Breaking News

रायगडात काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

जुलै महिन्यात अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप या दोन काँग्रेस नेत्यांचे निधन झाले. दोन्ही नेते जनाधार असलेले होते. त्यांची स्वतःची अशी ओळख होती. या दोन नेत्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाला आहे. जनाधार असलेला आणि संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकेल असा नेताच रायगड जिल्ह्यात काँगे्रसकडे नाही. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेससमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे.

पूर्वीच्या कुलाबा आणि नंतरच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस आणि शेकाप हे दोनच तुल्यबळ पक्ष होते. या दोनच पक्षांचे खासदार या जिल्ह्यातून निवडून यायचे. कारण या दोन्ही पक्षांकडे विचारधारा होती, त्या विचारधारेवर काम करणारे नेते होते, त्यांना मानणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे दोन्ही पक्ष जिल्ह्यात मजबूतपणे उभे होते. जिल्ह्यात काँग्रेसकडे बॅ. ए. आर. अंतुले यांच्यासारखा खमका नेता होता. बॅ. अंतुले यांच्या निधनानंतर खर्‍या अर्थाने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पोरकी झाली.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँगे्रस सोडली. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर रायगड जिल्ह्यात काँग्रेसकडे जनाधार असलेले दोनच नेते उरले होते, ते म्हणजे अलिबागचे मधुकर ठाकूर व महाडचे माणिक जगताप. या दोघांचेही मागील महिन्यात निधन झाले. त्यामुळे आता जिल्ह्यात खर्‍या अर्थाने जनाधार असलेला नेताच उरलेला नाही. काही नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कमकुवत झाली होती. त्यात या दोन नेत्यांचे निधन झाले. त्यामुळे  जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसची बोट भरकटू शकते. अशा बुडणार्‍या बोटीतून प्रवास करण्याचे धाडस कुणी करणार नाही.

माजी खासदार रामशेठ ठाकूर भाजपमध्ये आल्यामुळे पनवेल महानगरपालिकेची सत्ता भाजपकडे आली. त्याचबरोबर भाजपकडे प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रविशेठ पाटील हे तीन आमदार आहेत. या जिल्ह्यात आता भाजपने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यात शेकापची काहीशी ताकद आहे. त्यांच्याकडे आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. शेकापकडे जिल्हा परिषदेची सत्ता आहे. बाळाराम पाटील आमदार आहेत, तर शिवसेनेकडे भरत गोगावले, महेंद्र थोरवे व महेंद्र दळवी असे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे खासदार सुनील तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. त्यांची कन्या अदिती तटकरे जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे आमदार आहेत.

जिल्ह्यातील 11 पैकी केवळ महाड नगर परिषद काँग्रेसकडे आहे. काँगे्रसकडे या जिल्ह्यातला एकही मंत्री नाही, आमदार नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत रायगड जिल्ह्यात काँगे्रसला काम करायचे आहे. काँग्रेसमोर मोठे आव्हान आहे ते आपले अस्तित्व टिकवण्याचे. त्यासाठी गरज आहे ती भक्कम नेतृत्वाची.

ज्याप्रमाणे या जिल्ह्यात इतर राजकीय पक्षांकडे नेते आहेत, तसे प्रभावी नेते सध्या तरी काँगे्रसकडे नाहीत. काँग्रेसकडे नेतृत्व नाही. जर भक्कम नेतृत्वच नसेल तर कार्यकर्ते कुणाकडे पाहून काम करणार. काँग्रेसचे कार्यकर्ते इतर पक्षात जातील. आता काँग्रेससमोर या जिल्ह्यात निवडणुका लढवण्याचे नव्हे, तर पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे.

मधुकर ठाकूर यांचा अलिबाग तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आधार होता. त्यांच्या निधनामुळे अलिबागमध्ये आता काँग्रेसकडे नेताच उरलेला नाही. तशीच परिस्थिती इतर तालुक्यांमध्ये आहे. माणिक जगताप तरुण नेते होते. ते चांगले वक्ते होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेण्याची हिंमत त्यांच्यात होती, परंतु आता तसा नेताच काँग्रेसकडे उरलेला नाही. काँग्रेसला रायगड जिल्ह्यात उभे करायचे असेल, गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर करिष्मा करून दाखवणारे नेतृत्व शोधून काढावे लागेल, भले त्याच्याकडे जिल्हाध्यक्षपद नसले तरी त्याचे नेतृत्व सर्वमान्य असे पाहिजे.

बॅ. ए. आर. अंतुले हयात नसले तरी त्यांना मानणारे कार्यकर्ते आजही मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे आहेत. बॅ. अंतुले यांनी त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. बॅ. अंतुले यांची कन्या निलम अंतुले यांच्या नावाचा एक पर्याय काँग्रेसकडे आहे. त्यासाठी त्यांना रायगड जिल्ह्यातील राजकारणात सकिय होण्यासाठी तयार करावे लागेल. त्याकरिता त्यांचे मन वळवावे लागेल. त्याचबरोबर जिल्ह्यात सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग करावा लागेल. एक जिल्हाध्यक्ष असला तरी काही लोकांची समिती तयार करून त्यांच्यावर जबाबदारी टाकावी लागेल.

आपल्यानंतर रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे काही खरे नाही, हे बॅ. ए. आर. अंतुले यांनी हेरले होते. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष एक  असला तरी जिल्ह्यातील काही लोकांचे सामूहिक नेतृत्व तयार केले होते. टॉप नेटची समिती नेमून त्यांच्यावर काही जबाबदार्‍या टाकल्या होत्या. त्याचे काय झाले, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभी करायची असेल आणि काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर एक प्रभावी नेतृत्व शोधून त्या नेत्याच्या खांद्यावर या जिल्ह्याची धुरा द्यावी लागेल.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply