रायगडकरांसाठी 2020 हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. आधी कोरोनाचा शिरकाव, टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ, शेवटी अतिवृष्टी अशा समस्यांना रायगडकरांना तोंड द्यावे लागले. जून महिन्यात निसर्ग वादळाने रायगडला जोरदार तडाखा दिला. घरे पडली, बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन 2 लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यात 1 हजार 291 कोटीं 46 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटांना रायगडरांनी धिरोदत्तपणे तोंड दिले. 2020 हे वर्ष रायगडकरांना बरच काही शिकवून गेले आहे. यातून धडा घेत पुढील नियोजन करावे लागणार आहे. कोणत्या कामाना प्रधान्य द्यावे, हे रागयडकारांनी ठरवले पाहिजे.
जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या किनार्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकले. किनारपट्टीवरील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड तालुक्यासह रोहा, म्हसळा, माणगाव, तळा, पेण तालुक्यांना वादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळाची सूचना मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात जीवितहानी टाळली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. सात जणांचा बळी गेला. दोन लाख घरांची पडझड झाली. 16 हजार हेक्टर बागायती नष्ट झाल्या. वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धा रायगड जिल्हा अंधारात गेला. सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून रायगडकर सावरत असतांनाच ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून नेले.जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 29 जणांचा बळी गेला. यात तीन पूरात वाहून गेले, वीज पडूनतिघाजणांचा मृत्यू झाला. यातील 22 जणांच्या नातेवाईकांना शासनाच्या निकषांनुसार प्रत्येकी चार लाख मदत देण्यात आली आहे. तर सात जणांचे मदत वाटप अद्यापही प्रलबिंत आहे. नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील 247 दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यात 153 मोठ्या तर 94 लहान दुधाळ जनावरांचा समावेश होता. याशिवाय 101 ओढकाम करणार्या जनावरांचा अतिवृष्टीत मृत्यू झाला.
नैर्सर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील एक हजार 684 घरे पुर्णतः नष्ट झाली. एक लाख 44 हजार 433 पक्क्या घरांची पडझड झाली. 64 हजार 998 कच्चा घरांची पडझड झाली. 442 झोपड्या नष्ट झाल्या. तर पाच हजार 271 गोठ्यांचेही नुकसान झाले. 38 हजार 795 सार्वजनिक मालमत्तांचेही यात मोठे नुकसान झाले. शाळा, अंगणवाड्या, स्मशानभुमी, ग्रामपचांयत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर प्रशासकीय इमारतींचा समावेश होता. सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचा आकडा 339 कोटींच 75 लाखांच्या घरात आहे. तर खाजगी मालमत्तांचे नुकसान हे 951 कोटीं 71 लाखांच्या आसपास आहे.
रायगड जिल्ह्यातील तब्बल 60 हजार 45 लोकांना करोनाची बाधा झाली. यातील एक हजार 645 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर 57 हजार 812 जणांनी करोनावर मात केली.
यातून सावरत सरकारच्या मदतीची वाट न पहाता प्रतिकूल परिस्थितीत रायगडमधील शेतकर्यांनी यावर्षी 19 हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती. समाधानकारक पावसाने पीकही जोमात आले होते. शेतकर्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या अपेक्षांवर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात आलेल्या नासाड्या पावसाने पाणी फेरले. 28 हजार हेक्टरवरील भात पिकाचे या नासाड्या पावसाने नुकसान केले. हातातोंडाशी आलेले पीक गमवण्याची वेळ शेतकर्यांवर आली. तरीही हा शेतकरी रडला नाही. मदतीसाठी आंदोलने केली नाहीत.
मच्छीमारांसाठी हे वर्ष खडतर ठरले. आधी टाळेबंदीमुळे मच्छीमारांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली. नंतर निसर्ग वादळाने त्यावर कडी केली. बोटींचे तसेच जाळ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामानातील बदलांचा मासेमारी व मत्स्य उत्पादनावर याचा मोठा परिणाम दिसून आला. पर्यटन व्यवसायाला करोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले. एप्रिल, मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. यंदा टाळेबंदीमुळे हे तीन महिने संपूर्ण पर्यटन उद्योग बंद ठेवावे लागले. दिवाळीनंतर पर्यटन हंगामाला पुन्हा सुरुवात झाली. मात्र निर्बंधाच्या सुरुवातीला पर्यटकांचा ओघ कमी होता. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे नुकसान झाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशभरात करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली, संचारावर निर्बंध आले, बाजारपेठा बंद झाल्या, व्यवसाय ठप्प झाले, उद्योगधंदेही बंद पडले. त्यामुळे अर्थचक्रच गाळात रुतले. अर्थकारण गाळात रुतले होते. करोनाची झळ जिल्ह्यातील विकासकामांनाही बसली. अनेक विकासकामे करोनामुळे रखडली. महसूल नसल्यामुळे जिल्हा वार्षिक आराखड्यात 33 टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे विकासकामे रखडली.
2020 साली आलेल्या संकटांनी रायगडकारांना बरेच काही शिकवले आहे. यातून घडा घेत रायगडकर उभा रहात आहे. हळूहळू जिल्ह्याचे अर्थचक्र गती घेवू लागले आहे. रायगडकारांनी आत कशाला प्रधान्य द्यावे, हे ठरवले पाहिजे. कोरोनाने आपल्या आरोग्य यंत्रणेतील त्रूटी दाखवून दिल्या आहेत. त्या दूर करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ इमारती बांधण्यावर खर्च करण्यापेक्षा आरोग्ययंत्रणा सुदृढ करण्यावर भर दिला पाहिजे. पाणीपुरवठा, वीज, समुद्र किनार्या लगतच्या गावांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या टकणे या कामांना प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक गावात एक निवारा केंद्र उभे केले पाहिजे. चक्रीवादळात अनेक शाळा उध्वस्त झाल्या आहेत, त्या दुरूस्त केल्या पाहिजेत. या गोष्टीसाठी ग्रामस्थांनीदेखील आग्रह धरायाला हवा. यातूनच रायगड उभा राहणार आहे.
-प्रकाश सोनवडेकर