Breaking News

व्याजदर कोणते कमी हवेत? ठेवींचे की कर्जाचे?

बँक ठेवींचे व्याजदर कमी होत आहेत, अशी तक्रार करण्यात येते आहे, पण ठेवी आणि कर्जाचे व्याजदर यांचा थेट संबंध लक्षात घेता ते अपरिहार्य आहे. नव्हे, ठेवी आणि कर्जाचे व्याजदर कमी होणे, हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.

जे बँकांत ठेवी ठेवतात, त्यांच्यासाठी वाईट आणि जे घरापासून सर्व कारणांसाठी कर्ज घेतात, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. ती म्हणजे, बँक ठेवींचे व्याजदर कमीच होत जाणार आहेत आणि सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याज दरही कमीच होत जाणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे असे होते आहे. अर्थात, यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी (साठ वर्षांवरील) घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण त्यांना या बदलाचा फटका बसू नये म्हणून सरकारने आधीच व्यवस्था करून ठेवली आहे. त्यांना गुंतवणुकीचे तीन मार्ग आहेत. पहिला आहे, तो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा. ज्यात ते 15 लाख रुपये गुंतवू शकतात आणि त्यांना सध्या 7.4 टक्के व्याज मिळते आहे. त्यावर त्यांना कर सवलतही लागू आहे. दुसरा मार्ग आहे, तो बँक मुदत ठेवीचा. त्यात त्यांना व्याजदराची खात्री नसली तरी इतरांना जेवढे व्याज मिळते, त्यापेक्षा 0.5 टक्के व्याज त्यांना अधिक मिळते आहे. आणि तिसरा मार्ग आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचा. ज्यात एकाला 4.5 लाख रुपये गुंतवता येतात तर तिघांचे एकत्रित खाते असेल तर नऊ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीला 7.6 टक्के व्याज मिळू शकते. या योजनेत दर महिन्याला व्याज घेण्याची सोय आहे. प्रधानमंत्री वय वंदन योजनेतही ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट व्याजाची खात्री देण्यात आली आहे.

ज्येष्ठांच्या गुंतवणुकीचे हे मार्ग आधीच यासाठी नमूद केले की, व्याजदर कमी होत आहेत, मग आम्ही काय करायचे, हा प्रश्न उपस्थित करण्याचे काही कारण नाही. व्याजदर कमीच झाले पाहिजेत, यात दुमत असू शकत नाही. देशात ज्येष्ठांची संख्या 14 कोटींच्या घरात आहे. आणि त्यातही बँकेत इतक्या ठेवी ठेवणार्‍याचे प्रमाण कमी आहे. या 14 कोटींसाठी सुमारे 50 कोटी तरुणांनी आपले घर, गाडी, शिक्षण, व्यवसायासाठी अधिक व्याज देत राहावे, हे कोणत्याही कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या हिताचे नाही. सध्या तरुण पिढी कर्जासाठी जे व्याज देते आहे, ते आपण स्पर्धा करतो, त्या सर्व देशांत जगात सर्वाधिक आहे. एक छोटे उदाहरण द्यायचे तर घरासाठी ज्यावेळी एक तरुण कर्ज घेत असतो, तेव्हा तो अधिक व्याजदरामुळे 20 वर्षांत दीड पट परतफेड करत असतो. यावरून तरुण पिढीची स्वप्ने चढ्या व्याजदरामुळे मागे रहातात, हे लक्षात येते. मुळात ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट रक्कम मिळत राहील, यासाठी स्वतंत्रपणे काही करण्याची गरज आहे. पण त्यासाठी तरुण पिढीला वेठीस धरण्याची गरज नाही.

आता व्याजदर कमी का होत आहेत आणि ते कमीच का झाले पाहिजेत, हे समजून घेऊ. नोटबंदी, जन धन खाती, डिजिटल व्यवहार करण्याची अपरिहार्यता – या सर्व धोरणात्मक निणर्यामुळे देशात बँकिंग वेगाने वाढते आहे. 2014च्या दरम्यान 40 टक्के नागरिकाने नियमित बँकिंग करत होते. त्यांची संख्या आता तब्बल 80 टक्के झाली आहे. कोणत्याही देशाला आर्थिक प्रगती करण्यासाठी बँकिंग करणार्‍या नागरिकांची संख्या वाढणे, ही प्राथमिक गरज आहे. बँकिंगमध्ये पैसा आल्याने काळ्या पैशाला तर अटकाव होतोच, पण पैसा फिरत राहिल्याने तो सर्वांना मिळण्याची शक्यता वाढते. त्याला पतसंवर्धन म्हणतात. ते जेवढे जास्त, तेवढा तो देश प्रगत, अशी सध्या जगात स्थिती आहे. काही जपानसारख्या देशात तुमची क्रेडीट हिस्ट्री चांगली असेल तर शून्य टक्क्यांनी कर्ज मिळते. ठेवीवरील व्याज हा काही जगण्याचा चांगला मार्ग मानला जात नाही. अर्थात, अशा सर्व देशांत ज्येष्ठांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या योजना आहेत. पण हेही विसरून चालणार नाही की, त्या योजनांचा पैसा ही ज्येष्ठ मंडळी जेव्हा तरुण असते, तेव्हा त्यांनी दिलेल्या करातून किंवा वर्गणीतून उभा राहिलेला असतो. तो प्रवास आपल्याला अजून करावयाचा आहे. तोपर्यंत तरुणांनी चढ्या व्याजदरांतच जगावे, हे मात्र अन्यायकारक आहे. त्यामुळे कमी व्याजदराचे स्वागत केले पाहिजे.

थोडक्यात, अशा सर्व कारणांनी आपल्या देशातील बँक मनी वाढत चालला असून कर्ज घेणार्‍यांची संख्या त्या प्रमाणात वाढली तरच बँकिंग व्यवसाय चालू शकतो. म्हणूनच ठेवी या बँकांसाठी उत्तरदायित्व असते तर कर्ज ही संपत्ती असते. हे अनेक बँकर्सना अजून कळत नाही, ही गोष्ट वेगळी. तर, बँकेत पैसा येत असल्याने त्यातून पैसा वाढवायचा आणि ठेवीवर व्याज द्यायचे असेल तर पतपुरवठा वाढविणे, हे क्रमप्राप्त आहे. पण चढ्या व्याजदरात कर्ज घेणारे कमी होत जातात. त्यांची संख्या वाढवायची असेल तर कर्जाचे व्याजदर कमी झालेच पाहिजे. ते कमी झाले नाहीत म्हणून आपल्याकडील उद्योग अनेकदा परदेशी कर्ज घेणे पसंद करतात. सुदैवाने गेली पाच सहा वर्षे व्याजदर कमी होत असून आता राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यात पुढाकार घेतला आहे. खासगी आणि सहकारी बँकांनाही त्याच्याशी स्पर्धा करावी लागणार असल्याने व्याजदर पुढेही कमी होत जाणार आहेत. तात्पर्य, 50 टक्के कोटी तरुणांसाठीच्या कर्जाचे व्याजदर कमी व्हायचे असतील तर 14 कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींचे व्याजदर कमी होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्याविषयी तक्रार न करता सरकारने दिलेल्या सवलतींचा लाभ घेणे किंवा गुंतवणुकीचे इतर मार्ग अनुसरणे, याशिवाय पर्याय नाही.

* बँका आणि गृहकर्जाचे व्याजदर

युनियन बँक ऑफ इंडिया –               6.7 टक्के

बँक ऑफ बडोदा –                6.85 टक्के

बँक ऑफ इंडिया –               6.85 टक्के

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया    -6.85 टक्के

कॅनरा बँक                             -6.9 टक्के

स्टेट बँक ऑफ इंडिया        -6.95 टक्के

एलआयसी हौसिंग फायनान्स         -6.90 टक्के

* एलआयसीची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारात संस्थात्मक सर्वाधिक गुंतवणूक करणार्‍या एलआयसीने ज्या कंपन्यांमधील गुंतवणूक जूनमहिन्यात वाढविली आहे, अशा काही कंपन्या. या कंपन्या चांगल्या आणि स्थिर आहेत, असे मानले जाते.

–              हिंदुस्थान लिव्हर

–              कोलगेट पॉमोलीव्ह

–              एचडीएफसी बँक

–              आयसीआयसी बँक

–              कोटक महेंद्र बँक

–              स्टेट बँक ऑफ इंडिया

–              मारुती सुझुकी

–              हिरो मोटोकॉप

–              अशोक लेलँड

–              बाटा इंडिया

–              कोल इंडिया

–              एनटीपीसी

–              टायटन

–              भारती इन्फ्राटेल

–              इंद्रप्रस्थ गॅस

यमाजी मालकर

ymalkar@gmail.com

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply