मावळ : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 59 टक्के मतदान झाले आहे. झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोण, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेणार अशा चर्चेचे गुर्हाळ सध्या परिारात सुरू आहे. केवळ चर्चाच नाही, तर मावळ तालुक्यात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की आघाडीचे पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला अधिक मताधिक्य मिळणार यावरूनही गावोगावी लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात उतरल्याने ही लढत चुरशीची झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीनेही श्रीरंग बारणे यांच्या रूपात तुल्यवान उमेदवार दिला आहे. त्यामुळे सलग 10 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळचा गड शिवसेना राखणार की सेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळाचा गजर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे लोकसभेतील विधानसभानिहाय मताधिक्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीतील आमदारकीसाठी इच्छुक असणार्यांचे भवितव्य ठरणार आहे. मावळातील कौल युती की आघाडीच्या बाजूने लागणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.