पनवेल ः वार्ताहर – कळंबोलीतील स्मृतीवन उद्यानात चार दिवसांपूर्वी एका 31 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा कळंबोली पोलिसांनी छडा लावला असून पनवेल येथील साईबाबा मंदिरासमोरील झोपडपट्टीतून मारेकर्यांपैकी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृत तरुणाच्या खिशातील एक हजार रुपये चोरी करण्यासाठी त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत सोमवारी (दि. 9) परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
गुरुवारी कळंबोली सेक्टर 2 ई, सिडकोच्या स्मृतीवन गार्डन येथे अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, अंमलदार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्व अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी ओळखपत्र व पॉकेटमधील डायरी आढळली. त्यावरून मृताच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या माहितीनुसार मृताचे नाव नागनाथ कल्लप्पा माले (31, रा. चाकण, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत यांनी भेट दिली. तपासात गुन्ह्यातील फिर्यादी विलास रामणा संतोषकर यांच्याकडे दिवाळीसाठी त्यांचा मेहुणा नागनाथ कळंबोली येथे आला होता. त्याचा अज्ञात व्यक्तींनी स्मृतीवन उद्यानात खून केला.
सदर गुन्ह्यात आरोपींनी काहीही सुगावा मागे ठेवला नव्हता. तपासाच्या दृष्टीने विशेष पथक तयार करून गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली. अखेर रात्रंदिवस मेहनत घेत पनवेल शहरातील झोपडपट्टीमधून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केला असता त्याने इतर तीन साथीदारांसह केवळ एक हजार रुपये लुटण्याच्या उद्देशाने खून केल्याची कबुली दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड करीत आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले आहे.