Breaking News

ट्रेडिंगचे प्रकार, त्याचा कालावधी आणि जोखीम

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com

मागील लेखात ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल आपण जाणून घेतलं. आता ट्रेडिंगचे प्रकार आणि त्याच्या कालावधीबद्दल पाहूयात.

स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्‍यांना स्काल्पर्स म्हणतात. मोठ्या प्रमाणात शेअर्स किंवा युनिट्सची लगेचच खरेदी-विक्री करून झटपट नफा-नुकसान पदरात पडून घेणार्‍यांस स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात मोडतं ज्यामध्ये मोठ्या पोझिशन्स घेऊन 2-5 रुपये नफा घेऊन बाहेर पडणारे असे ट्रेडर्स असतात. अशा व्यवहारांचा कालावधी काही सेकंदांपासून काही तास असू शकतो. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये वेळेला फार महत्त्व असतं. प्रोफेशनल ट्रेडर्स अनेक तंत्रज्ञान वापरून असे व्यवहार करत असतात. यात जोखीम देखील सर्वांत जास्त असते.

इंट्रा-डे ट्रेडिंग : यानंतरचा प्रकार म्हणजे इंट्रा-डे ट्रेडिंग, ज्यामध्ये सकाळी बाजार सुरू झाल्यापासून सव्वा तीन वाजेपर्यंत ट्रेडिंग करता येऊ शकतं. हे दोन्ही प्रकार झाले डे-ट्रेडिंगचे.

स्विंग ट्रेडिंग : शेअरभावाच्या चढ उताराप्रमाणं त्या त्या शेअर्सची खरेदी करून ठराविक नफ्याचं उद्दिष्ट ठेऊन एक दोन दिवसांत ते एखादा आठवड्यात विक्री करणं यास ‘स्विंग ट्रेडिंग’ म्हणतात. कोणत्यातरी अफवेमुळं कोण्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली येतात आणि ती अफवा आहे हे लक्षात आल्यानंतर स्वस्त मिळत असलेला असा शेअर घेण्यासाठी ट्रेडर्समध्ये चढाओढ लागते आणि त्याचा भाव वधारू लागतो, अशा प्रकारात उद्दिष्ट साधारणपणे 2-5 टक्के असू शकतं. शक्यतो स्विंग ट्रेड हे वायद्यामधील कंपन्यांच्या म्हणजेच डेरिव्हेटीव्ह या प्रकारात केले जातात, कारण त्यात शेअर्स खरेदी करण्यासाठी संपूर्ण पैसे भरावे लागत नाहीत.

पोझिशनल ट्रेड : म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये दडलेलं मूल्य आहे अशा कंपन्या शोधून त्यामध्ये बहुतांश गुंतवणूक करून (पोझिशन घेऊन) अपेक्षित वृद्धी झाल्यावर ती विकणं. यामध्ये एक आदर्श पोर्टफोलिओ बनवणं हा उद्देश नसून तुलनेनं कमी कालावधीत नफा मिळवणं हाच उद्देश असतो. याचा कालावधी काही आठवडे ते महिन्यांमध्ये असू शकतो. यामध्ये बहुतेक ट्रेडर्स स्टॉप लॉस ही संकल्पना गृहीत धरत नाहीत.

दीर्घ मुदतीची गुंतवणूक : यात मात्र सर्वार्थानं पुढील दशकाचा सारासार विचार करूनच ठराविक उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यामध्ये एक संतुलित पोर्टफोलिओ बनवण्यामध्ये कल दिसून येतो, ज्याचा उद्देश संपत्ती निर्मिती हाच असू शकतो. याला मात्र आपण ट्रेडिंग म्हणू शकत नाही.

भांडवल वृद्धी : सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भांडवल वृद्धी. काही ब्रोकर्स हे डे-ट्रेडिंगसाठी आपल्या क्लायंट्सच्या असलेल्या भांडवलाच्या (तरल उपलब्ध रक्कम आणि ब्रोकरकडं असलेल्या शेअर्सचे मूल्य) सुमारे दहापट किमतीचे शेअर्स घ्यायची किंवा विकायची परवानगी देतात, परंतु अशा पोझिशन्स या आपोआप मार्केट बंद व्हावयाच्या आधी ब्रोकर्सकडून बंद केल्या जातात. ट्रेडिंगमध्ये ट्रेडर्स हे शेअर्सच्या भावावर लक्ष ठेऊन असतात (झीळलश र्ोींशाशपीं). ट्रेडिंग हे बाजारात अचूक वेळ साधण्याबाबतचं कौशल्य आहे (ढे ींळाश ींहश ारीज्ञशीं) तर दीर्घ गुंतवणूकीतून उत्तम परताव्याद्वारे व लाभांशाद्वारे संपत्ती बनवणं हा अभ्यास आहे.

जोखीम : नक्कीच बाजारात जोखीम ही अध्याहृतच असते मग ते ट्रेडिंग असो वा गुंतवणूक. तरीही, ट्रेडिंगमध्ये जास्त जोखीम व जास्त परतावा असतो कारण तिथं वेळेला जास्त महत्त्व असतं. याउलट गुंतवणुकीत दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळू शकतो तरीकमी कालावधीत परतावा कमी जरी असला तरी जोखीम देखील कमी असू शकते, परंतु ट्रेडर्स नफा कमावण्यासाठी ठराविक अवधीत शेअर्स खरेदी-विक्री करतात परंतु त्या वेळेत नफा न झाल्यास वेळ पडल्यास नुकसानीतदेखील तो व्यवहार बंद करावा लागतो. गुंतवणुकीबाबतीतमात्र फारसं वेळेचं बंधन नसल्यानं नफा मिळवेपर्यंत वाट पाहता येऊ शकते.

कला विरुद्ध कौशल्य : हे समजून घेऊयात की ट्रेडिंग ही सुपर ओव्हर किंवा 20-ट्वेंटी मॅच आहे तर दीर्घ गुंतवणूक ही टेस्ट मॅचसारखी आहे. ज्याप्रमाणं क्रिकेटमधील टी-20 प्रकारात कोणताही दुबळा संघ बलाढ्य संघास हरवू शकतो म्हणजेच कोणता संघ जिंकेल याची खात्री देता येत नाही अगदी अशीच गोष्ट असते बाजाराच्या बाबतीत. अगदी चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा डे-ट्रेडिंगमध्ये नुकसान होऊ शकतं, परंतु दीर्घ काळात त्याच कंपनीच्या शेअर्समधून चांगला परतावादेखील मिळू शकतो. जसं की, राहुल द्रविडसारखा खेळाडू टी-ट्वेन्टी मॅचमध्ये तितका चांगला खेळ करू शकत नाही जितका तो टेस्ट मॅचमध्ये खेळू शकतो. ट्रेडिंग हे मागणी व पुरवठा यांसंबधीच्या गोष्टींवर अवलंबून असतं व त्यासाठी तांत्रिक गोष्टी अभ्यासाव्या लागतात उदा. आलेखावरील कलबदल, आधार व प्रतिकार पातळ्या, तळपातळी अथवा शिखरपातळी तपासणं, इ. याउलट एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना कंपनीबाबतच्या मूलभूत गोष्टी तपासून ती करावी लागते. उदा. कंपनीचा व्यवसाय, मार्जिन, अर्थार्जन, विविध रेश्यो इत्यादी.

जरी ट्रेडिंग व गुंतवणूक हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असतील तरी दोन्ही गोष्टींमध्ये शिस्त गरजेची आहे. ट्रेडिंगमध्ये अजून एक प्रकार असा आहे की ज्यात पडत्या बाजारातदेखील पैसा कमावता येतो. त्याला बाजारात ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणतात, म्हणजे शेअर्स जवळ नसतानादेखील आधी विकणं व नंतर खरेदी करून व्यवहार पूर्ण करणं. सर्वसाधारणपणे, एक तर अशा पोझिशन्स एका सत्रात (इंट्रा-डे) बंद कराव्या लागतात अथवा वायदे बाजारात पोझिशन्स घेतल्यास त्या महिन्याच्या ठराविक तारखेच्या आत (एकते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये). या गोष्टींविषयी पुन्हा कधीतरी पाहू परंतु बाजाराचा रोख ओळखून योग्य पातळीवर शॉर्ट सेलिंगची कला आत्मसात केल्यास अनिश्चिततेत हेलकावणार्‍या अथवा पडत्या बाजारातदेखील नफा कमावता येऊ शकतो.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply