खालापूर : प्रतिनिधी
खोपोली मंडळ कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकार्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्यांनी लागवड केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे नोंद केली. तसेच त्याचे प्रात्यक्षिक दाखवून, यापुढे प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी व्हर्जन 2 अॅपव्दारे कशी करायची, हे समजवून सांगितले.
शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार शेतकर्याने आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या शेतात उभे राहून इ पिक पाहणी व्हर्जन 2 या अॅपव्दारे करायची आहे. त्याची माहिती शेतकर्यांना व्हावी, यासाठी तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली मंडळातील सर्व तलाठी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांना ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या अॅपबाबत माहिती देऊन जनजागृती करीत आहेत.
आजतगायत खोपोली मंडळातील आडोशी, ताकई, लव्हेज, कांढरोली तर्फे बोरेटी, वणी, हाळखुर्द, खालापूर व चिचवली शेकीन या गावामध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी व्हर्जन 2 या अॅपच्या प्रचार, प्रसिध्दी व जनजागृतीचे काम मंडळातील तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत करण्यात आले असून अन्य गावांमध्येदेखील लवकरच प्रचार, प्रसिध्दी व जनजागृतीचे काम पुर्ण केले जाणार आहे.
सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे अॅप डाऊनलोड करून पीक पाहणीची ऑनलाइन नोंद करुन घ्यावी, असे आवाहन खोपोली मंडळ अधिकारी सचिन वाघ व त्यांचे सहकारी तलाठी रणजीत कवडे, भरत सावंत, दिप्ती चोणकर, सुवर्णा कोल्हे, प्रतिक बापर्डेकर यांनी केले आहे.
अॅप व्हर्जन 2 विकसित
ईपीक पाहणी अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकर्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल अॅप व्हर्जन 2विकसित करण्यात आले आहे. सुधारित मोबाइल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून, शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाइल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही, हे निर्धारित करता येणार आहे.
पीकपाहणी दुरुस्तीची सुविधा
ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदविल्यानंतर 48 तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. तसेच ई-पीक पाहणी मोबाइल अॅपमध्येच गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.