पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना आणि आठ लाख 88 हजारांच्या अंतर्गत गटार बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 15) होणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदासंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते तसेच भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या योजनेंतर्गत केळवणे गावामध्ये प्रत्येक घरात पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत.दोनच दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे हर घर नल, हर घर जल योजनेचे भूमिपूजन झाले होते. अशा प्रकारे ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याचे पहावयास मिळत आहे. देशातील प्रत्येक खेड्यापाड्यातील घरात पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची ही योजना केंद्र सरकार राबवित आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनची घोषणा केली. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.