Breaking News

चिमूटभर मिठाची कष्टदायी कहाणी

उरण : प्रतिनिधी  – माणूस श्रीमंत असो अथवा गरीब असो तो जे अन्नपदार्थ शिजवून खात असतो अथवा हातगाडीवरील वडापाव असो किंवा पंचतारांकित हॉटेलमधील किमती डिश असो या सर्वांना ज्या चिमूटभर पदार्थाने चव आणली जाते, त्या पदार्थांची निर्मिती आजही कोरोना व्हायरसने जगभरात फैलावलेल्या दहशतीमध्ये करण्यात गुंग असलेले हात तुमच्या-आमच्या जेवणाची तुम्ही-आम्ही खात असणार्‍या सर्व प्रकारच्या पदार्थांची चव राखण्यासाठी राबत आहेत. एवढेच नव्हे तर विविध औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या या चिमूटभर मिठाची कहाणी मोठी आहे. त्याचा इतिहास रंजक आहे.

एके काळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याला संबोधिले जात होते. तर मिठाचे आगर म्हणून उरण तालुक्याचे नाव होते. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिठागरे होती. महात्मा गांधीजींच्या दांडी सत्याग्रहाच्या काळातही या ठिकाणी मिठाचे आगर होते. त्या काळापासून ते 1970 पर्यंत उरण येथील आगरात आगरी समाजांतील मंडळी पावसाळी हंगामात भात शेती तर उन्हाळी हंगामात मिठागरांतून मिठाचे उत्पन्न घेत होते. परंतु 1970 साली शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) ठाणे, पनवेल, उरण तालुक्यांतील 95 गावची जमीन नवीन मुंबईच्या प्रकल्पासाठी संपादित केली या संपादित जमिनीमध्ये मिठागराच्या जमिनीचा समावेश होता. त्यामुळे आज नवी मुंबईचा विकास होत असताना मिठागराच्या जमिनीवर भराव घालून त्यांचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

मात्र अशाही स्थितीत आपल्या वाडवडिलांच्या मिठागराचा व्यवसाय अत्याल्पस्थितीत फुंडे गावच्या एका तरुणाने मोठया जिद्दीने तुटपुंज्या जागेत सुरु ठेवला आहे. यासाठी त्याला अहोरात्र कष्टमेहनत करावी लागत आहे. यासाठी त्याला जे सहा सहकारी आपल्या बारा हाताने मदत करतात त्यच्या कष्टा मधून समुद्राच्या पाण्यातून मिठाचे माणिकमोती चमकून निघतात जे तुमचे आमचे जेवण रुचकर बनवितात, आपल्या अनेक गरजेच्या औषधांमध्ये सोडियम क्लोराईड नावाचा जो घटक असतो त्यालाच आपण मीठ म्हणून संबोधतो असे हे आपले मीठ मोठ्या कष्टाने बनविले जाते.

आज जगभरात कोरोना व्हायरचे सावट पसरले असले तरी मीठ पिकविणारे हात मात्र तुमचे जेवण रुचकर बनविण्यासाठी तत्पर आहेत पहाटे 5 वाजल्या पासून सायंकाळी 7 वाजे पर्यंत अखंड मेहनत घेत आहेत. खर्‍या अर्थाने मीठ पिकविण्याचा हंगाम पावसाळ्यानंतर दिवाळी अखेर सुरु करण्यात येतो. पावसाळ्यात मिठाचे असणारे वाफे (कोंड्या) या चिखल मातीने भरलेल्या असल्याने सर्वसाधारणपणे नोव्हेंबर अखेर त्याच्या मशागतीस सुरुवात करण्यात येते, कोंड्यातील चिखलमाती काढून टाकल्यावर त्या ठोकून चोपून बनविण्यात आल्यावर मिठाच्या निर्मिती करिता तयार होतात, यासाठी जवळजवळ महिनाभरा पेक्षा अधिक कालवधी जातो या नंतर जानेवारी महिन्या पासून समुद्राच्या भरतीचे पाणी वलनात (समुद्राच्या भरतीचे पाणी साठविण्याची जागा) घेतले जाते.

अशाप्रकारे एका वलनातून दुसर्‍या वलनात हे पाणी घेण्यात येते खरेतर हे पाणी वलनात स्थिर राहत असल्याने समुद्राच्या पाण्यातील गाळ तळाला बसून पाणी काचे सारखे स्वछ दिसु लागते शिवाय सूर्याच्या उष्णतेमुळे तापलेही जाते त्या नंतर हे पाणी कोंड्यामध्ये घेतले जाते. या ठिकाणी आठवडाभरात स्थिर असलेल्या पाण्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे प्रक्रिया होऊन मिठाचा थर जमण्यास सुरुवात होते. हळुवारपणे दैनंदिन हा थर फोडून स्पटीका प्रमाणे दिसणारे मीठ लाकडी पावड्याच्या साय्याने बाहेर ओढून काढले जाते आणि अगोदरच माचून तयार करण्यात आलेल्या जगेवर त्या तयार मीठाची रस घातली जाते, पुढे हे मीठ गोणीत भरुन पूर्वी सुदर मार्गे आणि अलीकडे ट्रक अथवा रेल्वेने हे मीठ तुमच्या आमच्या घरोघरी पाठविण्यात येते औषधी कारखान्या कडे जाते.

अलीकडे अनेक मिठाचे कारखाने आयोडिनयुक्त मिठाची जाहिरात करून मिठाची भुकटी तयार करून बाजारात विक्री करताना दिसतात पण 1956 साली उरणमध्ये उरणपेटा मिठागर कामगारंची युनियन स्थापन करणारे उरणचे राजे वीर तू. ह. वाजेकरशेठ यांनी मात्र 60 च्या दशकात टेबलसॉल्ट नावाने अशा प्रकारचे मिठ बाजारात आणले होते. आज जगात देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत असताना गुजरात नवसरी येथून आलेले सहा जण आपल्या बारा हाताने दिवसरात्र मेहनत करून उरण-फुंडे गावच्या एका लहानशा खाडी किनारी तुमचे-आमचे जेवण रुचकर बनवितो.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply