नवीन वर्ष सुरू होऊन पहिला महिना सरलासुद्धा. नववर्षासाठी केलेले अनेकांचे संकल्प कधी विरून गेले ते त्यांनाही कळले नसेल. गमतीचा भाग सोडा, पण मानवी जीवन इतके वेगवान आणि व्यस्त झाले आहे की दैनंदिन धावपळीत स्वत:सह इतरांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. याच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कळत-नकळत माणूसपण कुठेतरी हरवत चालले आहे.
आजच्या झटपट निकालाच्या जमान्यात जो तो यंत्रवत काम करतोय. कामाचा प्रचंड रेटा आणि जोरदार स्पर्धा यामुळे धावपळ होणे स्वाभाविक आहे, परंतु कामाला प्राधान्य देताना आपल्या माणसांना वेळ देणे शक्य होत नाही. कधी कधी तर त्यांच्याशी साधे बोलणेही होत नाही. स्वत:ची हेळसांड होते ती वेगळीच. नाही म्हणायला समाजमाध्यमांतून आपण सर्व जण भेटतो. एकमेकांची सुखदु:खे वाटून घेत असतो, परंतु त्याला मर्यादा आहेत.
मानवी जीवन अनमोल आहे. मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली. अश्मयुग ते आधुनिक युग असा मनुष्यप्राण्याने केलेला प्रवास थक्क करणारा आहे. मनात आणले तर माणूस खूप काही करू शकतो, मात्र याच माणसाने भौतिक सुखासाठी अलीकडे स्वत:ला इतके गुंतवून घेतले आहे की मानसिक समाधानापासून तो वंचित राहताना दिसतो. त्यातून चीडचीड, ताणतणाव निर्माण होतात. हळुहळू नैराश्य येते आणि एखादी व्यक्ती मग चुकीचे पाऊलही उचलते.
हल्ली आत्महत्येच्या बातम्या सर्रास वाचायला, पाहायला मिळतात. कुणी आर्थिक विवंचनेतून आपली जीवनयात्रा संपवतात, कुणी बदनामी वा कसल्याशा भीतीने मरणाला जवळ करतात, तर कुणी आजारपण, प्रेमभंग, नैराश्य, व्यसनाधिनता वा इतर कारणांनी मृत्यूला कवटाळतात. अशा घटनांवर बारकाईने दृष्टिक्षेप टाकल्यास बहुतांशी प्रकार हे एकटेपणाच्या भावनेतून होतात. एखाद्या माणसाला कितीही चिंता, दु:ख, तणाव, भीती असली तरी कुटुंब, मित्र सोबत असल्यास त्याला मोठा आधार असतो. ही मंडळी एकवेळ त्याला संकटातून लगेचच बाहेर काढू शकणार नाहीत, परंतु मार्ग, पर्याय नक्कीच सुचवू शकतात. मुख्य म्हणजे चुकीची गोष्ट करण्यापासून परावृत्त करू शकतात.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. त्या वेळी प्रेम व आपुलकी असायची. त्यातून जगण्यासाठी बळ आणि भरारी घ्यायला प्रोत्साहन मिळत असे. आता विभक्त कुटुंबात ना मायेचा ओलावा आहे ना मनमोकळा संवाद. मग करायचे काय? दुसरे काही नाही. फक्त जीवनशैली सुधारायची. रोजच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबात आहेत त्या सदस्यांशी तरी बोलले पाहिजे, आठवड्यातून एकदा मनसोक्त भटकायला हवे. छंद-आवड जोपासूनही नवनिर्मितीचा आनंद घेता येऊ शकतो. जीवन सुंदर आहे. झाले, गेले विसरून जाऊन या जीवनाचे गाणे गात पुढे-पुढे चालत राहिल्यास खूप काही साधता येईल.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)