नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची सात गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील 32 गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा सिडकोने जाहीर केला आहे.
सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून खोपटा नव नगरातील 6 गावांसाठी (बारापाडा, कर्नाळा (तारा), डोलघर, साई, कासारभट, दिघाटी) विकास आराखडा तयार करून दिनांक 3 एप्रिल 2008 रोजी प्रकाशित केला होता. महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार 4 एप्रिल 2012 रोजी खोपटा नव नगरातील सहा गावांसाठी विकास नियंत्रण नियमावलीसह विकास आराखड्यास मंजूरी दिली. यानंतर महाराष्ट्र शासनाने 2 जून 2021 रोजीच्या पत्रांद्वारे खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील उर्वरित 26 गावांचा विकास आराखडा तयार करून प्रकाशित करण्यासाठी सिडकोला निर्देश दिले होते.
खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्राच्या विकासाचे उद्दिष्ट पायाभूत आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे व विकासाच्या विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे आहे. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार खोपटा नव नगरतील सहा गावांच्या मंजूर विकास आराखडा तसेच उर्वरित 26 गावांचा तयार करण्यात येणारा विकास आराखडा परस्पर सुसंगत असावा यासाठी खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील उर्वरित 26 गावांचा विकास आराखडा तयार करीत असतांना सहा गावांच्या मंजूर असलेल्या विकास आराखड्याची फेरतपासणी करून त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
या संदर्भातील सूचना सिडकोतर्फे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर सूचना व नकाशाची प्रत सिडकोचे संकेतस्थळ हीींिं://लळवले.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
नव नगर अधिसूचित क्षेत्रातील 32 गावांचा विकास आराखडा नव्याने तयार झाल्यानंतर निश्चितच खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्राचा उत्तम विकास होईल व हा परिसर सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्णरित्या विकसित झाल्यावर एक सुनियोजित शहर म्हणून नावारूपास येईल यात शंका नाही. त्याचप्रमाणे यामुळे विविध क्षेत्रात विकासाच्या सुवर्णसंधी उपलब्ध होतील.
-डॉ. संजय मुखर्जी, एमडी, सिडको