उरण : रामप्रहर वृत्त
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या पदाधिकार्यांसोबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी म्हैसकर यांनी या विषयावर त्वरित कार्यवाही करून आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यामुळे पनवेल महापालिकेतील कर्मचार्यांनी नियोजित बेमुदत काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल महापालिकेतील पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांचे समावेशन होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने 20 ऑगस्ट रोजी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होती. या वेळी त्यांनी 297 ग्रामपंचायत कर्मचार्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश दिले होते. या कर्मचार्यांच्या सेवा संदर्भातील कागदपत्रांची तपासणी नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संचालकांनी करण्याचे ठरविल्याने म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या वतीने 30 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा पुढे येत या प्रश्नी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या शिष्टमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत म्युनिसिपल एम्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि निवडक कर्मचारी यांचा समावेश होता.
या वेळी म्हैसकर यांनी या विषयावर त्वरित कार्यवाही करून आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यामुळे पनवेल महापालिकेतील कर्मचार्यांनी नियोजित बेमुदत काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आहे.