी वस्तू शेवटी बंदराबाहेर गेल्यापर्यंत लागणारा वेळ, सीबीआयसी अधिकार्यांकडून मालाच्या तपासणीसाठी बंदरातून माल घेऊन जाण्यासाठी लागणारा वेळ, सीबीआयसी अधिकार्यांची तपासणी पूर्ण होण्यापासून ते जहाजावर माल चढविण्यासाठी लागणारा वेळ आदिंचा समावेश होता. जेएनपीए बंदराच्या उत्कृष्ट कामगिरी विषयी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीएने अखंड कनेक्टिव्हिटीसोबतच संपूर्णपणे स्वयंचलित आणि एकात्मिक कंटेनर सेवांसह प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी व त्याचबरोबर व्यवहारामध्ये संपूर्ण पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभ करता यावा यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जेएनपीएने व्यवसाय वृद्धी व सुलभतेसाठी तीन स्तरीय दृष्टिकोणाचा अवलंब केला आहेत. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, प्रक्रिया सुलभ करणे आणि क्रीयाकलापांचे डिजिटायझेशन करून व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या अंतर्गत जेएनपीएने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा विकास, बंदर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या फेज दोनचा विकास, स्कॅनर बसवणे, कोस्टल बर्थचा विकास, एकात्मिक कॉमन रेल यार्ड सुविधेचा विकास, डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी, डायरेक्ट पोर्ट एंट्री, आयटीआरएचओ, आरएफआयडी आधारित टर्मिनल गेट व्यवहार, कंटेनर ट्रॅकिंग, जेएनपीए मोबाइल अॅप, ई-डिलिव्हरी ऑर्डर, पीसीएस सिस्टमचे अपग्रेडेशन आदी उपायांमुळे जेएनपीएने 2021 या वर्षामध्ये एकूण 5.63 दशलक्ष टीईयूची कंटेनर यशस्वीपणे हाताळणी केली. भारतातील कोणत्याही बंदराद्वारे हाताळली गेलेली ही सर्वोच्च आयात-निर्यात कंटेनर वाहतूक आहे. जेएनपीए देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी वचनबद्ध आहे आणि व्यवसाय सुलभरित्या करता यावा करण्यासाठी सर्वोत्तम सुविधा प्रदान करून जागतिक मूल्य पुरवठा साखळीचे नेतृत्व करत असल्याचेही ते म्हणाले.
कर्मचारी,भागधारक, ग्राहक यांचे हे श्रेय : संजय सेठी
जेएनपीए बंदराच्या उत्त्कृष्ट कामगिरीविषयी बोलताना अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, आमचे सर्व कर्मचारी, भागधारक आणि ग्राहक यांचे हे श्रेय आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच जेएनपीएने देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे बंदर बनून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. लॉजिस्टिक खर्चात बचत करण्यासाठी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि आयात-निर्यात समुदायासाठी वेळेची बचत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत.