केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचे गौरवोद्गार
उरण ः वार्ताहर
देशातील प्रथम क्रमांकाचे बंदर असलेले आणि जागतिक स्तरावर पहिल्या 30 बंदरांमध्ये स्थान मिळवणारे जेएनपीटी भारतीय समुद्री क्षेत्रासाठी नेहमीच एक महत्वाची संपत्ती ठरलेली आहे. जेएनपीटी येथे मुख्य निर्णय घेणारे अधिकारी आणि बंदर वापरकर्त्यांना भेटून मला आनंद झाला, असे सांगून समुद्री उद्योगास नव्या क्षितिजाकडे नेण्यासाठी चालू असलेल्या जेएनपीटीचे विविध उपक्रम कौतुस्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले. शिपिंग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी जेएनपीटीला भेट दिली. या भेटीमागचा उद्देश विविध भागधारकांशी सवांद साधून बंदराचे एकूण कामकाजाची माहिती घेणे, अलिकडेच झालेल्या घडामोडी तसेच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदरांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढील धोरणात्मक योजना यावर चर्चा करणे हा होता. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मनसुख मांडविया यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त लिक्विड टर्मिनलचे भूमिपूजन मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाले. या व्यतिरिक्त लिक्विड टर्मिनलला जेएन पोर्टच्या दुसर्या बाजूला ऑफशोर बर्थ म्हणून दोन बर्थ निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रोजेक्टचा अपेक्षित खर्च 309 कोटी असणार असून प्रति वर्षी 4.5 मिलियन टन लिक्विड कार्गोची हाताळणी अपेक्षित आहे. ज्यामुळे भविष्यातील लिक्विड कार्गोची मागणी पूर्ण करता येणार आहे.
ना. मनसुख मांडविया यांनी जेएनपीटीला भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर त्यांनी सर्वांशी सवांद साधून कामकाजाविषयी चर्चा केली आणि या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी मंत्रालय कशी भूमिका पार पाडते हे जाणून घेणे हा एक उत्तम क्षण होता, असे संजय सेठी यांनी सांगितले. जेएनपीटीच्या 30व्या वर्धापनदिनास व नंतर आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याला ना. मनसुख मांडविया यांनी उपस्थिाती लावली. या कार्यक्रमाला आयात निर्यात व्यापार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.