Breaking News

कर्जतमध्ये उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी

कर्जत : बातमीदार

उल्हास नदीवर कर्जत तालुक्यात पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी मागील राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल 20 कोटींची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत, अशी मागणी होत होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर्जत तालुक्यातील पाचपैकी चार पुलांचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षांत त्या सर्व पुलांची उभारणी पूर्ण करण्याचे आदेश शासनाने निविदेत दिले आहेत. कर्जत तालुक्यातील शेलू-मोहिली यांना जोडणार्‍या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. शेलू येथील गणेश घाट येथे या पुलाला सुरुवात होणार आहे. याच उल्हास नदीवर चांदई येथे सध्या असलेल्या अरुंद पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारला जाणार आहे. चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर असलेला हा पूल आवश्यक होता. सध्या या ठिकाणी असलेल्या पुलाच्या बाजूला हा नवीन पूल उभारण्यात येणार आहे. उल्हास नदीवर कर्जत आमराई येथील श्रीराम पूल येथे नवीन पूल मंजूर झाला असून,  या पुलाच्या बांधकामामुळे कर्जत-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. उल्हास नदीवर शिरसे येथे असलेल्या बंधार्‍याच्या खालच्या  बाजूला पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शिरसे येथील या पुलामुळे नेवाळी, मोहिली, आवळस या भागातील आणि पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या लोकांसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कर्जत तालुक्यातील दहिवली-मालेगाव येथे कमी उंचीचा पूल आहे. तो पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो. त्यामुळे तेथे जास्त उंचीचा पूल बांधण्याची मागणी सातत्याने होत आहे, मात्र  त्या पुलाच्या कामास मान्यता दिलेली नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply