नवी मुंबई : बातमीदार – मुंबई पुण्यानंतर नवी मुंबईला कोरोनाने पछाडले आहे. त्यात नवी मुंबईतील शहरी भाग हॉटस्पॉट ठरत असतानाच घणसोली गावाने देखील आपला अग्रक्रम राखला आहे. त्यानुसार घणसोली गावातील गावकर्यांनी समाजमाध्यमांवर चर्चा करून गावाला पुढील 6 दिवस क्वारंटाइन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
मंगळवार 28 एप्रिल ते रविवार 3 मेपर्यंत सलग सहा दिवस हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. घणसोली गावात अर्जुन वाडी, चिंच आळी, मशेश्वर नगर, सेक्टर 16 येथे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत घणसोली गावात 10 रुग्ण सापडले असून यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार घणसोली गावाने हा आदर्शवत निर्णय घेतला आहे. गावात एकूण सात आळ्या आहेत. या आळ्यांचे प्रत्येकी तीन सदस्य नेमलेले आहेत. अशा 21 सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार घणसोलीत असलेल्या सात नगरसेवकांशी बोलून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरसेवकांनी देखील गावाच्या व गावातील नागरिकांच्या भल्यासाठी या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यानुसार मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेसाठी लागणार्या अन्न धान्य, दूध, अंडी हे घरपोच पोहोचवले जाणार आहेत. त्यासाठी विविध दुकानदारांचे फोन नंबर नागरिकांना देण्यात आले आहेत. यासाठी गावातील नागरिकांना भावनिक आवाहन करून समजावण्याचा व गांभीर्याने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. आपल्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास गावाला हॉटस्पॉट ठरवण्यात येणार आहे. तसे झाल्यास जीवनावश्यक वस्तू देखील मिळणे कठीण होऊन जाईल. व्यवसायांवर त्याचा परिणाम होऊन आर्थिक स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा 24 तास पहारा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना आता जितके स्वातंत्र्य उपभोगता येत आहे त्यावर देखील निर्बंध येतील. प्रत्येक नागरिकाची चाचणी करून 15 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
गावातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. पुढील सण उत्सव साजरे करायचे असतील नातेवाइकांच्या सुख दु:खात सहभागी व्हायचे असल्यास आत्ताच सावध होण्याची गरज असल्याचे गावकीने म्हटले आहे. त्यामुळे याआधी आपण आपल्यासाठी व कुटुंबियांसाठी कोरोनाविरोधात लढत होतो, मात्र आता यापुढे घणसोली गावाच्या नागरिकांच्या हितासाठी लढण्याची वेळ आली असल्याचे आवाहन प्रत्येक नागरिकाला करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील स्वतःहून निर्णय घेऊन जनता कर्फ्यू बाळगणारे व नवी मुंबईच्या जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे घणसोली हे पहिले गाव ठरले आहे.
आमच्या गावात सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल येण्याआधी तो रुग्ण संपूर्ण गावात, भाजी, मच्छी मार्केट फिरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आमच्या देवस्थान गावकीतर्फे समाजमाध्यमांवर चर्चा करून सलग सहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दवाखाने व मेडिकल सुरू राहणार असून इतर अत्यावश्यक सेवा नागरिकांच्या मागणीनुसार घरपोच दिल्या जाणार आहेत. गावाच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून नवी मुंबईकरांनी सावधानता बाळगून शहर वाचवावे, असे आवाहन आम्ही कृतीतून करत आहोत.
– चेतन पाटील, अध्यक्ष, घणसोली, देवस्थान गावकी संस्था