Breaking News

सकारात्मक मानसिकतेवर भर

लोकसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आटोपले असून एकूण परिणाम घोषित होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध इतर जवळजवळ सर्व पक्ष असे हे विषम युद्ध आहे. भाजप सत्तेवर येणारच असेल तर मोदींऐवजी दुसरा कोणीतरी मऊ भाजपवाला पंतप्रधान व्हावा म्हणूंनही हितसंबंधी शक्तींकडून फासे टाकण्यास सुरवात झाली आहे. सर्वसामान्य माणसाने मतदानाचे कर्तव्य बजावले असून वाट पाहण्याचा हा जो काळ तो कसा घालवायचा हा गंमतवजा चिंतेचा त्याच्यापुढे प्रश्न आहे. जर हे  युद्ध असेल तर ते इतक्यात संपणार नाही आणि ते निर्विवादपणे जिंकण्यासाठी मोदींना अनेकानेक भारतीयांचे मन:पूर्वक सहकार्य लागेल. अशा बिकट परिस्थितीत ‘प्रतिकूल तेच घडेल’ हा सावरकरांचा सिद्धांत उपयुक्त ठरू शकतो.

समाजाचे सर्वसाधारणपणे दोन भाग असतात. सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेला आणि नसलेला समाज. पहिल्या गटातील समाजाची दृष्टी दूरवरचे पाहणारी  असू शकते. दुसरा समाज अल्पदृष्टी  असतो. सद्सद्विवेक बुद्धी जागृत झालेला फार मोठा समाज मोदींनी गेल्या पाच वर्षात निर्माण केला आहे.

पराक्रम, मुत्सद्दीपणा, आत्मीयता, समरसता आणि विशुद्ध आचरण ह्या बळावर मोदींनी हे ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणले. ह्या देशात असे काही घडू शकते असे गेल्या सत्तर वर्षात लोकांना जे वाटले नव्हते ते सव्वाशे कोटींनी इच्छा केली तर सहज घडू शकते हा विश्वास मोदींनी निर्माण केला. पाकिस्तानला आणि त्यांच्या प्रेरणेने लढणार्‍या इस्लामी आतन्कवाद्यांना घरात घुसून मारता येते हे लोकांना खरे वाटू लागले. नेहरूंच्या पाकिस्तानकडे झुकलेल्या अलिप्ततावादी धोरणाने जगाच्या पाठीवर भारताची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली होती. भारताची प्राचीनता, विशाल लोकसंख्या, अगणित आकाशाएव्हढी अंगभूत ऊर्जा, आणि हेवा वाटावा असे अंगवळणी पडलेले उदात्त तत्वज्ञान ह्या गुणसंपदेवर जागतिक राजकारणात भारताला जे मानाचे स्थान  मिळायला पाहिजे होते ते गेल्या पाच वर्षात दिसू लागले आहे. एक चायवाला म्हणून काँग्रेस संस्कृतीने ज्याची हेटाळणी केली त्या सामान्य माणसाने म्हणजे जो पहिल्यांदा सांसद आणि लगेच पंतप्रधान झाला त्याने म्हणजे पूर्णपणे अननुभवी माणसाने मुत्सद्दीपणा कसा असतो आणि तो किती सावधपणाने, कष्टाने आणि दूरदृष्टीने  मिळवायचा असतो ह्याचे प्रत्यंतर दाखविले. सत्तर वर्षापूर्वी विश्वासघाताने काँग्रेसने जन्माला घातलेले पाकिस्तान नावाचे पाप निष्प्रभ करण्याला मोदींचा गेल्या पाच वर्षातला मुत्सद्दीपणा कामाला येणार आहे. गेल्या पाच वर्षात भारतातील विविध समाज घटकांना परस्परांविषयी घट्ट अशी जी आत्मीयता आणि समरसता वाटत आहे आणि त्यातून जो नवा एकजीव समाज आकारास येणार आहे ती सर्वात मोठी उपलब्धी असणार आहे. मोदींना मूलभूत परिवर्तन हवे आहे, पारतंत्र्याचे विकार नष्ट करून स्वतंत्रतेचे रक्त शरीरभर खेळवायचे आहे. काँग्रेस संस्कृतीने भारतीयांची मानसिकता नकारात्मक केली. ती मोदींना सकारात्मक करायची आहे आणि हे काम इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवण्याइतके अवघड आहे. पण मोदींनी हे काम पाच वर्षात साधून दाखविले. आता ही सकारात्मक मानसिकता पुढच्या पाच वर्षात त्यांना विजिगीषुत्वाकडे वळवायची आहे. हे काम साधासुधा वाटणारा हा संघ प्रचारक करू शकतो हा विश्वास आपल्या अत्यंत विशुद्ध आचरणाने मोदींनी लोकांमध्ये निर्माण केला. एकही दिवस सुट्टी न घेता अठरा तास मोदींनी काम केले. स्वतःची प्रकृती तरुणांना लाजवेल अशी धडधाकट ठेवली. खंडप्राय देशाचे शासन सुविहितपणे चालविण्याचे आणि नव्या समाज बांधणीचे रचनात्मक काम त्यांनी केले. एकाच वेळी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला निष्प्रभ आणि चीनला अनुकूल कसे करायचे ह्याचा विचार चालू असतांना दुसरीकडे गावाकडच्या गांजलेल्या महिलेला चूल पेटविण्यासाठी गॅस कसा मिळेल ह्याची योजना घोळवायची अशी दोन टोकाची कामे त्यांनी करून दाखविली. आतापर्यंत झालेल्या जगातील सर्व पंतप्रधानांमध्ये आणि राष्ट्रप्रमुखांमध्ये एव्हढा सृजनशील कामाचा डोंगर कोणी उपसला असेल का ह्याचे संशोधन व्हायला हवे. सारांश हा की मोदींनी इतकी सेवा केली आहे नि ऊर्जा दिली आहे की त्यांना मला मत द्या असे म्हणण्याचीही वेळ येता कामा नये.लोकांनी आपणहून त्यांना भरघोस मतांनी स्थानापन्न केले पाहिजे. एकट्या भाजपाला निर्विवाद बहुमत मिळेल असे मोदी सांगतात तेव्हा त्यांच्या मुखातून त्यांचे गेल्या पाच वर्षातले काम बोलत असते.

वीस वर्षांपूर्वीपर्यंत मी जेव्हा प्रत्यक्ष बातमीदारी करीत असे तेव्हा अचूक राजकीय भविष्य वर्तवू शकत असे. ते एक शास्र आहे. आपण दिवसभरात ज्यांच्याशी बोलतो त्यातले किती घ्यायचे आणि किती  सोडायचे ह्याचे अचूक गणित तुम्हाला मांडता आले तर पुढील घटनांचा वेध घेणे जमू शकते. काँग्रेसला 140 जागा मिळतील असे मी 1990 च्या विधानसभा निवडणुकीच्या 15 दिवस आधी मिड-डेमध्ये लिहिले होते. तसेच झाले. तेव्हढ्याच जागा मिळाल्या. त्यासाठी मी दोन महिने आधी शंभराहून अधिक आमदारांशी गप्पा माराव्या तसे बोललो होतो. शिवसेनेच्या रमेश प्रभूंच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना सत्तावीस हजार मते मिळतील ,त्यांचे प्रतिस्पर्धी प्रभाकर कुंटे आणि प्राणलाल व्होरा ह्यांना प्रत्येकी त्यांच्यापेक्षा दहा हजार मते कमी मिळतील असे मी लिहिले होते. त्यासाठी तीन दिवसाचा मतदारसंघाचा दौरा केला होता. मी जेव्हढी सांगितली तेव्हढीच मते तिघांनांही पडली आणि बाळासाहेब ठाकर्‍यांनी मार्मिक साप्ताहिकात चौकट टाकून कौतुक केले होते.  आज मी चांगला हिंडताफिरता असलो तरी माझा तेव्हढा लोकसंपर्क राहिलेला नाही. तरी मला असे वाटते की सामान्य माणसाची सद्सद्विवेक बुद्धी हे  प्रमाण मानले तर मोदींच्या कामावर भाजपला निर्विवाद बहुमत मिळायला पाहिजे.

पण अतिस्नेह: पापशंकी असे म्हणतात. त्यादृष्टीने विचार केल्यावर काही लोकांची अल्पदृष्टी काय करेल ह्याची चिंता वाटते. बाराशे वर्षे पारतंत्र्यात राहिलेला हा देश आहे. आपला शेवटचा शत्रू जो इंग्रज त्याने आपल्या राष्ट्रीयत्वाविषयी आपल्याला भ्रमित केले. एकात्मता साधली जाणार नाही असे नकारात्मक वातावरण निर्माण केले आणि ह्या प्राचीन परंपरासमृद्ध राष्ट्राची धर्मशाळा बनवून हा देश सोडला. त्यामुळे ज्यांनी अखंड भारताचे वचन देऊनही फाळणी केली अशांच्याच हाती देशाची सूत्रे सोपविली गेली. ह्याच लोकांनी देशाच्या सैनिकीकरणाची उपेक्षा करून चीनकडून सामरिक पराभव पत्करला. पण विचारवंतांनी काँग्रेस संस्कृतीचा राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने चिकित्सक अभ्यास केला नाही. असा अभ्यास जे करू पाहत होते त्यांना वैचारिक क्षेत्रात गावकुसाबाहेरचे मानले गेले. काँग्रेस संस्कृती ही ब्रिटिशांचा वारसा घेऊन संसार करणारी संस्था आहे असे मानणारा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाला आहे. मोदी सर्वप्रकारच्या पारतंत्र्याविरुद्ध लढत आहेत  आणि देशाला खर्‍या अर्थाने स्वतंत्र करू पाहत आहेत. ही साधी लढाई नाही. हे महायुद्ध आहे. जे भारताला जननीस्वरूपात पूजतात आणि तिच्या सुखशांतीवाचून दुसरा विषय ज्यांच्या मन:चक्षुसमोर नसतो त्यांनी अतिशय गांभीर्याने ह्या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. जयापराजयाचा कसलाही विपरीत परिणाम त्यांचेवर होता कामा नये. काँग्रेस सत्तेसाठी राजकारण करते आणि भाजप विशिष्ठ तत्वद्न्यासाठी राजकारण करतो हे अंतर जर खरे असेल तर भाजपाला निर्विविद बहुमत मिळूनही प्रचारकांना काम उरतेच. भाजपमध्ये मोदींची संख्या वाढायला हवी. काँग्रेस संस्कृती ही सर्वभक्षक संस्कृती आहे. ती चांगल्याची शत्रू आहे आणि वाईटाची पाठराखण आहे. काँग्रेस संस्कृतीचा राष्ट्रीयत्वाला आणि एकात्मतेला विरोध आहे. काँग्रेस संस्कृतीचा स्वातंत्र्यालाच विरोध आहे. ते पारतंत्र्यात सुखी आहेत. अजून कमीतकमी एक पिढीतरी शासकीय आणि अशासकीय पातळीवर राष्ट्रवाद आणि एकात्मता ह्या विषयावर विराट स्वरूपाचे प्रबोधन करावे लागणार आहे. जसा प्रत्येक इंग्रज इंग्लंडनिष्ठ असतोच तसा प्रत्येक भारतीय भारतनिष्ठ असलाच पाहिजे. अशी असंख्य उदाहरणे दाखविता येतील की काँग्रेसने आपल्या सभासदांना भारतनिष्ठ नसलात तरी चालेल ,काँग्रेसनिष्ठ राहिलात तरी पुरे अशी सवलत दिली आहे. हा सवलतींचा प्रभाव पुसायचा आहे आणि ते काम भाजप जिंकला तरी त्याला पाच वर्षे पुरेल इतके मोठे आहे. असो.

-अरविंद विठ्ठळ कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply