महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्या भारताची प्रमुख शक्ती म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. नव्या पिढीमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. आज असंख्य तरुण-तरुणी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून स्वतःसह आपल्या देशाचा नावलौकिक वाढविताना दिसून येते. यामध्ये आता युवा धावपटू हिमा दासचे नाव समाविष्ट झाले आहे. हिमाने आपल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘उडनपरी’, ‘गोल्डन गर्ल’, ‘धिंग एक्स्प्रेस’ अशा नावांनी ओळखली जाणारी भारताची स्टार धावपटू हिमा दास सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय बनली आहे. परदेशी भूमीवर सलग पाच जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने नवा इतिहास रचला आहे. असा विक्रम करणारी ती भारताची पहिलीच धावपटू ठरलीय. आतापर्यंत वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये भारताला तीनच पदके मिळवता आली आहेत. यात भालाफेकमध्ये नीरज चोप्राचे सुवर्णपदक आणि सीमा पुनिया व नवजीत कौर धिल्लन यांच्या थाळीफेकमधील कांस्यपदकांचा समावेश आहे. धावपटू म्हणून सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये हिमा एकमेव आहे. ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग आणि ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती. यावरून हिमाच्या यशाचा अंदाज येऊ शकतो.
आसामच्या नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कांधुलिमारी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या हिमाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मारलेली मजल अक्षरशः थक्क करणारी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली असल्याने हिमाला संघर्षमय जीवनाची जाण लहानपणापासूनच होती. याच कष्टातून तिने यशोमार्ग शोधला. खरे तर हिमा लहानपणी शेतात फुटबॉल खेळायची. त्या वेळी शालेय पीटी शिक्षक श्यामशुल हक यांनी तिच्यातील धावण्याची प्रतिभा ओळखून तिला धावपटू होण्याचा सल्ला दिला, मात्र पुढे कसे होईल, हा यक्षप्रश्न हिमापुढे होता; कारण गावामध्ये तिला सरावासाठी धावण्याचा ट्रॅक तर सोडाच, पण साधी सपाट जमीनदेखील नव्हती. ती त्यांच्या ़फुटबॉल खेळण्याच्या चिखल असलेल्या मैदानावर दिवसभर धावण्याचा सराव करीत असे. मग हक यांनीच हिमाची ओळख नागाव स्पोर्ट्स असोसिएशनचे गौरी शंकर रॉय यांच्याशी करून दिली. त्यानंतर हिमाची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. या संधीचे शब्दशः सोने करीत तिने दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. याचदरम्यान क्रीडा प्रशिक्षक निपुण दास यांनी हिमाला हेरले व गुवाहाटी येथे येण्याचे निमंत्रण दिले. हिमाला प्रशिक्षणासाठी गाव सोडून 140 किमी दूर शहराच्या ठिकाणी जावे लागणार होते. ईशान्य भारतातील एकट्या मुलीने गावाबाहेर तेही खेळासाठी बाहेर पडणे म्हणजे अग्नीदिव्य पार करण्यासारखेच होते. खुद्द घरातूनच हिमाला यासाठी विरोध झाला. अखेर कुटुंबीय राजी झाले आणि हिमाचा व्यावसायिक खेळाडू बनण्याचा प्रवास सुरू झाला.
जुलै 2018मध्ये फिनलंड येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यामुळे ती प्रकाशझोतात आली. मग विविध स्पर्धांमध्ये तिने यश मिळविले. 2018नंतर हिमाला दुखापतीमुळे आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. 2019मध्ये पहिल्यांदाच तिने 2 जुलै रोजी ट्रॅकवर पाऊल ठेवले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 19 दिवसांत 200 मीटरमध्ये चार आणि 400 मीटरमध्ये एक सुवर्णपदक जिंकून तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल, तर कोणताही अडथळा आपल्याला ध्येयापासून रोखू शकत नाही, हे हिमाने दाखवून दिले आहे. अशा या गुणी खेळाडूला 2018मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. एकेकाळी धावण्यासाठी चांगले बूट नसलेल्या हिमाच्या नावाने आदिदास या क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने बूट बाजारात आणले आहेत.
काही वेळा थोडेफार यश मिळाल्यानंतर खेळाडू हुरळून गेल्याचे आपण पाहतो, पण ‘हिमा’लयाएवढ्या यशानंतरही हिमाचे पाय जमिनीवर आहेत. पोलंडमधील स्पर्धेदरम्यान आसामला महापुराचा तडाखा बसल्याचे हिमाला समजले तेव्हा आपले वेतन तिने पूरग्रस्तांसाठी दिले आणि इतरांनाही मदतीचे आवाहन केले. यातून तिची मातीशी असलेली नाळ किती घट्ट आहे, हे दिसून येते. अशा या खेळाडूला एक सलाम तर बनतोच.
हॅट्स ऑफ हिमा!
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)