

मागील आठवड्यात एक खूप सुंदर लेख वाचनात आला. देशाची भावी पिढी सुसंकृत व जगाला हेवा वाटेल अशा निःस्वार्थी व वास्तविकता दर्शवणार्या या शब्दांत आगामी हिंदुस्थानचे सोनेरीपण दिसून येत आहे. नवा हिंदुस्थान अशा देशाभिमानी तरुणांच्या हातात गेल्यास देशाला पुन्हा गतवैभव मिळेल यात शंका नाही. जहा डाल, डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, किंवा प्राचीन भारतात सोन्याचा धूर निघत असे एवढी सुबत्ता देशात होती. ही सुबत्ता, गतवैभव, वैभवशाली भारत निर्माण होण्यास कुठलीच अडचण येणार नाही हे आजतरी या लेखातून हमखास प्रकट होत आहे. पुत्राने पित्यास केलेले आवाहन या लेखात आहे.
पप्पा तुम्ही आमच्यासाठी इमानदार व्हा ना..! मिळतो तेवढा पगार आणि इतर मानधन आनंदाने घ्या ना.., नको लबाडीचे पैसे त्याने जीव तुमचा जळतो…,भीतीच्या रंगाने तुमचा चेहरा काळा पडतो..,रात्रभर जागता तुम्ही हे मला काय कळत नाही, पापाच्या पैशांनी समाधान मिळत नाही..,तुमच्या कष्टाचीच भाकर आम्हाला द्या ना.., पप्पा तुम्ही आमच्यासाठी इमानदार व्हा ना..!
आईसुद्धा आता खोटे बोलत असते.कारण पापाच्या पैशांनी गळा तिचा शोभतो. दुसर्याचा तळतळाट असतो पप्पा मोठा, कधीतरी पडतो मग पाठीवर सोटा.
आहे तीच चटणी भाकर आनंदाने खाऊ ना… पप्पा तुम्ही आमच्यासाठी इमानदार व्हा ना.. ऑफिसमध्ये आहात तुम्ही मोठे अधिकारी, राजकारणात माहिती आहे तुमची मग्रुरी, पण चेहर्यावर का दिसते तुमच्या लाचारी.. मोठ्या मुश्कीलीने मिळते अशी नोकरी अन् सेवेची ही चाकरी, का तुम्ही करता मग तिथेच चोरी…आम्हालाही इमानदाराची मुले होऊ द्या ना…
पप्पा तुम्ही आमच्यासाठी इमानदार व्हा ना..!, पापाच्या पैशांनी तुम्ही बांधली मोठी माडी, पण किती छान होती ती आपली झोपडी, माडीच्या भिंती तुम्हाला छळतात किती..
या पापाच्या विटांची वाटते आम्हाला भीती..कधी होणार इमानदार आता तरी सांगा ना? सर्व विचार-दरिद्री, लाचखोर अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी मुख्य म्हणजे राजकारणी यांना समर्पित…. या ओळी प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनावर कोरून घ्याव्यात अशा आहेत आणि या शब्दांचा मारा आपल्या अंतरमनात ठासून भरला तर कोणासमोर लाचारीने उभे राहण्याची वेळ येणार नाही. लाचारी म्हणजेच कोणाचे तरी मिंधे होणे वा कोणीतरी टाकलेल्या तुकड्यावर श्वानाप्रमाणे शेपूट हलवत बसणे. परवा एक बातमी आली. भांडूपमध्ये खंडणी मारहाणीच्या गुन्ह्यातील गुंडाचा वाढदिवस चक्क पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. आयन खान उर्फ उन्ना असे आरोपीचे नाव आहे. या आरोपाखाली वाढदिवसाचे फुगे फोडणार्यांची हवा टाचणीने काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे, पंकज शेवाळे, शिपाई घोसाळकर, गायकवाड, जुमले अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. असा प्रकार फक्त भांडूपमधेच घडतो असे नाही तर कमी जास्त प्रमाणात काही पोलीस स्टेशनातही घडला जातो. मग तो वाढदिवसच साजरा न करता. इतर अनेक प्रकारे अशा गुन्हेगारांची उठबस केली जाते. त्यांना पोलिसांत मानसन्मान दिला जातो. जे महिन्याला काही चिरीमिरी देतात. 27 जून 2019 रोजी कराड येथील कोल्हापूर नाक्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या बसवर कारवाई करू नये म्हणून दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार विठ्ठल चव्हाण, अभिजित थोरात या दोघांच्या मुसक्या लाचलुचपतविरोधी पथकाने आवळल्या होत्या. नेरळ कर्जत येथील ग्रामपंचायतीचा कारभार ज्याच्या खांद्यावर आहे, शासनाचा प्रतिनिधी म्हणून ज्याच्यावर जबाबदारी आहे तो ग्रामसेवक राजेंद्र गूढध्ये नागरिकांची कामे करून घेण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकला. अशाच प्रकारच्या घटनांमध्ये पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, लेखनिक नागरिकांचे काम करण्यासाठी लाच मागत असताना अटक झाले आहेत. यामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी अधिकार्यांकडून नागरिकांना दिलासा द्यायचा आहे त्यानेच लाच घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.
काहींवर लाचलुचपतविरोधी पथकाने कारवाई करीत जेलची हवा खाण्यास पाठविले आहेत. पवित्र आहे असा समज असणारे शिक्षण खातेही यातून सुटले नाही. शिक्षकांकडून बदलीसाठी वा सेवाजेष्ठतेत वाढ करण्यासाठी लाच मागितल्याने अटक झाली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालये, वनविभाग, कृषी खातेही या लाचखोरीत मागे नाहीत. लाचारपणा यांच्याकडेही दडला आहे. एका भंगार विक्रेत्याने करोडोंची माया जमवली. तीही पोलिसांच्या कृपेने, मात्र हाच भंगारमाफिया उलटा होत खोपोलीतील तत्कालीन पोलीस निरीक्षक तळभंडारी यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याने पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याला व त्याच्या दोन पोलीस साथीदारांना लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकवून दिले. त्यानंतर त्याची उठबस व मानपान वाढला. मात्र 10 वर्षात याच भंगार माफियाने दुसरा गेम करीत खोपोलीतील पोलीस अधिकार्याला सापळ्यात घेतले. खालापूर पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई मागील महिन्यात एका ग्रामस्थाकडून 2 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला होता. विशेष म्हणजे या ग्रामस्थाला लाचलुचपतविरोधी अधिकार्यांनी विशेष प्रशिक्षण देत लाच स्वीकारणारा कसा ताब्यात येईल याची दक्षता घेण्यात आली होती. 8 मे 2015 रोजी रसायनी येथे तेलविक्रीचा धंदा करणारा नागरिक रायगडातील एका पोलीस अधिकार्याला दरमहा दोन लाखांचा हप्ता देत होता, मात्र हा धंदा सोडल्याने त्याने ते देणे बंद केले. पुन्हा सुरू कर नाहीतर खोट्या गुन्ह्यात अटक करीन, असा दम दिल्याने गुन्ह्यात अटकवू नये यासाठी 35 हजार रुपये स्वीकारताना हा अधिकारी ताब्यात आला होता. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. अशा अनेक घटना लाचलुचपतविरोधी पथकाने पोलीस खात्यातील कर्मचार्यांवर कारवाई केली होती.
ढाब्यावर अवैधपणे दारू विकणारे, जुगाराचे अड्डे चालवणारे, भंगाराचा व्यापार करणारे यांचा राबता सतत पोलिसांच्यात असतो. त्यांचा परिचय मोठा असल्याने एका लोकप्रतिनिधी वा राजकीय नेत्यापेक्षा मोठा दबदबा निर्माण करून जातो. अशा घटनाही लाचारीच्या शब्दात बसतात का हे शब्दकोशात तपासून घ्यावे लागेल. या लाच प्रकारांत महसूल खातेही मागे नाही. तहसीलदार, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी ते कारकूनही लाचप्रकरणी पोलीस कस्टडीची हवा खाऊन आले आहेत. काही सजा भोगत आहेत. या खात्यात जमीन व पुरवठा खात्यातील अधिकारी लाच घेण्यात सर्वात पुढे आहेत. मुंबई महानगरपालिकेत 2017 मध्ये 28 कर्मचारी लाचलुचपतविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. यामध्ये शिपाई, अभियंता, लिपिक, अधिकारी यांचा समावेश आहे. बस डेपोचा अधिकारी ठेका देण्याच्या कामात लाच घेताना लाचलुचपत पथकाने अटक केली आहे. अकोला जिल्ह्याचा लाच स्वीकारण्यात पहिला क्रमांक लागत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2018 या वर्षात 33 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे, तर नगर जिल्ह्यात चार वर्षांत 183 अधिकार्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सर्वसामान्यांची कामे करून देणे किंवा त्यांच्यावर असलेले गुन्हे दडवण्यासाठी लाच मागितली जाते.
-अरूण नलावडे, फिरस्ती
RamPrahar – The Panvel Daily Paper