नेरळमध्ये संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याने पत्रकारांवर सत्य आणि विश्वासार्ह लिखाणाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी बुधवारी (दि. 27) नेरळ येथे केले.
कर्जत प्रेस क्लबच्या वतीने नेरळ येथील जेनी ट्युलिप शाळेच्या प्रांगणात बुधवारी संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार विनायक पात्रुडकर यांना तर जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार पनवेल येथील माधव पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी विनायक पात्रुडकर बोलत होते. प्रसारमाध्यमे आणि न्याय व्यवस्थेवर जनतेचा ठाम विश्वास असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
माथेरानवर आलेले इको सेन्सेटिव्हचे संकट दूर करण्यासाठी संतोष पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले. त्यामुळेच आज माथेरान टिकून राहिले आहे, असे सांगून माथेरानबद्दल कळवळा असलेला सर्वसामान्य माणसाचा हक्काचा माणूस आज आपल्यात नाही, अशी खंत माजी आमदार सुरेश लाड यांनी या वेळी व्यक्त केली. माधव पाटील यांनी या वेळी सत्काराला उत्तर दिले. कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, मनोज खेडकर यांचीही या वेळी समयोचीत भाषणे झाली.
प्रेस क्लबचे संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडे, संजय मोहिते, दर्वेश पालकर, राहुल देशमुख, कांता हाबळे, ज्योती जाधव, विलास श्रीखंडे, मल्हार पवार, संजय अभंगे, जयवंत हाबळे, गणेश पवार, अजय गायकवाड, गणेश पुरवत, ज्ञानेश्वर बागडे, भूषण प्रधान, विकास मिरगणे, नितीन पारधी, गणेश मते आणि ऋषिकेश कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी काळे यांनी केले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळचे उपसरपंच आणि भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके, रंजना धुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला पवार, त्यांच्या पत्नी मनीषा पवार, भगिनी बेबी गराटे आदी या सोहळ्याला उपस्थित होते.