Breaking News

संयमी, संतुलित नेतृत्व..!

अनेक कारणांमुळे देवेंद्र आणि माझ्यात एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. देवेंद्रच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. जितका आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. संयमी, आज्ञाधारक, तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे.

देवेंद्रला मी अगदी लहानपणापासूनपाहत आलो आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाणारा, नंतर कायद्याचं शिक्षण घेणारा आणि नंतर नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता उपमुख्यमंत्रीपद ही देवेंद्रची वेगवेगळी रूपे मी पाहिली आहेत. लोभस, गोड स्वभावाचा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा देवेंद्र अत्यंत संयमी आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचा आहे. कॉलेज जीवनापासूनच त्याने आपल्यातील नेतृत्वाचे गुण दाखविले होते. विद्यार्थीदशेपासून त्याच्या अभ्यासू वृत्तीचा प्रत्यय येत होता. देवेंद्र एका सुसंस्कारित कुटुंबातून आला आहे. त्यामुळे त्याच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनात घराण्यातून आलेले संस्कार प्रकट होताना दिसतात. संपूर्ण फडणवीस कुटुंब हे रा.स्व. संघाला वाहिलेले कुटुंब आहे. देवेंद्रचे वडील गंगाधरराव हे नागपूरचे उपमहापौर होते. पुढे ते नागपूर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. देवेंद्रचे काका बाळासाहेब हे भारतीय मजदूर संघाचे काम करीत असत.
देवेंद्रच्या आई सरिताताई या अमरावतीच्या कलोती या राजकारणाशी संबंधित परिवारातल्या आहेत. त्यामुळे देवेंद्रला सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. वडील गंगाधरराव यांचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा असल्याने त्यांच्या घरात माणसांचा सतत राबता असायचा. विविध जाती-जमातींची माणसे त्यांच्या घरात मोकळेपणाने वावरत असत. कुटुंबातील या वातावरणामुळे देवेंद्रचे व्यक्तिमत्त्व लहानपणापासूनच सर्वसमावेशक बनत गेले. माणसावर लहानपणी झालेले संस्कार त्याच्या वागण्या-बोलण्यातून आयुष्यभर प्रकट होत असतात. कर्करोगामुळे देवेंद्रजींच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मी निवडणूक लढवावी, असा आदेश पक्षाने मला दिला. गंगाधररावांचे काम आणि पक्षाचे संघटन यांच्या जोरावर मी पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. त्या काळात देवेंद्रचे घर हे माझ्या प्रचाराचे केंद्र बनले होते. अनेकदा मी देवेंद्रच्या घरात राहिलो आहे. देवेंद्रच्या आईने माझी मुलासारखी काळजी घेतली. मला आवडणारं जेवण स्वतः बनवून त्या मला देत असत. या व अशा अनेक कारणांमुळे आमच्या दोघांमध्ये वेगळेच कौटुंबिक नाते तयार झाले आहे. त्या देवेंद्र आणि त्याच्या मित्रांनी माझ्या प्रचारात केलेली कामे मला आठवताहेत. त्याच्यातील नेतृत्वाचे गुण त्यावेळीच माझ्या लक्षात अले होते. मी त्याला महापालिका निवडणुकीसाठी उभे करण्याचे ठरविले होते. त्याच्या आईजवळ मी माझा मनोदय बोलून दाखल त्याची तयारी असेल, तर आमची काहीच हरकत नाही, असे कुटुंबी-डून सांगण्यात आले. पुढे तो नगरसेवक म्हणून निवडून आला. सर्वात कमी वयात महापौर होण्याचा मानही त्याने मिळविला. त्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे
शांतपणे ऐकून घेतो. या वृत्तीमुळे तो महापौर असताना शेकडो लोक त्याच्याकडे नाना सूचना घेऊन यायचे. ज्यांच्या सूचना स्वीकारणे शक्य आहे त्यांच्या सूचना तो स्वीकारीत असे. ज्यांच्या सूचना स्वीकारणे शक्य नसेल त्यांना व्यवस्थित पटवून सांगत असे. मुख्यमंत्री झाल्यावरही तो येणार्‍या प्रत्येक एसएमएसला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असे. सर्वांना सहज उपलब्ध होणारा, विधायक सूचनांचा आदर करणारा मुख्यमंत्री असा लौकिक त्याने मिळविला. दिलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळेच मी राज्यात मंत्री, विरोधी पक्षनेता व प्रदेशाध्यक्ष असताना त्याच्यावर अनेक जबाबदार्‍या सोपविल्या. मात्र, हे करताना कुणाचीही खुशमस्करी करण्याचा त्याचा स्वभाव नाही. जितका संयमी, आज्ञाधारक तितकाच न दुखावता स्पष्ट बोलणारा, आपलं म्हणणं ठोसपणे मांडणारा असा देवेंद्र आहे. मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा हा स्वभाव बदलला नाही. जेव्हा केव्हा त्याला माझ्या सल्ल्याची गरज भासायची तेव्हा तो माझ्याकडे नि:संकोचपणे यायचा. आजही येतो. देवेंद्र महाराष्ट्रासारख्या राज्याचा लोकप्रिय मुख्यमंत्री बनला, ही बाब माझ्यासाठीही आनंदाची होती. त्याच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळपास सर्व निवडणुकांत भरघोस यश मिळवले. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्याने अत्यंत कणखर भूमिका बजावली. कोव्हिडच्या काळातही त्याचा कामाचा झपाटा थांबला नाही. यादरम्यान वडीलकीच्या नात्याने मी त्याला प्रकृतीची काळजी घे, असा सल्ला अनेकदा दिला. कारण कोरोनाचा विषाणू कधी आणि कोठून शरीरात प्रवेश करेल याचा नेम नाही, तरीही कामात झोकून देणे हा त्याचा स्वभाव आहे. आज केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अत्यंत आनंदाने स्वीकारत राज्याच्या हितासाठी तो पुन्हा तितक्याच जोमाने कार्यरत झाला आहे, याचे विशेष कौतुक आहे. नागपूरमध्ये कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, त्यावेळी आमच्या राज्याच्या, विदर्भाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होते. मी त्याला अनेक गोष्टी सांगतो. मी पूर्वी सांगितलेल्या गोष्टी केल्या हे तो आवर्जून सांगतो. अनेक संकटांतून तावून सुलाखून निघालेल्या या तरुण नेत्याला देशसेवा करण्यासाठी उदंड आयुष्य मिळो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

  • नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री,रस्ते परिवहन व राजमार्ग भारत सरकार

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply