Breaking News

अटलजींच्या जयंती दिनी भाजपतर्फे सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या सात वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई-श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, सुशासन दिनानिमित्ताने ‘अटलजी ते मोदीजी-सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रांतील नामवंतांची व्याख्याने होणार आहेत तसेच वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे. गेल्या सात वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथस्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत. याखेरीज सर्व बूथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन, जनसंघापासून काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे वाचन, महाविद्यालय परिसरात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत.
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणार्‍या भाजप लोकप्रतिनिधींचा अटल पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. असंघटीत कामगारांसाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या ई-श्रम कार्ड योजनेची माहिती देऊन संबंधितांना या कार्डचे वितरण करणे आदी कार्यक्रमही होणार आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

 

 

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply