1970च्या दशकापर्यंत एक पाव, दोन पाव, अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव पूर्ण एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणेदोन, आठ पाव दोन, नऊ पाव सव्वादोन, 10 पाव अडीच, अकरा पाव पावणे तीन, बारा पाव तीन, पुढे 13 पाव सव्वातीन अशा पावकी दीडकीचे पाढे शिकलेली तरुण पिढी आता उतारवयात आली असली तरी त्यांच्या गणिताचा पेपर किती लहानसहान अक्षरमोडीचा होता व त्याकाळी पावकी दीडकीची गोळाबेरीज गुणाकार-भागाकार विनाकॅल्क्युलेटर अचूक होता याचा प्रत्यय मास्तर गुरुजींनी घेतला होता. तो काळ टक्केवारीचा जमाना नसला तरी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हमखास 90 टक्क्यांच्या पुढे असणार यात शंका नाही.त्यानंतर एकी एक, दुरकी दोन, तिरकी तीन, चौकी चार, पाची पाच, साही सहा, साती सात, आठी आठ, नवी नऊ, दाही दहा, एकावर एक अकरा, एकावर दोन बारा, एकावर तीन तेरा, पुढे तर बे एके बे, बे दुणे चार, बे तिना सहा, बे चोक आठ, बे पंचे दहा, बे सहा बारा असे पाढे शाळेत पाठ करून घेतले जात असत. पाढे इयत्ता तिसरी ते चौथीपर्यंत प्रत्येक मुलाला शाळेतच पाठ करावे लागत असत.
सर्वांत कठीण पाढा एकोणतीस एके एकोणतीस, एकोणतीस दुणे अठ्ठावन्न, एकोणतीस त्रिक सत्त्यांशी, एकोणतीस चौके एकशे सोळा, एकोणतीस पंचे एकशे पंचेचाळीस, एकोणतीस सक्के एकशे चौर्याहत्तर, एकोणतीस सत्ते दोनशे तीन, एकोणतीस आठ्ठे दोनशे बत्तीस, एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ठ, एकोणतीस दाहे दोनशे नव्वद हा पाढा शिष्याला पाठ झाला की गुरुजी पाठीवर शाब्बासकीची थाप देत असे व आपणही समाधानी होत असे. ही गुरूशिष्य परंपरा काही दशकांपूर्वी हमखास पाहावयास मिळत असे. शेतकरी आपल्या शेतात पिकवलेले धान्य मोजण्यासाठी कुठलाही वजनकाटा वापरत नसे. त्याकाळी फार कमी व्यापार्यांकडे किंवा मोठे व्यापारी सोडले तर वजनकाटे पाहावयास मिळत असत. दोन तीन चार खंडीचा कानगा, सहा खंडीचा कनगा असा मोजमाप केला जात असे. कनगा म्हणजे बेटाच्या काठ्या चिरून बुरुड मामाने आपल्या कलाकुसरीने विणलेली लांबच लांब चटई. ही चटईसुद्धा किती हात लांब व किती हात रुंद केली म्हणजे किती खंडी भात नाचणी वरी बसेल याचा तंतोतंत बांधलेला अंदाज.
या कनग्यात एवढेच खंडी भात बसेल एवढी कुशाग्र बुद्धी बारा बलुतेदारांपैकी असणारा बुरुडमामा बांधत असे. टोपली कनंग, हारा, झाप ते पावसाळ्यात शेतकर्याला मासेमारी करण्यासाठी लागणारी टोकरी, साठा अशी बांबूच्या बेटापासून लागणारी भांडी हा बुरुडमामा बनवत असे. पुढे भात मोजण्यासाठी नीटवा अदोळी, पायली अशा मापांचा वापर केला जात असे. खंडी, मण दोन मण, तीन मण अशी मोजमाप केली जात असे. साधारणपणे एका निटव्याचे माप एका अदोलीत चार नीटवे बसले म्हणजे एक अदोळी, तर आठ नीटव्यांची पायली असे मोजमाप केले जात असे. पायलीभर तांदूळ घ्या आणि मला पाटील म्हणा, ही म्हण त्या शब्दाला धरूनच आली आहे आणि अठ्ठावीस अदुल्या म्हणजे एक मणभर भात होत असे. 20 मण भात म्हणजे एक खंडीभर भात हे गणित होते. साधारणपणे तीन मण व आसपास असणारे भात 100 किलो भरत असे. असे मोजमाप केलेली पिढी आज फार दुर्मीळ झाली आहे, तर एका एकरमध्ये साधारणपणे पावसाच्या पाण्यावर जमतेम दोन ते तीन खंडी भातपीक येत असे. उन्हाळ्याच्या पाण्यावरील
भातपीक थोडे जास्त मिळत असे. एक एकर म्हणजे 40 गुंठे हे प्रमाण आताच्या पिढीला सर्रास माहिती आहे. कारण जमिनीत पीक घेण्याऐवजी ती भातशेती विकण्याकडे तरुण पिढीचा ओढा जास्त आहे. वाडवडिलांनी उपाशीपोटी राहून गुंठा न् गुंठा सांभाळून ठेवला तोच तुकडा एकरमध्ये विकला जात असल्याने 40 गुंठे म्हणजे किती हे आताच्या पिढीला माहिती आहे. नव्हे जमिनीचे दलालही हा आकडा सांगत फिरत आहेत.
अडीच एकराच्या आसपास असणारी जमीन एक हेक्टर होते हेही गणित सर्वश्रुत आहे. विशेषतः जमिनीची विक्री होत असलेल्या भागात हा आकडा सर्रासपणे वापरला जातो. जमिनीच्या नुकसानीची भरपाई मोजण्यासाठी आणेवारी पद्धतीने मोजमाप केली जात आहे. ती पद्धत अद्यापही सुरू आहे. आणेवारी म्हणजे ही एक जुनी पद्धत असून नव्या पिढीला आणे हा शब्द समजायला कठीण व अर्थहीन भासेल अशी शब्दाची मांडणी आहे. एक पैसा, दोन पैसा, तीन पैसे, पाच पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे, एक रुपया हे मोजमाप येण्याअगोदर एक आणे म्हणजे सहा पैसे, चार आणे म्हणजे 25 पैसे, आठ आण्याला 50 पैसे किंवा 48 पैसे, तर बारा आणे म्हणजे 75 पैसे व 16 आण्यांचा एक रुपया असे प्रमाण मानले जात असे. 16 आणे पीक म्हणजे 100 टक्के पीक असे समीकरण आहे. कालांतराने एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, एक 10/15 वर्षांपूर्वी बंद पडल्यानंतर रुपया, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये ही पैशांची नव्हे यापुढे रुपयांची मोजमाप करणारी संख्या आली आहे आणि ती सध्या प्रचलित आहे. पूर्वी लखपती हा तालुक्यात एखादाच असायचा. तो जमाना लखपतीच्या वर्चस्वाचा असायचा. भातपिकाची आणेवारी काढण्याची पद्धत होती, मात्र आणेवारी पद्धत बंद झाल्याने आणा चलन बंद करण्यात आले. त्यांनतर 100 पैसे म्हणजे एक रुपया ही पद्धत रूढ झाली.
आणेवारी ही 100 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन पद्धती आहे. आणेवारीवरून गावातील दुष्काळ व पीकपाणी याची मोजमाप केली जाते. महाराष्ट्रात कोकण, नाशिक, पुणे या महसूल विभागात खरीप हंगामात 15 सप्टेंबरला, तर संभाजीनगर, नागपूर, अमरावती 30 सप्टेंबरला जाहीर केली जाते. गावाच्या क्षेत्रात, शिवारात लागवडीखालील क्षेत्राफळाचे 80 टक्केपर्यंतची पिके पैसेवारी काढण्यास घेतली जातात. एक गुंठे शेतीच्या चौरस भागातील पिकाची निवड करून येणारे पिकाची आणेवारी काढली जाते. सरासरी 50 पेक्षा कमी काढलेली पैसेवारी असल्यास दुष्काळ व त्यापुढे असल्यास सुकाळ असे समजण्यात येते. 33 टक्के नुकसान झाले असल्यास शेतकरी शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात येतो. प्रत्येक गावात प्रत्येक पिकासाठी 12 भूखंड निवडले जातात. तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकर्यांचे दोन प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच, सहकारी संस्थांचे अध्यक्ष असे सदस्य नेमले जातात.
धरणाची पाणीक्षमता आवकजावक किती, पाणी येते जाते याची गणना लिटर टीएमसीमध्ये केली जाते. आपणास फक्त लिटर ही संज्ञा माहीत आहे. पाणी मोजण्याची एकके म्हणजे टीएमसी, क्युसेक, क्युमेक हे मोजमाप होते. सध्याच्या चालू वर्षी पावसाचे पाणी चांगले पडत आहे. एवढे टीएमसी पाणी सोडले याची चर्चा व बातम्या दिल्या जातात, मात्र हे प्रमाण सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जात असते.
स्थिर पाणी मोजण्याची एकके-
1) लिटर, 2) घनफूट, 3) घनमीटर, 4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक- टीएमसी ढचउ (ढर्हेीीरपव चळश्रश्रळेप र्उीलळल ऋशशीं) (अब्ज घनफूट), एक टीएमसी म्हणजे (ेपश ींर्हेीीरपव ाळश्रश्रळेपी र्लीलळल षशशीं) म्हणजे एकावर नऊ शून्य (01 अब्ज) इतके घनफूट. 1 टीएमसी=28,316,846,592 लिटर्स
वाहते पाणी मोजण्याची एकके-
1) 1 क्युसेक (र्उीीशल)- एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 2) 1 क्युमेक (र्उीाशल)- एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते. उदाहरणादाखल पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे. म्हणजेच त्यामध्ये 1.97 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते. याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. म्हणजेच 500 27.317 लिटर प्रतिसेकंद या विसर्गाने पाणी सोडले जाते.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली पाच धरणे
1) उजनी 117.27 टीएमसी
2) कोयना 105.27 टीएमसी
3) जायकवाडी 76.65 टीएमसी (पैठण)
4) पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी
5) पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी खालापुरात कलोते धरणक्षमता 419 लाख घनमीटर, डोणवत 315 लाख घनमीटर, भिलवले 210 घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. नवी मुंबईस
पाणीपुरवठा करणार्या मोर्बे धरणाची पाणी साठवण क्षमता 450 दशलक्ष लिटर असून पूर्ण संचय पातळी 88 मिटर आहे. रायगडातील सुतारवाडी, वावा, फणसाड, आंबेघर, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिडवाडी, खैरे, कोथूर्डे, घोटावडे, कुडकी, पुनाडे, ढोकशेत, रंवली बामलोली, सालोख, अवसरे अशा धरणांची पाणी साठवण क्षमता मध्यम आकाराची आहे. मोजमाप करण्याच्या पध्दती कालमानानुसार बदलत असून शिवकालीन नाणी ते दमडी, दीडकी, आणे, पैसे, रुपये इथपर्यंत येऊन ठेपले आहे. वजन, मोजमापासाठी शासनाचे खाते कार्यरत आहे.
-अरूण नलावडे, फिरस्ती