खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यात रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून, अवघ्या आठ दिवसात विविध अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तेरा जण जखमी झाले आहेत, जखमींपैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खालापूर तालुक्यात रस्त्याचे जाळे असून, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, पाच राज्यमार्ग तालुक्यातून जातात. या सर्व मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. रस्त्याची विविध ठिकाणी सुरू असलेली कामे अपघाताचे कारण बनत असून, अवजड वाहतूक आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा जीवघेणा ठरत आहे. मागील आठ दिवसात खालापूर तालुक्यात प्रवासी रिक्षाचे दोन, दुचाकीचे दोन, कारचे तीन तर ट्रेलरचा एक अपघात घडला आहे. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावानजीक भरधाव कारची पादचार्यांना धडक बसून, एक गंभीर, एक किरकोळ जखमी झाला. तर दुसर्या घटनेत चौक हद्दीतील नढाळनजीक भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पलटी झाली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. खोपोली-पेण मार्गावर रिक्षा अपघाताच्या दोन घटना लागोपाठोपाठ घडल्या असून, रिक्षातील एका प्रवाशाला जीव गमवावा लागला तर, सहा जण जखमी झाले. सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर शनिवारी संध्याकाळी दुचाकी आणि टेम्पोच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला. दुसरा दुचाकी अपघातात जुना मुंबई-पुणे महामार्गावर घडला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने भरधाव कार पलटी होऊन एक महिला गंभीर जखमी व अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. खोपोली-पाली राज्यमार्गावरील घटनेत सायकलवरुन जाणार्या आठ वर्षीय मुलाला भरदार ट्रेलरने धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण, खोपोली-पाली, जांबरुग फाटा ते कर्जत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. याशिवाय वेगवान मुंबई द्रुतगती मार्गावरदेखील खालापूर हद्दीत काही ठिकाणी जुनी लेन खोदून काँक्रिटीकरण काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदाराकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.