मुरूड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्ग, नवीन पुस्तकांचा गंध अशी अनेक स्वप्ने विद्यार्थी पहात होते, परंतु कोरोना संकटामुळे शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. दुसरीकडे छप्पर उडून व भिंती पडून उघड्या बोडक्या झालेल्या, गळक्या शाळा मुरूड तालुक्यात नजरेस पडत आहेत. या शाळांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने शाळांची दूरवस्था कायम आहे.
मुरूड तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली सुमारे 86 प्राथमिक शाळा असून, 18 माध्यमिक विद्यालये आहेत. आर्थिक परिस्थिती गरीब असलेली सर्वसामान्यांची मुले या विद्यासंकुलात शिक्षण घेतात. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी पुढील काळात त्या सुरू होतील. मिळालेल्या अवधीत चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळांची दुरुस्ती झाली तर त्या विद्यार्थ्यांच्या स्वागताला नव्याने सज्ज होतील, मात्र वादळाचा तडाखा बसून दीड महिन्याहून अधिक काळ लोटूनही जिल्हा परिषदेने शाळांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
विद्यार्थ्यांच्या रूपाने भावी आधारस्तंभ घडविणाचे महत्त्वपूर्ण काम शाळांतून होत असते. परिस्थितीनुसार कोविड क्वारंटाइन सेंटर म्हणूनही काही शाळांनी भूमिका बजावली आहे. असे असूनही गावांचे भूषण असलेल्या शालेय इमारतींची दुरुस्ती होत नसल्याने जनसामान्यात सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या परिस्थितीबाबत शिक्षकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शक्य ती किरकोळ दुरुस्ती आम्ही करून घेतली आहे, पण मोठ्या दुरुस्तीचे काम यंत्रणेमार्फत पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
मुरूड तालुक्यातील 80 शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 17 माध्यमिक शाळांचे प्रस्तावसुद्धा सादर केले आहेत. जिल्हा परिषदेकडून निधी प्राप्त होताच शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
-मेघना धायगुडे, गटशिक्षण अधिकारी, मुरूड पंचायत समिती