Breaking News

मृत्यूची भिंत;२६ जण ठार

मुंबई, पुणे, कल्याणमध्ये दुर्घटना

मुंबई, पुणे, कल्याण : प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री जोरदार पावसात मुंबई, पुणे आणि कल्याणमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या तीन दुर्घटनांमध्ये मिळून 26 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालाडमध्ये 18 जण मृत्युमुखी

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर मंगळवारी मध्यरात्री संरक्षक भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला असून, 50हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असताना मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 18 लोक मृत्युमुखी पडले, तर सुमारे 75 जण जखमी आहेत. हे वृत्त समजताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू केले.

दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासन आणि मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुण्यात पुन्हा सहा मजूर मृत

पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून सहा मजूर ठार झाले आहेत. आंबेगाव परिसरात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृत नागरिक हे छत्तीसगडमधील रहिवासी असल्याचे समजते.

आंबेगाव परिसरातील सिंहगड कॉलेज कॅम्पस येथे रात्री 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने बचावकार्यास सुरुवात केली व काही लोकांना बाहेर काढले, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले. ढिगार्‍याखालून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे.

कल्याणमध्ये तिघांचा मृत्यू

कल्याणमध्येही भिंत कोसळली आहे. दुर्गाडी किल्ला परिसरातील शाळेची भिंत मंगळवारी रात्री कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी आहे.

कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या नॅशनल उर्दू शाळेची भिंत रात्री 12.30च्या सुमारास कोसळली. मृतांमध्ये दोन महिला व चिमुकल्याचा समावेेश आहे, तर एक महिला गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply