Breaking News

सचिन तेंडुलकर @ 50

-समाधान पाटील, पनवेल

मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, महान क्रिकेटपटू अशा विशेषणांनी प्रसिद्ध आणि निवृत्तीनंतरही मान-मरातब कायम असलेला क्रीडाविश्वातील भारताचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकर सोमवारी (दि. 24) पन्नास वर्षांचा होतोय. क्रिकेटच्या मैदानावर अनेक शतके, अर्धशतके ठोकणार्‍या सचिनचे आयुष्याच्या वाटचालीतील अर्धशतकही तितकेच शानदार आहे…

गुरू आचार्य रमाकांत आचरेकर सरांनी सचिनरूपी हिर्‍याला पैलू पाडले. अर्थात, ती गुणवत्ता आणि दर्जा सचिनमध्ये होता. त्यामुळे लहानपणापासूनच या पठ्ठ्याने मुंबईची मैदाने गाजवायला सुरुवात केली होती. शालेय स्पर्धा, देशांतर्गत स्पर्धा, प्रथम श्रेणी क्रिकेट असे टप्पे पार करीत सचिनने देशाच्या संघात अतिशय मेहनतीने स्थान मिळविले. त्या काळी आतासारखी चढाओढ नसली तरी एकाहून एक दिग्गज संघात होते. मुख्य म्हणजे आताच्या उलट म्हणजे तंत्र आणि संयम पाहणार्‍या कसोटीला तेव्हा सर्वोच्च मानले जायचे. कसोटीतून तावून सुलाखून निघणार्‍या खेळाडूला मग एकदिवसीय सामन्यात संधी मिळत असे. पाया भक्कम असणार्‍या सचिनने क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात आपली हुकूमत सिद्ध केली.

बघता बघता सचिन भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला. तो सामन्यात चांगला खेळला तर संघ जिंकणार आणि लवकर बाद झाल्यास हरणार असे तेव्हाचे चित्र होते. इतकेच काय तर सचिन लवकर आऊट झाल्यावर अनेक जण टीव्ही बंद करीत असत. एवढी सचिनची क्रेझ होती. जगातल्या विविध मैदानांवर बड्या बड्या गोलंदाजांचा सचिनने निडरपणे सामना करीत आपल्या यशाचा आलेख उंचावला. प्रतिस्पर्धी गोलंदाज हे सचिनला बाद करण्यासाठी काही वेळा स्लेजिंगचा वापर करीत, तर कधी चेंडूचा मारा मुद्दामहून अंगावर करून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत, पण हा लढवय्या त्यांना कधी बधला नाही. त्याने प्रत्येकवेळी आपल्या बॅटने उत्तर दिले.

सचिनने अनेक सर्वांगसुंदर खेळी केल्या आहेत. त्यातील सन 1998मधील शारजा येथील तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची फलंदाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शेवटच्या सलग दोन सामन्यांत सचिनने शतक करून संघाला ही मालिका जिंकवून दिली. यापैकी अंतिम सामन्यातील शतक त्याच्या वाढदिवशी साकारले गेले. यानंतर ऑसी गोलंदाज शेन वॉर्नला चक्क स्वप्नातही सचिन त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारताना दिसत असे. कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या गोलंदाजी तोफखान्याचाही सचिनने लीलया समाचार घेतल्याचे आपण पाहिले आहे. या दरम्यान त्याने खेळाशी कधीही प्रतारणा केली नाही अथवा फिक्सिंगच्या जाळ्यात तो अडकला नाही. ‘जंटलमन्स गेम’मधील सभ्यता आणि शिस्त त्याने नेहमीच पाळली, किंबहुना या खेळाला अधिक लोकप्रिय केले.

सचिनने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. खरंतर सचिन खेळत राहिला आणि विक्रम होत गेले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करण्याचाही मान त्याने पटकाविला. असाच एक मैलाचा दगड म्हणजे टीम इंडियाने 2011चा वनडे विश्वचषक जिंकला आणि सचिन कृतकृत्य झाला. निवृत्तीनंतरही सचिन वेगवेगळ्या माध्यमातून क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. शिवाय सोशल मीडियातून तो सर्वांसमोर येत असतो. विशेष म्हणजे आपल्या मित्रांना, संघ सहकार्‍यांना तो आजही जपतो.

क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सचिनला भारतरत्न, महाराष्ट्र भूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परदेशांतही त्याचा यथोचित सन्मान झालेला आहे. आभाळाला हात पोहचूनदेखील त्याचे पाय जमिनीवरच आहेत. अशा नम्र, गुणी आणि खिलाडूवृत्ती जोपासणार्‍या सच्चा खेळाडूला सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्याने आयुष्याचेही शतक पूर्ण करावे ही सदिच्छा!

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply