31 जुलैपर्यंत मच्छीमारीला बंदी
अलिबाग : प्रतिनिधी
समुद्र खवळलेला असल्यामुळे यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे मच्छीमारी बोटी किनार्यावर विसावल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंचच लाटा उसळत असतात, यामुळे खोळ समुद्रात मासेमारी करणार्या नौकांना अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. पावसाळ्याचा कालावधी हा मासळीचा प्रजनन काळ असतो. या कालवधीत मासेमारी केल्यास मासळीचे उत्पादन घटते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला बंदी घालण्यात येते. पूर्वी 1 जून ते 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा जो आधी येईल तो या कालवधीत मासेमारी बंदी असायची. मागील काही वर्षापासून मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै असा करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात मच्छिमारांची 108 गावे आहेत. मासेमारी व्यवसायावर 11 हजार 620 कुटुंबातील 69 हजार 47 जण अवलंबून आहेत. पूर्णवेळ मासेमारी करणारे 16 हजार 523 मच्छिमार असून अर्धवेळ मासेमारी करणारे 13 हजार 521 मच्छिमार आहेत. जिल्ह्यात 4 हजार 943 नौकांव्दारे मासेमारी करण्यात येते. त्यामधील 3 हजार 444 नौका यांत्रिकी आहेत. बंदी काळात यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने खाडीमध्ये मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे बिगर यांत्रिकी 1 हजार 499 नौकांद्वारे समुद्रकिनारपट्टी भागात मासेमारी सुरु राहणार आहे.
महाराष्ट्र मासेमारी अधिनियम 1981 चे कलम 4 चे पोटकलम 1 नुसार 1 जून ते 31 जुलैपर्यंत यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. बंदी काळात यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करताना आढळ्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या नौकांचा मासेमारी परवाना रद्द केला जाणार आहे. बंदी काळात मासेमारी करताना नौकेला अपघात झाल्यास त्या नौकेच्या मालकास शासनाकडून कोणतीही नुकासानभरपाई मिळणार नाही.