Breaking News

दिलासा देणारा दिवस

जन्माष्टमीचा गुरुवारचा दिवस अनेक अर्थांनी महाराष्ट्राला दिलासा देणारा ठरला. दिवसभर राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीराजा सुखावला, तर यंदाच्या दहीहंडी उत्सवात जोरदार उत्साहाने सहभागी झालेले गोविंदाही पावसाच्या आगमनाने आनंदून गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील जीआर काढून मराठा आंदोलकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.

जन्माष्टमीचा दिवस महाराष्ट्रात उगवला तोच राज्याच्या बहुतांश भागात पाऊस घेऊन. कृष्णजन्माच्या पौराणिक कथेत वादळी पावसाचा उल्लेख आहे. अगदी तितका पाऊस नसला तरी उष्मा दूर करून गारवा निर्माण करणारा पाऊस गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेला दिसला आणि मुंबई-ठाण्यातील दहीहंडीच्या उत्सवाची रंगत पावसाने दिवसभर हजेरी लावून आणखी वाढवली. जुलै महिन्यात पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र वरुणराजाने दीर्घ विश्रांती घेतली. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाणीसाठ्यात आधीच असलेली तूट पाहता यंदाच्या अपुर्‍या पावसानंतर राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी तरी गाठतील का नाही अशी चिंता अद्यापही आहेच. विशेषत: मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा सर्वाधिक जाणवू लागल्या आहेत. इतरही अनेक भागांमध्ये खरीपाची शेती संकटात आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट ओढवल्यासारखी परिस्थिती असतानाच दोन दिवसांपूर्वी हवामानखात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली. या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून घाट माथ्यावर मध्यम ते हलका पाऊस सुरू झाला, परंतु जन्माष्टमीच्या दिवशी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना काहिसा दिलासा मिळालेला दिसला. अर्थात, हा पाऊस दोन-चार दिवसांचा पाहुणा ठरू नये ही चिंताही सोबत आहेच. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेमुळे दहीहंडीचा उत्साह मुंबई-ठाण्यात शिगेला पोहचलेला दिसला. गोविंदा पथकांच्या जल्लोषासह लोकांची प्रचंड गर्दीही प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी दिसून आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी महायुतीची अनेक नेतेमंडळी व कलाकारांनी दहीहंडीच्या उत्सवाला हजेरी लावली. गोविंदांनी थरावर थर रचत स्वत:चेच विक्रम मोडीत काढण्याचा प्रयास केला. गेले अनेक दिवस पुण्यातील आणि राज्याच्या इतर भागांतील कार्यक्रमांमुळे प्रचंड चर्चेत असलेल्या गौतमी पाटील हिने मागाठणे येथील दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला. सेलेब्रिटींच्या उपस्थितीमुळे दहीहंडी उत्सवात सहभागी असणारी तरुणाई आनंदून गेली. रोजच्या धकाधकीच्या जगण्याला जिद्दीने तोंड देण्याचे बळ उत्सवांचा जल्लोष देतो. दरम्यान, आजच्या जन्माष्टमीच्या दिवशी एका शासन आदेशाची प्रतीक्षाही होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने या संदर्भात आज शासन आदेश काढून मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना दिलासा दिला. मराठा आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. निजामकालीन पुरावे असणार्‍यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करून कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचा जीआर गुरुवारी काढण्यात आला. जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही सरकारने केली आहे. सरकारने उचललेल्या या सकारात्मक पावलाला जरांगे कसा प्रतिसाद देतात ते येणार्‍या काळात दिसेलच.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply