पर्यटन व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी वाढत असून कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरू पाहत आहे. अशात बीचवर धम्माल करावीशी न वाटली तरच नवल, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता तरुणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. किंबहुना प्राणाशी खेळ करीत आहोत याचेही भान पर्यटक विसरतात. पोलीस यंत्रणा तैनात असूनही दारूच्या नशेत बेधुंद होत प्रसंगी मृत्यूला कवटाळण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या भागाला लांच्छनास्पद ठरतो. तेव्हा पर्यटकांनी सावधपणा बाळगला पाहिजे. त्यांनी आततायीपणा टाळला नाही तर समुद्र किनार्यावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणारच. मग समुद्र मुरूडचा असो की
काशीदचा. दुर्घटना ही दुर्घटनाच असते. लाखमोलाचे जीव गमावतात आणि मृत व्यक्तींच्या पश्चात त्या कुटुंबीयांवर काय बेतते याची कल्पना करवत नाही.
मुरूड समुद्रकिनारी जून महिन्यात एकूण तीन लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे (32) व त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी (28) हे काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले व पाण्याची खोली व पावसात खणलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना घडल्यानंतर अवघ्या चार दिवसांच्या अंतराने उलवे उरण येथील महंमद गनी (25) यांचासुद्धा मृत्यू झाला. जून महिन्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासन सुन्न झाले आहे. काशीद समुद्रकिनारी पर्यटकांसाठी बोर्ड लावूनसुद्धा सदरचा
समुद्र पोहण्यास धोकादायक आहे तरीसुद्धा आजची तरुणाई याकडे दुर्लक्ष करते. पोलिसांनी दटावले तर दारूच्या नशेत पोलिसांनासुद्धा मारहाण करण्याच्या घटना काशीद समुद्रकिनारी घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणार्या पर्यटकांना आळा कसा घालावा, हा मोठा प्रश्न येथील प्रशासनाला पडला आहे. शनिवार व रविवार सुट्यांचा दिवस मिळाला की मुंबई, ठाणे, पुणे येथून येणार्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या संख्येने असते. अशा वेळी या ठिकाणी त्यांनी आणलेल्या चारचाकी गाड्या व त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी नेहमीच पाहावयास मिळते. समूहाने येणारे पर्यटक व सोबत असणारी प्रेयसी यामुळे समुद्रकिनारी पोहचताच त्यांच्या उत्साहाला उधाण फुटते व काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या नादात समुद्रात पोहता पोहता खूप दूर निघून जातात. गरज आहे ती समजूतदारपणाची, परंतु आततायीपणामुळे येथे समुद्रात बुडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.
मुरूड बीचवर 1991 साली महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या सात कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 जुलै 2014 रोजी चेंबूर येथील सहा व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली. फेब्रुवारी 2016मध्ये आबिदा इनामदार कॉलेजच्या तब्बल 14 विद्यार्थ्यांना पोहता न आल्याने प्राण गमवावे लागल्याची घटना तर भयंकर होती. या दुर्घटनेनंतर शिक्षण उपसंचालकांना परिपत्रके काढून सहलींवर एकार्थी निर्बंधच घालणे भाग पडले.
काशीद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक आहे, असे प्लॅक्स लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन बर्याचशा दुर्घटना घडल्याचे पुढे आले आहे. बुडालेल्यांची संख्या 2008पासून 2014पर्यंत 33 असून अलीकडे 23 जूनच्या तीन व्यक्ती धरल्यास हा आकडा 51पर्यंत जाईल. बुडालेल्या व्यक्तींची व्यवसायनिहाय संख्या जरी लक्षात घेतली नाही तरी बहुसंख्य युवक-युवती उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील व आईवडिलांना एकटेच असल्याचे ध्यानात येते.
अशा दुर्घटनांची शांतता समितीमध्ये गांभीर्याने चर्चा होणे अत्यंत गरजेचे वाटते. पोलीस यंत्रणा सतर्क असणे अनिवार्य असून सुरक्षा पथकांना तैनात करून जागोजागी सुरक्षेविषयी फलक लावणे तसेच शनिवार-रविवारी बीट मार्शल नेमणे संयुक्तीक ठरेल.
त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी शनिवार-रविवारी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मेरीटाइम बोर्डाची माणसे नियुक्त केल्यास पर्यटकांचे नाहक जीव जाणार नाहीत. पावसाळ्यात जल वाहतूक बंद असताना ज्याप्रमाणे बोटी बंद असतात, त्याप्रमाणेच अशा कालावधीत कोणताही पर्यटक पोहण्यास जाणार नाही याची सक्त दखल स्थानिक पोलीस व ग्रामस्थांनी घेतल्यास असे अपघात होण्याला प्रतिबंध घालता येऊ शकतो.
-संजय करडे