Breaking News

पनवेलजवळील वेअरहाऊसमधून 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील पळस्पे येथील एका वेअरहाऊसमधून 130 किलोंचे आणि तब्बल 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती अनेक दिवसांपासून होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शुक्रवारी (दि. 26) ही कारवाई केली.

पळस्पे येथील एका वेअरहाऊसमध्ये हे हेरॉइन 260 गोण्यांमध्ये भरलेले होते आणि या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये लपविलेल्या होत्या. या वेअरहाऊसमधून दोन इसमांना अटकही करण्यात आली आहे. यातील एक आरोपी दिल्लीचा रहिवासी आहे, तर दुसरा अफगाणिस्तानमधील कंधारचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

आतापर्यंत रस्त्याच्या मार्गाने हेरॉइनची तस्करी होत होती, पण आता तस्करांनी समुद्रमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 532 किलोंचा ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या मते, हे रॅकेट आयएसआय-तालिबानद्वारे चालवण्यात येत आहे. मेक्सिकोच्या मार्कोस, जलालाबादच्या केमिकल एक्सपर्ट्स आणि अफगाणिस्तानहून भारतात हेरॉइनची तस्करी करण्यासाठी नागरिकांना बोलविले जात असल्याचे समजते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply