Breaking News

“अटल करंडक हाच एकांकिका विश्वात एक ब्रँड”

सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचे उद्गार

पनवेल : नितीन देशमुख
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मोठ-मोठ्या स्पर्धांचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्याचे ऐकले होते. एकांकिका स्पर्धेला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अशी संकल्पना नव्हती, पण गेल्या आठ वर्षांत अटल करंडक हाच एकांकिका विश्वात एक ब्रँड झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्याला एक वेगळी ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची टर्म क्रिएट केलेली आहे. यापूर्वी ओंकार भोजने अटल करंडकचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होता. या वर्षी मला ती संधी मिळाली आहे. आम्ही सगळी एकांकिकेत काम केलेली माणसे आहोत. आयुष्यभर पथनाट्य, नाटुकल्या व एकांकिका करीतच वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. आमच्यासाठी खर्‍या अर्थाने ऑडिशन म्हणजेच एकांकिका होत्या. हे उद्गार आहेत अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आणि सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगली. त्या वेळी पृथ्वीक प्रताप ‘रामप्रहर’शी विशेष मुलाखतीमध्ये संवाद साधत होते.
माझी तीन-चार वर्षे शैक्षणिक सत्र सुरू होती. त्या वेळी मी फक्त आणि फक्त गर्दीतच काम करीत होतो. तेव्हा अशी काही काम करण्याची संधी मिळाली नव्हती, पण आज त्याचा खूप अभिमान वाटतो की, गर्दीतून कुठून तरी सुरुवात केली होती. आज सीटवरून बॅक स्टेज व फ्रण्टला येणे आणि स्पर्धेचा चेहरा बनणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे माझ्या मित्रांना वाटते. एकांकिका करणार्‍या मुलांना वाटते की, एक आपल्यातलाच आपल्यासारखाच एक मुलगा आज एका स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होतो हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. त्यामुळे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर ही टर्म माझ्यासाठी एका ब्रँडशी रिलेटेड राहिलेली नाही. ती एक इमोशन झालेली आहे, जी माझ्यातल्या एका माणसाशी मला फार रिलेट करावीशी वाटते, असे पृथ्वीक प्रताप यांनी नमूद केले.
या वर्षी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री, द्विपात्री राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेला मी परीक्षक होतो. तेव्हा अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा झाली. त्या वेळी माहीत नव्हते की, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर कोण असणार? पण माझ्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समजले होते. मला फार बरे वाटले आणि मग मला आयोजकांनी एक सुखद धक्का दिला. त्याचा मला आनंद झाला, असे पृथ्वीक प्रताप यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आज सुरू असलेली अटल करंडक स्पर्धा उत्कृष्ट दर्जाची आहे. राज्यात पाहिले तर 365पैकी 340 दिवस कोठे ना कोठे एकांकिका स्पर्धा सुरू असते. परीक्षकांना फक्त 20 दिवस आराम मिळत असेल. त्या सगळ्याच स्पर्धा चांगल्या आहेत, पण त्यामध्ये अटल करंडक स्पर्धा उजवी ठरते, कारण ‘अटल’कडे शिस्त आहे. आयोजकांकडे शिस्त असते, मात्र ती इतर ठिकाणी अमलात आणली जात नाही. ‘अटल’कडे ती अमलात आणली जाते. ते महत्त्वाचे असते, असे मला सांगावेसे वाटते.
स्पर्धा वेळेत सुरू होते व वेळेत संपते. इथे वेळेची गणिते फार काटेकोरपणे पाळली जातात. आयोजकांचे जास्त कौतुक यासाठी आहे की, आपल्या आठ सेंटरपैकी सात मुंबईच्या बाहेरची आहेत. त्या सात सेंटरचे स्पर्धक इथे येतात तेव्हा त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था छान केलेली असते. त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व माजी सभागृह नेते परेश ठाकूर जातीने लक्ष देत असतात. स्पर्धकांना आयोजकांकडून विश्वास मिळतो की तुम्ही या बिनधास्त तुमचे काम करा. बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेतो. हा विश्वास देण्याचे काम अटल करंडकातून होते. म्हणून ही स्पर्धा वेगळी ठरते.
या स्पर्धेतून नवीन कलाकारांना संधी मिळते, पण ती त्यांना घेता आली पाहिजे. याबाबतही अटल करंडकवाल्यांचे कौतुक करावेसे वाटते, कारण नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होते. त्यामुळे पूर्ण स्पर्धा त्यानंतरच व्हावी असा त्यांचा कटाक्ष असतो, ज्यामुळे मुले आभ्यासाकडेही लक्ष देतील आणि त्यांना स्पर्धाही करता येईल. ‘अटल’ विद्यार्थ्यांना एक फ्लॅटफार्म तयार करून देते. सोशल मीडियाचा ते उत्तम वापर करतात. एकांकिका यू-ट्यूब लाईव्ह असल्याने वेळ मिळेल तेव्हा पाहता येतात. म्हणजे इंडस्ट्रीतील जे काही दिग्गज लोक कधी न कधी ती एकांकिका पाहत असतात, ती संधी तुम्हाला फार मोठं करू शकते. आपण कोणासमोर यायचे आणि जायचे, स्ट्रगल करायचा, ऑडिशन द्यायची याचा नव्या पिढीतील प्रत्येकाला प्रश्न असतो. ‘अटल’चे स्पर्धक याचा विचार करीत असतीलच, पण त्यांना माहीत असते की समोर दिग्गज परीक्षक आहेत. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी स्ट्रगल करतो किंवा ऑडीशन देतोय हे त्यांना माहीत असते. संधी मिळवणे फार महत्त्वाचे आहे. ‘अटल’ तुम्हाला ही संधी तुम्हाला मिळवून देते. म्हणूनच त्यांची टॅग लाईनदेखील ‘रंगमंच आमचा, कलाविष्कार तुमचा’, अशी आहे. त्यांनी तुम्हाला सगळे दिले आहे, तुम्ही फक्त येऊन परफॉर्म करायचा आहे, असे पृथ्वीक प्रताप यांनी अधोरेखित केले.
आपल्याला वाटते की मुले काय करतायत की नाही. सोशल मीडियावर कमेंट करणारे लोक म्हणतात अरे काय मराठीचे सिनेमे चालत नाहीत. काय विषय आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांनी एकांकिका पहाव्यात, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल इथे मानसशास्त्रापासून प्रेमापर्यंत, जातीवाद, धर्म, भेदापर्यंत सगळे विषय मांडले जातात. एकाच साच्यात न अडकता वेगवेगळ्या विषयांना हात घालणे गरजेचे आहे, कारण त्याच पद्धतीने आमचे भविष्य आम्ही स्वीकार करणार आहोत. इथे केवळ सादरीकरणावर भर दिला जात नाही तर त्यावर सोल्युशनसाठीही आकार दिला जातो, एकांकिकेतून लोक काय घेऊन जाणार आहेत यावरही भर दिला जातो. मला असे वाटते की, वेगवेगळ्या पद्धतीने सांगणे आहे, मांडणे आहे ते जास्त महत्त्वाचे आहे, जे इथे घडते, अशा शब्दांत पृथ्वीक प्रताप यांनी सर्वंकष आढावा घेतला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply