कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा मिळालेला असून सुमारे 16 लाख लोक सागरी मासेमारीवर जीवन जगत आहेत. समुद्राच्या शेजारी राहून खोल समुद्रात मासेमारी करणारा कोळी समाज असून समुद्र शेतीवर त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्भर आहे. नैसर्गिक संकटावर मात करून अत्यंत कठीण अशा समुद्र शेतीवर अवलंबून असणार्या कोळी समाजास सध्या तोंड द्यावे लागत आहे ते एलईडी मासेमारीच्या प्रचंड उत्पादनांमुळे कोकणातील कोळी समाजाचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अगोदरच मागील तीन महिन्यांपासून वार्याची दिशा बदलल्यामुळे मासळी खोल समुद्रात निघून गेली आहे. त्यातच आता एलईडीचे संकट आल्याने हा समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.
मागील तीन महिन्यांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाली आहे. समुद्रात कोठेही जाळे टाका, परंतु मासळीच मिळत नाही. पाच ते सहा दिवसांच्या वस्ती करूनसुद्धा पुरेशी मासळी न मिळाल्यामुळे कोळी बांधवांचा डिझेल खर्च व रेशनिंग खर्चदेखील निघत नसल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागात होड्या किनार्याला साकारलेल्या दिसत आहेत. आजघडीला मुरूड तालुक्यात 650 होड्यांचा ताफा आहे, परंतु बहुतांशी भागात म्हणजेच आगरदांडा, दिघी, मुरूड, राजापुरी आदी भागातील होड्या या किनार्यावर लागल्याचे दिसत आहे.
सदरच्या परिस्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीने सविस्तर आढावा घेतला असता सध्या हवामानाच्या फरकामुळे सर्व मासळी दूरवर निघून गेली आहे. मासळी मिळण्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहणे खूप आवश्यक असते, परंतु सध्या वारे हे दक्षिणेकडून व उत्तरेकडून वाहत आहे. त्यामुळे मासळीची आवक घटल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मागील तीन महिन्यांपासून मच्छीमारांना पुष्कळशी मासळी मिळत नाही. त्यामुळे खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी न मिळाल्याने कोकणातील कोळी समाज खूप नाराज असून, या बिकट परिस्थितीवर मात करीत आहे.
मुरूड हे पर्यटन स्थळ असून येथे शनिवार व रविवार पर्यटकांची मोठी गर्दी असते, परंतु खवय्ये पर्यटकांना मासळीची आवक घटल्याने मासळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी न आल्याने मासळीचे भाव कमालीचे वधारले असून खूप जास्त पैसे खर्च करून पर्यटकांना चविष्ट मासळी खरेदी करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांनासुद्धा मासळीचे भाव वधारल्याने याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. मासळीच मार्केटमध्ये कमी येत असल्याने उपलब्ध मासळीची जास्त किमतीत खरेदी करावी लागत आहे. सध्या मासळी मार्केटमध्ये लहान सुरमयी, पापलेट, रावस, बांगडा, थोड्या प्रमाणात मिळणारी कोलंबी हीच मासळी नजरेस पडत आहे. सापडणारी ही मासळी खूप अल्प असल्याने एक नग किमान 500 ते 700 रुपयांना पडत आहे. मुरूडच्या मासळी बाजारात मासळी नगावर विकली जात आहे.
या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कोळी बांधव खूप हैराण झाले असून सदरची परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत. या परिस्थितीशी झगडत असतानाच एलईडी मासेमारी करणार्यांचे प्रमाण वाढले आहे. सदरची मच्छीमारी खोल समुद्रात केली जाते. बोटीवर असणारे जनरेटर व भव्य क्षमता असणार्या विद्युत दिव्यांच्या साहाय्याने माश्यांना दिपवून त्यांना आकर्षित करून मोठ्या जाळ्याच्या साह्याने मोठ्या प्रमाणात मासळी पकडली जात असल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या कोळी बांधवांना जाळ्यामध्ये मासेच सापडत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे दिवस आले आहेत. एलईडी मासेमारी करणार्यांना कडक शासन मिळत नसल्याने सध्या हे प्रमाण वाढल्याचे असंख्य मच्छीमारांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे. आंध्र प्रदेश, केरळ सरकारने
ज्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्यांच्यासारखी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी असंख्य कोळी बांधवांनी केली आहे. आंध्र प्रदेश, केरळ राज्यात एखाद्या होडीत एलईडी पद्धतीने मासेमारी केल्यास त्याला तेथील मत्स्यव्यवसाय अधिकारी यांनी पकडताच असणारे जनरेटर पाण्यात बुडवले जातात व बल्बसुद्धा जप्त केले जातात. त्यामुळे येथे या प्रकाराला आळा बसला आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र जुजबी कार्यवाहीमुळे एलईडी मासेमारी करणार्यांचे चांगलेच फावले आहे. मुरूड तालुक्यातील राजपुरी, आगरदांडा, एकदरा, कोर्लई, बोर्ली आदी भागातील असंख्य होड्या किनार्यावर असून मासळी मिळत नसल्याने मासेमारी बंद करण्यात आली आहे. जोपर्यंत एलईडीवर कठोर शासन लादले जात नाही, तोपर्यंत सागरी किनार्यावर राहणार्या कोळी समाजावर उपासमारीची टांगती तलवार राहणार आहे. मासळीमुळे आपल्या देशाला परकीय चलन मिळते, परंतु परकीय चलन मिळवून देणार्या या व्यवसायाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्यांच्या समस्यासुद्धा सोडवणे खूप आवश्यक बनले आहे. सदरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून एलईडी मासेमारी करणार्यांवर कडक कार्यवाही होणे खूप आवश्यक आहे, अन्यथा हा व्यवसाय डबघाईस येऊन पारंपरिक मासेमारी करणार्या कोळी बांधवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीला सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ज्या पद्धतीने वेगाचे वारे वाहतात तशीच परिस्थिती मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत सुरू आहे. वेगाचे वारे वाहत असल्याने समुद्रात जाळी टाकताच येत नाही. जाळे टाकले तरी ते गुरफटले जाते. त्यामुळे मासळी मिळत नाही. या वेगाच्या वार्याने मच्छीमारांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असून बहुतेक मासेमार हे कर्जबाजारी झाले आहेत.
त्याचप्रमाणे एलईडी मासेमारीमुळे समुद्रात असणारी सर्व मासळी एलईडीवाले गिळंकृत करीत आहेत. त्यामुळे जाळीच्या साह्याने मासेमारी करणार्या आमच्या कोळी बांधवांवर मोठा अन्याय होत आहे. शासनाकडून एलईडी मासेमारी करणार्यांना कायद्याचा जरब बसावा. असे शासन झाल्यास या संकटामधून आम्हाला बाहेर पडता येऊ शकेल, परंतु शासनाने या प्रकणाकडे गांभीर्यपूर्वक पाहून कडक कायदा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली, तसेच सन 2016, 2017 आणि 2018 या वर्षांतील मच्छीमारांना मिळणारी हक्काची डिझेल परताव्याची रक्कमसुद्धा फक्त तीन महिन्यांचीच देण्यात आली आहे. बाकीच्या महिन्यांची रक्कम बाकी असून किमान ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी या वेळी मनोहर मकू यांनी केली आहे.
-संजय करडे, खबरबात