Breaking News

सिद्धी जगण्याची…

भिकारी म्हटल्यावर एक चिंध्या नेसलेली, अंगावर मळाची पुटं चढलेली, अंगाला वास मारणारी, अपंगत्व असेल तर ते मिरवणारी, राठ वाढलेल्या केसांच्या जटा मिरवणारी, ओंगळवाणी अशी स्त्री वा पुरुष असलेली व्यक्ती चटकन नजरेसमोर उभी राहाते आणि मग आपल्याही नकळत आपलेच अंग चोरले जाते. भिकारी आपल्या जवळपासही फिरकू नये अशी आपली इच्छा असते. आपल्या कपड्यांची इस्त्री आणि त्यावर चोपडलेलं भारीपैकी सेंट यावर मात करून ते भिकारपण आपल्या अंगभर पसरत जात, अशी आपली भावना असते. भिकारी हा शब्द जरी कुणीही उच्चारला, तरी बर्‍याचदा आपली प्रतिक्षिप्त क्रिया अशीच असते. अलीकडे या भिकार्‍यांच्या ओंगळपणात आणखी एक जास्तीची गोष्ट ठळकपणे दिसून येते, ती म्हणजे त्यांच्या कडेवर त्यांच्यासारखंच एखादं कळकट, ओंगळवाणं, नागडं-उघडं, परंतु बालसुलभ कुतुहलानं भरलेल्या, हसर्‍या-खेळत्या चेहेर्‍याचं आणि डोळ्यांचं लहान मूल..! लहान मुलांकडे पाहून कोणाचीही दयाबुद्धी जागृत होते आणि त्याला देण्यासाठी म्हणून आपल्या खमिसाच्या खिशात हात घालून भीक दिली जाते, ह्या सर्वसामान्य मानसिकतेला ओळखून अशी भर घातली गेली आहे. अर्थात पूर्वीसारखं भीक मागणं ही अपरिहार्यता राहिलेली नसून, तो त्यातील काही जणांचा किफायतशीर व्यवसायही झालेला आहे. कोणताही व्यवसाय म्हटला की भांडवल हे आलंच. भीक मागायच्या व्यवसायात, कडेवर बागडतं लहान मूल असण्यासारखं अन्य ‘खेळतं’ भांडवल कोणतं हो असणार..!!

खरं तर मला भीक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतु ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भीकच असली तरी प्रसंगानुरूप वेगवेगळी भारदस्त नावंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भीक’ आणि ‘भीक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे. कारण मला जे सांगावसं वाटतंय, ते कोणत्याही गोड शब्दाच्या कोटिंगचा आश्रय न घेता सरळ सरळ भीकच मागणार्‍या, परंतु भिकार्‍याविषयीच्या आपल्या पारंपरिक कल्पनांना उभा छेद देणार्‍या भिकारी व्यक्तीविषयी आहे.

मी राहतो त्या बोरीवली स्थानकाच्या पश्चिम दिशेच्या विरार एन्डला जी तिकीट खिडकी आहे. तिच्या बाहेरच्या बाजूला एक बाई, तिला कुणी काही भीक देतंय का, याची वाट पाहात पाहात बसलेली मला आज अनेक वर्ष दिसते. माझ्यासारखेच असंख्य येणारे-जाणारे तिला पाहातही असतात. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन सांगताय, असे कितीतरी लोक, मुंबैतच कशाला, तर देशभरच्या सर्वच रेल्वे किंवा बस स्थानकांच्या बाहेर लोकांकडून पैसे मागत असताना खोर्‍याने दिसतात. पण नाही, ही बाई जरी भीक मागत बसलेली असली, तरी त्या अर्थाने ती मला भिकारी वाटतच नाही. मी त्या बाईला गेली पाच-सहा वर्ष तरी त्याच जागेवर बघतोय. नुसता जाता-येता पाहात नाही, तर नीट निरखून पाहातो, पण ती कोणत्याही अँगलने भिकारी वाटत नाही. बरं ही बाई नुसती भिकारी नाही, तर कुष्ठरोगाने ग्रासलेली आहे. हातापायाची बोटं, नाक बरचसं झडून गेलंय. पाचेक वर्षांपूर्वी पाहिलेली तिची शारीरिक परिस्थिती आणि आताची तिची शारीरिक परिस्थिती आणखी बिघडलीय. तिच्या हातापाची बोटं आणि नाक जरा जास्तच झडलंय.

मग तिच्यात असं काय वेगळेपण आहे, की तिने माझं लक्ष वेधून घ्यावं आणि मला तिच्यावर लिहावसं वाटावं? ते यामुळे की भीक मागणारांच्या अंगा-चेहेर्‍यावर जो एक अंगभूत ओंगळपणा असतो, तो या बाईच्यात शोधूनही सापडत नाही. कुष्ठरोगी असूनही, चेहेरा, हातपाय विद्रुप झालेले असूनही ती त्याचं कधीही भांडवल करताना दिसत नाही. चेहर्‍यावर लाचारी नाही की लाचारीने कुणाकडून काही मागणं नाही. तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इतक्या परिस्थितीतही ती असते मात्र अत्यंत नीटनेटकी. नेसूची साडी जुनेर्‍यापैकीच, परंतु ती ही अत्यंत टापटिपीने नेसलेली. पदर व्यवस्थित खोचलेला. कपाळावर कुंकवाच्या जागी गोंदल्याची हिरवट खूण. पूर्वी हातात काकणंही दिसायची, परंतु आता चुड्यांचा धनी सोडाच, कासारही बांगड्या भरण्यास धजत नसावा म्हणून कदाचित भुंडा हात. भीक मागण्यासाठी पसरलेलं वर्तमानपत्रही नीटनेटकं अर्धी घडी घातलेलं. सोबत एक मोठी, स्वच्छ पिशवी. ही पिशवी म्हणजे कदाचित तिचा अख्खा संसारच असावा बहुतेक. भीक मागण्याची पाळी तिच्यावर यावी याचं दुःख कदाचित तिला होत असेलही, परंतु चेहेर्‍यावर ते मला कधी दिसलेलं नाही. जे नशिबी आलंय, ते स्वीकारल्याची भावना तिच्या विद्रुप चेहेर्‍यावर मला नेहेमी दिसत आलीय. तिच्या मनात दुःख असणं सहाजिकच आहे मात्र तिचा चेहेरा दुःखी-कष्टी मात्र कधीही दिसलेला नाही. म्हणूनच कदाचित तिच्या विद्रुप चेहेर्‍याने माझं लक्ष वेधून घेतलं असावं आणि म्हणून मला तिच्यावर लिहावसं वाटलं असावं की काय कोण जाणे..! तिच्याशी बोलावसं वाटत असूनही मी अद्याप तिच्याशी बोलायचं धाडस केलेलं नाही.

बाई बर्‍या घरची असावी, परंतु कुष्ठरोग झाल्यामुळे घरच्यांनी तिला बाहेर काढलं, असंही घडलं असावं, परंत, मला मात्र तिच्याकडून बरच काही शिकावंस वाटलं. इतक्या विपरित परिस्थितीत, भविष्य केवळ आणि केवळ आणखी जास्त अंधःकारमय होत जाणार हे माहीत असूनही प्रसन्न राहाणं मला नेहेमी अचंबित करतं. असं जगण्यासाठी तिला अशी कोणती सिद्धी प्राप्त झालीय. कुणास ठाऊक…!

आणि आपण मात्र परिस्थितीत थोडा उतार-चढाव आला की कोण घाबरून जातो. आपलं सर्व सेट झालेलं शेड्युल पार विस्कटून जातं. त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावरही होतो. साफ गळून जातो आपण. आपल्या परिस्थितीत पडलेला फरक तात्पुरता आहे, आपली माणसं साथीला आहेत आणि भविष्यात चांगलं होईल हे माहीत असूनही आपण त्या वेळेला मात्र ‘आता सर्व संपलं’ अशा भावनेने लांब चेहेरा करून वावरत असतो… मला वाटतं, प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्याप्रमाणे वागावं, मग त्रास होत नाही आणि मग मनात त्रागा होत असला, तरी चेहेरा हसरा ठेऊन परिस्थितीशी सामना करता येतो. हेच ती बाई तिच्या नकळत सांगत असावी. त्या बाईची परिस्थिती आणखीनच बिघडणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तिच्या आयुष्यात नेहेमीच शिशिर असणार आहे, परंतु आपल्या आयुष्यात कधीतरी नक्की बहर येणार आहे हे माहीत असलेल्या आपल्याला, परिस्थितीशी दोन हात करताना, दुःख मनात ठेवून आणि हास्य चेहेर्‍यावर ठेवून आपल्या वाटेला आलेला मोसमी शिशिर साजरा करायला काय हरकत आहे.

तिला ‘जगावं कसं’ या मंत्राची हीच सिद्धी प्राप्त झाली असावी, जी आपल्यालाही सहज प्राप्य आहे.

-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply