तुला चार दशकातील सिनेपत्रकारितेने काय दिले असा प्रश्न अधूनमधून कोणी मला करत असतोच. त्यावर मी म्हणतो, अनेक सकारात्मक गोष्टी आवर्जून सांगता येतील. त्यात एक आहे, अनेक नामवंतांच्या लहान मोठ्या असंख्य भेटीगाठी आणि त्यात एक उल्लेखनीय नाव, आशा भोसले यांची भेट.
साधारण सतरा वर्षांपूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज येथे आपल्या एका कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आमंत्रित केले असता आशा भोसले यांच्या भेटीचा योग आला… आणि असा काही सुखावलो. गतवर्षीदेखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईत आयोजित करण्यात आलेल्या आशा भोसले यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाची माहिती करून देण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांना आवर्जून मी एक प्रश्न केला (यू ट्यूबवर ही पत्रकार परिषद उपलब्ध आहे.)
आज हे सांगण्यामागचे कारण काय?
चुरा लिया है तुमने जो दिल को
नजर नहीं चुराना सनम
बदल के मेरी तुम जिंदगानी
कहीं बदल न जाना सनम
या कायमच तारुण्यात असलेल्या गाण्याचे वय एकावन्न झाले आहे. तरीही ते गाणे वीस वा पंचविशीतच आहे. आशा भोसले यांचे स्वतःचे एक हे आवडते गाणे. काहींच्या डोळ्यासमोर नासिर हुसेन निर्मित व दिग्दर्शित ’यादों की बारात’ (मुंबईत रिलीज 9 नोव्हेंबर 1973. एकावन्न वर्ष पूर्ण झालीदेखील)मधील झीनत अमान, विजय अरोरा, गिटार आणि दोन ग्लास एकमेकांवर हळूवार वाजवली जातात असा अख्खा ’सीन’ आला असेल. काय भारी गाणे आहे हो. काही गाण्यांना वय नसते. काळाची मर्यादा नसते. चित्रपट पडद्यावरून उतरतो. रिळे गोडाऊनमध्ये जातात. चित्रपट मागे पडतो. फ्लॅशबॅक सदरात जमा होतो, पण काही गाणी मात्र रसिक श्रोत्यांची पिढी बदलली, गाणे ऐकण्याच्या (रेडिओ ते डिजिटल), पाहण्याच्या (चित्रपटगृहाच्या पडद्यावर यापासून ते हातातील मोबाईलवर, ओटीटीवर) पद्धती बदलल्या तरी ती ’तरुण’च राहतात. ही किमया गीतकार, संगीतकार व पार्श्वगायकाची असते.
काही गाण्यांना वय नसते. ती देव आनंदप्रमाणे सदैव चैतन्यमय असतात ती कधीच जुनी होत नाहीत (तरी ’मला जुनी गाणी फार आवडतात’ असं का बरे म्हणतात?) कितीदाही ऐकली, आठवली, गुणगुणली, पाहिली तरी कायमच तारुण्यात असतात. चुरा लिया… अगदी तस्सेच.
आजच्या सोशल मीडियात तुमच्याही पाहण्यात एक व्हिडीओ आला असेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आशा भोसले ‘चुरा लिया…’चा अंतरा गायल्या. तेव्हाही आशा भोसले एक्याण्णव वयाच्या वाटत नाहीत (त्यांनाही वय ही गोष्ट लागू होत नाही) आणि उपस्थितही या वेळी ठेका धरतात. स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्यातील तो क्षण आहे. या गाण्यासाठी ’यादों की बारात’च्या इपी/एलपी/थर्टी थ्री तबकड्या रेकॉर्ड ब्रेक विकल्या गेल्या, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्समध्ये वन्स मोअर आठ आण्याचे नाणे टाकले गेले यात काहीच आश्चर्य नाही. चित्रपटाची गीते मजरुह सुल्तानपुरी यांची असून संगीत राहुल देव बर्मनचे आहे. हे गाणे आशा भोसले व मोहम्मद रफी यांनी गायलंय. तरी आशा भोसले यांच्यासाठी ते जास्त ओळखले जाते. काय भारी गायलंय नि काय पिक्चरराझेन झालंय. ज्याला वेल पॅकेज म्हणतात ते असेच गाणे असते.
गाण्याची सिच्युएशन, त्याचा मुखडा, त्याचे प्रेझेंटेशन, गाण्याची सुरुवात, त्याचा अंतरा, एका छोट्याशा पार्टीतील हळूवार प्रेमाची कबूली, आजूबाजूचे सगळेच हे गाणे ऐकताहेत; मोहक मादक आकर्षक झीनत अमान, ’सभ्य रूपातील’ विजय अरोरा, दोघांची नजरानजर, खाणाखुणा, भावमुद्रा, गिटारवादन, गाण्याची वाढती रंगत. या गाण्यासाठी नाझ चित्रपटगृहात मी हा चित्रपट सात आठ वेळा वेगवेळ्या अॅन्गलमधून पाहिला. कधी दोन रुपये वीस पैशात स्टॉलचा पब्लिक म्हणून, तर कधी तीन रुपये तीस पैशात अप्पर स्टॉलचा पब्लिक म्हणून पाहिला. चार रुपये चाळीस पैशाचे बाल्कनीचे तिकीट फार महाग वाटे. ही त्या काळातील मध्यमवर्गीयांची मानसिकता. पिक्चरने पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला.
आशा भोसले आणि राहुल देव बर्मन यांनी कायमच टॉपचा परफॉम दिला. कधी जोडीला मोहम्मद रफी अथवा किशोरकुमार. ओ मेरे सोना रे, आजा आजा मै हू प्यार तेरा, ओ हसिना जुल्फो वाली जाने जहा (तिसरी मंझिल), पिया तू अब तो आ जा (कारवा), दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण), ये वादा रहा (यह वादा रहा), दुनिया मे लोगों को (अपना देश) यापासून कत्रा कत्रा, मेरा कुछ सामान (इजाजत) पर्यंत केवढी तरी लोकप्रिय गाणी आहेत. त्यात चुरा लिया… एकदम हटके नि सुपर. तरुण व टवटवीत.
आशाजींनी झीनत अमानचा मूर्तिमंत मधाळपणा आपल्या गायनात परफेक्ट पकडला. जणू झीनत गातेय असं वाटतं. ’दम मारो दम’पासूनचे ते हिट्ट व फिट्ट समीकरण. ते शम्मी कपूर दिग्दर्शित ’मनोरंजन’ (1974)मध्ये चोरी चोरी सोला सिंगार करूंगी या गाण्यातही छान जमून आलंय. आपण कोणत्या अभिनेत्रीसाठी पार्श्वगायन करतोय हे आशा भोसले नेहमीच जाणून घेत गात आणि गाणे आणखी खुललं जाई. झीनत अमान अभिनयासाठी कधीच ओळखली गेली नाही. अनेक गाण्यात मात्र ती मस्त खुलली, रमली. तिला चित्रपट गीत संगीतातील नक्कीच समजत होते हे अनेक चित्रपटांतील गाण्यात दिसले. या गाण्यात ते जास्त दिसले. मुळात ती मॉडेल आणि आपलं सेक्स अपील हेच आपलं चित्रपटसृष्टीसाठीचं भांडवल हे सत्य ती मनोजकुमार (रोटी कपडा और मकाम), राज कपूर (सत्यम शिवम सुंदरम), बी.आर. चोप्रा (इन्साफ का तराजू) या बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारताना ती विसरली नाही. विजय अरोराही अभिनयासाठी ओळखला गेला नाही. याच गाण्यामुळे तो रसिकांच्या पुढील पिढीतही माहीत झाला. एक हिट गाणे असं बरंच काही देत असते. ते एका काळातील चित्रपट पुढील पिढीत नेत असते. म्हणूनच चित्रपटात दर्जेदार गाणी हवीत. जी पूर्वी चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, मेहबूब खान, गुरूदत्त, के.असिफ विजय आनंद यांच्या चित्रपटात हमखास असत.
निर्माता व दिग्दर्शक नासिर हुसेन हे मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे हुकमी नाणं. ’स्टोरीपेक्षा गीत संगीत व नृत्य यातून पिक्चर खुलवणारे’. आपला पहिलाच चित्रपट ’तुमसा नहीं देखा’ (1957)पासूनचे त्यांची ही खासियत. यू तो हमने लाखो हंसी देखी है, जवानी मस्त मस्त, देखो कसम से ही यातील गाणी आजही ऐकावीत/पहावीत. तीच रंगत. नासिर हुसेन यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रगती पुस्तकात गाण्यांवर मनसोक्त मनमुराद आनंद घेतला आणि कलाकारांकडून त्याच मोकळ्या ढाकळ्या मूडमध्ये करून घेत ती रसिकांसमोर आणली. दिल देखे देखो दिल देनेवालो दिल देना सिखो जी, बडे है दिल के काले (दिल देके देखो, 1959), ये आंखे उफ यूं, सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था, जिया ओ जिया कुछ बोल दो (जब प्यार किसीसे होता है, 1961), बंदा परबर थांबलो जिगर, लाखों है यहा दिलवाले (फिर वोही दिल लाया हू. 1963), चुनरी संभाल गोरी, आजा पिया तोसे प्यार दू (बहारों के सपने, 1967), मै ना मिलूंगी, मी सुलताना रे, तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम, 1969), चढती जवानी मेरी चाल मस्तानी, दिलबर दिलसे प्यारे, गोरिया कहां तेरा देश रे, कितना प्यारा वादा (कारवा. 1971)… नासिर हुसेन टच म्हणतात तो हाच. संगीताचा कान आणि डोळे असणारा फिल्मवाला. आणि मग ’यादों की बारात’. याचीही सगळीच गाणी लोकप्रिय. त्यानंतर नासिर हुसेन यांनी हम किसीसे कम नही (1977), जमाने को दिखाना हू (1981), मंझिल मंझिल (1984), जबरदस्त (1985) अशी वाटचाल करताना शेवटचे तीन पिक्चर फ्लॉप झाल्याने दिग्दर्शन संन्यास घेतला तरी गाण्यात कुचराई नाही. ती हिट. नासिर हुसेन व राहुल देव बर्मन जोडी ’बहारों के सपने’पासून जमली ती प्रत्येक चित्रपटात कायम राहिली. नासिर हुसेन निर्मित व विजय आनंद दिग्दर्शित ’तिसरी मंझिल’ (1967) आर.डी. बर्मनच्या कारकिर्दीला मोठीच लिफ्ट देणारा.
’यादों की बारात’ची पटकथा व संवाद सलिम जावेदचे आहेत. पण पिक्चर नासिर हुसेनसाठीच आणि खास करून चुरा लिया… गाण्यासाठी आठवणीत आहे. येथे दिग्दर्शक दिसतोय. या पिक्चरच्या पोस्टर, होर्डिग्ज, थिएटरमधील शो कार्ड्स असे सगळीकडे त्या दिवसात या गाण्यातील झीनत अमान व विजय अरोरा यांना स्थान. आणि ते दिसताच गाणे ओठावर व डोळ्यासमोर येई. गाण्याची लोकप्रियता अशीच भन्नाट व भरपूर हवी. पिक्चरमध्ये धर्मेंद्र, तारीक, इम्तियाज, शेट्टी, अजित यांच्याही भूमिका. लहानपणीच हरवलेले तीन भाऊ मोठेपणी सापडतात आणि एक भाऊ मां बाप के खून का बदला घेतो अशी स्टोरी. (यश चोप्रा दिग्दर्शित वक्त वरून यादों की बारात लिहिताना नैसर्गिक संकटाच्या जागी व्हीलनच्या कारवाया आल्या.)
चुरा लिया…ची डिजिटल युगात अनेकदा विविध स्टाईल नि टोनमध्ये अनेकांनी रिमिक्स केली. मूळ गाण्याची सर येण्याची शक्यता नसतेच. आशाजींच्या देशविदेशातील जवळपास प्रत्येक इव्हेन्टसमध्ये त्या चुरा लिया… त्याच मूळ तरुणाईने व उत्साहात गातात. त्यात त्या स्वतः तल्लीन होतात आणि हाऊसफुल्ल क्राऊडलाही जणू वेड लावतात. गाणे आहेच तसं हो. ऐकताना, पाहताना वय विसरायला लावणारे. चला पुन्हा एकदा नजरेतून बोलणारी झीनत अमान, काहीसा ओशाळलेला विजय अरोरा आणि आशा भोसले व मोहम्मद रफींची एक्स्प्रेशन मेलडी पाहूया…
काळ बदलला, दिवस वेगाने पुढे सरकताहेत, नवनवीन माध्यमे येताहेत (येणार आहेत), काही गाणी मात्र या प्रवासात आपली साथ संगत करताहेत. आपल्या देशातील हिंदी व मराठीसह प्रादेशिक भाषेतील चित्रपट संस्कृतीचे विशेष म्हणजे गीत संगीत व नृत्य. त्याने अनेक रसिक पिढ्यांना भरभरुन आनंद दिला आहे, देत आहे आणि यापुढेही देत राहणार आहे. त्यातीलच एक चुरा लिया है, तुमने जो दिल को…
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)