Breaking News

शिक्षण आणि अनुभव हेच येते कामास

महेश वामन मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास दिलीप ठाकूर हे निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की महेश वामन मांजरेकर यांनी ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणलाय आणि त्यात त्यांनी साक्षात छत्रपती शिवराय साकारलेत. इतकेच नव्हे तर ताकदीचा अभिनेता सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसलेंची भूमिका वठवलीय. त्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात किंबहुना देशातील शिवप्रेमी जनतेला, पर्यायाने समस्त समाजासमोर एक चांगला धडा घालून दिला आहे. आपल्याला या चित्रपटाचे समीक्षण किंवा रसग्रहण करायचे नाही, तर यातील शेवटच्या भागात सचिन खेडेकर यांनी दिनकरराव भोसले यांच्या मुखातून जे वास्तव समोर मांडले आहे, त्याद्वारे झणझणीत अंजन घातले, असेच म्हणावे लागेल.

विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा साधा विचार  दिनकरराव भोसलेंनी बोलून दाखवला काय दिनकरराव भोसल्यांच्या अंगावर लोकं धावून काय येतात आणि दगड काय मारतात. याच वेळी दिनकरराव म्हणतात, निवडून आलेले लोक दोषी नाहीत, तर त्यांना निवडून देणारे आपणच दोषी आहोत. आपण जर ठरविले तर या देशाचा अर्थमंत्री अर्थतज्ज्ञ होऊ शकतो, एखादा डॉक्टर आरोग्यमंत्री होऊ शकतो आणि शिक्षणतज्ज्ञ शिक्षणमंत्री होऊ शकतो. या दिनकरराव भोसलेंची म्हणजेच सचिन खेडेकर आणि महेश वामन मांजरेकर यांची आज प्रकर्षाने आठवण यासाठी आली की गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला योग्य त्या कार्यासाठी योग्य व्यक्ती मिळाल्या आहेत. अर्थात देशाचे नेतृत्वसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या खंबीर अशा हातात आले असून आता भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांत पडला नसेल एवढा पाऊस यंदा पडला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्जन्यमानाने सर्व विक्रम मोडून जनतेला त्राही त्राही करून सोडले. महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि कोंकणात अतिवृष्टीने थैमान घातले. बोट उलटून 14 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर लाखोंना स्थलांतरित करावे लागले. पशुधनाची मोठ्या प्रमाणात  हानी झाली. महापूर ओसरू लागला तसा पुनर्वसन आणि समस्त विस्थापित नागरिकांचे संसार पुनश्च उभे करून देण्याचे आव्हान उभे ठाकले. या सर्व धामधुमीत आशेचा किरण दिसला तो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या रूपाने. शरद पवार टीकेचे प्रहार करीत करीत पूरग्रस्त भागात जाऊन पोहोचले खरे, त्यांनी दिलासा देण्यासाठी प्रयत्नही केले, परंतु महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील,

परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात ठिय्या देऊन काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यशकट सुव्यवस्थित सांभाळताना सगळीकडे लक्ष द्यावे लागत आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी सहा हजार 800 कोटी रुपयांची केंद्राकडे  मागणी करतानाच तेवढ्याच रकमेचे पॅकेज तयार केले आहे.  नीती आयोग अंतर्गत कृषिक्षेत्राच्या आमूलाग्र परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली देशातील मुख्यमंत्र्यांची उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या दुसर्‍या बैठकीचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले होते. या बैठकीला विजय रुपानी, कमलनाथ, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्त भागात ठिय्या देऊन काम करणार्‍यांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा पुरेपूर लाभ पूरग्रस्तांना मिळवून दिला.

आरोग्य शिबिरात हजारोंच्या संख्येने पूरग्रस्तांना स्वतः हातात स्टेथेस्कोप घेऊन रुग्णांना तपासून योग्य ते औषधोपचार केले. डॉ. बालाजी किणीकर हे हाडाचे कार्यकर्ते. अंबरनाथ येथील झोपडपट्टीमधून तळागाळातून काम करणार्‍या या उच्चविद्याविभूषित कार्यकर्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नपारखीच्या नजरेतून हेरले आणि विधानसभेत पाठवले. असे असले तरी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बालाजी किणीकर यांनी वैद्यकीय तपासणी, उपचार यापासून पाठ न फिरविता आपल्या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग केला. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे आणि डॉ. बालाजी किणीकर यांच्या या ज्ञानाचा पूरग्रस्त भागांत वैद्यकीय अधिकारी यांच्या विविध पथकांच्या माध्यमातून हजारो लोकांना फायदा झाला.

एकनाथ शिंदे  महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरोग्यसेवेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली. ज्येष्ठ पत्रकार मंगेश चिवटे यांच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा सर्वोत्कृष्ट काम करीत आहे. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकारी अनुराधा जुवेकर या पती घनश्याम, सुपुत्र बिल्वेश, सुकन्या अवनी यांच्या समवेत कोकणात रस्ते मार्गाने प्रवास करीत असताना एका स्वीफ्ट मोटारीने जुवेकरांच्या मोटारीला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात जुवेकर परिवाराची कधीही भरून न येणारी अपरिमित हानी झाली.

या वेळी महाड आणि ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या यंत्रणेने अतिशय वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली. हे तर एक माझ्या परिचयातले उदाहरण आहे, परंतु दररोजच्या अशा असंख्य वैद्यकीय सहकार्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतील. ज्येष्ठ पत्रकार जयंत करंजवकर यांनी या यंत्रणेबद्दल स्वतंत्र लिखाण केले आहे. डॉ. विजयकुमार गावित हे 1995पासून प्रकाशात आलेले आणखी एक राजकीय  नेतृत्व. आदिवासी समाजाचे हे नेते नंदुरबार येथून पहिल्यांदा 1995 साली अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. डॉ. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री झाले. डॉ. मनोहर जोशी हे हाडाचे शिक्षक. त्यांनी मुख्यमंत्री असताना 1995 ते 1999 या कालावधीत ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालवले होते. ते शिक्षकाच्या भूमिकेत वावरत होते. त्यांना ’सर’ म्हणून सारे निकटवर्तीय संबोधतात. डॉ. विजयकुमार गावित हे एमबीबीएस आहेत, तशी त्यांची कन्या हीना हीसुद्धा डॉक्टर आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या हीना गावित यांंनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते, तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव होडल्या गावित यांचा दणदणीत पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी हीना मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत होत्या.  डॉ. विजयकुमार गावित हे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री होते आणि अशीच एक नैसर्गिक आपत्ती आली असताना डॉ. गावित यांनी मुंबईतील एका इस्पितळाला भेट दिली. मंत्र्यांना काय कळतंय या आविर्भावात त्या इस्पितळातले डॉक्टर वावरत होते. विजयकुमार गावित यांनी थेट स्टेथेस्कोप कानाला लावला आणि तेथील रुग्णांना तपासून प्रिस्क्रिप्शन पाहिले. त्यात त्यांना आक्षेपार्ह वाटले आणि त्यांनी त्या इस्पितळातल्या डॉक्टरला फैलावर घेतले. औषधे बदलून दिली. डॉ. रणजित पाटील अमरावती येथील विधान परिषद सदस्य. ते व त्यांच्या पत्नी दोघेही डॉक्टर असून घराबाहेर पडण्यापूर्वी एकतरी शस्त्रक्रिया पूर्ण करायचीच हा त्यांचा दंडक, दिनक्रम.

आज त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यशस्वी नगरविकास राज्यमंत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे. डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथ व बदलापूर येथे दंतवैद्यकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत. या दोन्ही शहरांत त्यांचे छोटेखानी दवाखाने आहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतही स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ आपल्या विभागाला मिळवून दिला. आज महाराष्ट्रात महापूर परिस्थितीत राज्य सरकारने महापुरानंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुनर्वसनाचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाची आणि आपल्याला आलेल्या अनुभवाची शिदोरी आपण पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिली. हेच माणुसकीचे कर्तव्य पार पाडल्याचे सार्थक म्हणता येईल. विरोधासाठी विरोध न करता या शिक्षण आणि अनुभवाचा सदुपयोग करून देणार्‍या लोकप्रतिनिधींचे म्हणूनच कौतुक करणे आवश्यक आहे. अशा वेळीच ’सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र महत्त्वाचे ठरते. एका बाजूला सर्वांनी खांद्याला खांदा लावून नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची भाषा करतानाच घटिया राजकारण करून आपली पोळी ’राजकीय तव्यावर’ भाजून घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणार्‍या दळभद्री महाभागांना ईश्वर सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना आपण करू शकतो. अर्थात या भीषण परिस्थितीमध्ये आपले शिक्षण आणि आपला अनुभव सत्कारणी लावणार्‍या डॉ. विजयकुमार गावित, डॉ. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे, डॉ. बालाजी किणीकर, डॉ. रणजित पाटील, मंगेश चिवटे व अशा सर्व ’प्रोफेशन’ उपयोगात आणणार्‍या सर्वांना मानाचा मुजरा, मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या हातून भविष्यात अविरत सेवा घडण्यासाठी या सर्वांना उदंड आयुष्य व ठणठणीत आरोग्य (इतरांचे आरोग्य सुधारण्यासाठी) प्राप्त होवो, या मनापासून शुभेच्छा!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply