वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष आता मुंबई-ठाण्यासारख्या शहरी भागांत किती उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे हे यातून स्पष्ट होते. 1999 ते 2005 या कालावधीत महाराष्ट्रात बिबळ्यांच्या हल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला होता तर 902 जण जखमी झाले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात या समस्येने अतिशय उग्र रूप धारण केले होते. परंतु आजतागायत या प्रश्नावर एखादे शास्त्राधारित धोरण राबवले गेल्याचे दिसत नाही.
बिबळ्याचे मानवी वस्तीत शिरणे, संचार करणे, भक्ष्यासाठी कोंबड्या-कुत्र्यांवर हल्ले करणे, काही वेळा माणसांवरही हल्ले करणे महाराष्ट्रालाच काय अवघ्या भारतालाही नवीन नाही. तरीही ठाणे शहरात कोरम मॉल या भरवस्तीतील, पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या परिसरात येणे ही भुवया उंचावणारीच घटना आहे. पहाटे पाचच्या सुमारास मॉलच्या कर्मचार्यांना हा बिबळ्या पार्किंगमध्ये हिंडताना दिसला. तिथल्या सीसीटीव्हीवर त्याचा मॉलच्या परिसरातला संचार स्पष्टपणे टिपला गेला आहे. तिथून तो मागेच असलेल्या एका बड्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये शिरला. हा अवघा परिसर नागरी वस्तीने घेरलेला आहे. जवळपासच एक शाळा देखील आहे. ही घटना परिस्थितीचे गांभीर्य पुरते अधोरेखित करते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून जवळपास तीन किलोमीटरचे अंतर कापून हा बिबळ्या तिथवर आल्याचे वनअधिकारी सांगतात. या संचारादरम्यान त्याने वाटेत कुणावर हल्ला केला का याचा शोध घेतला जाणार आहे. यावर उपाय म्हणून देशभरातील वनाधिकारी यासंदर्भात एकच मार्ग अवलंबताना दिसतात. बिबळ्यांना पकडायचे आणि नजीकच्या वा दूरच्या जंगलात नेऊन सोडायचे. ही कथित उपाययोजना ही समस्येपेक्षाही अधिक भीषण असल्याचे तज्ज्ञांनी अनेकदा बजावले आहे. पकडलेल्या बिबळ्यांना त्यांच्या निवासाच्या प्रदेशापासून दूर अन्यत्रच्या जंगलात नेऊन सोडले असता त्या परिसरातील बिबळ्या-मानव संघर्षात वाढच होते असे जगभरातील अनेक पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. बिबळ्या हा आपली हद्द सांभाळून राहणारा प्राणी आहे. त्याला त्याच्या नैसर्गिक वास्तव्याच्या परिसरापासून दूर नेल्यास तणावामुळे त्याच्या हिंस्त्र प्रवृत्तीत वाढच होते. मायक्रोचिप बसवलेल्या बिबळ्यांच्या वर्तनाच्या अभ्यासातून हे आढळून आले आहे. अन्य वन्य प्राण्यांच्या हद्दीत तो वास्तव्य करत नाही. तो तिथून बाहेर पडतो आणि पुन्हा आसपासच्या मनुष्यवस्तीत शिरकाव करतो. देशात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांनी बिबळ्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेले दिसते. अशा परिसरांत माणसांवरचे हल्ले तुलनेने कमी आढळतात. तेच या बिबळ्यांना स्थलांतरित केल्यास मात्र हे बिबळे माणसांवर हल्ले करताना दिसतात. एखाद्या परिसरात एक बिबळ्या पकडून दूरवरच्या जंगलात सोडून दिला तरी कालांतराने अन्य बिबळे त्या परिसरात शिरकाव करताना आढळतात. त्यामुळेच बिबळ्यांचे स्थलांतर हा समस्येवरील उपाय नाही असे वन्यअभ्यासक पुन्हा पुन्हा सांगत आहेत. मग या समस्येवर उपाय काय? तर बिबळ्याला त्याचे अन्न व निवारा उपलब्ध असेल तर मनुष्यवस्ती नजीक परिस्थितीशी जुळवून घेऊन वास्तव्य करतो असे सखोल पाहणीतून आढळले आहे. त्यामुळे जिथे मानवी वस्त्यांवरील हल्ले फारसे नाहीत तिथे पर्यावरणीय समतोल सांभाळण्याची व्यवस्था करणे हाच उत्तम उपाय असल्याचे तज्ज्ञ सुचवतात.